12 December 2017

News Flash

मार्टिन मॅकगिनेस

राजकीय स्वातंत्र्याऐवजी त्यांना स्वायत्तता मिळाली.

लोकसत्ता टीम | Updated: March 24, 2017 3:54 AM

मार्टिन मॅकगिनेस यांचे आपल्या देशातील मिझोरमचे लाल डेंगा वा आसाममध्ये एके काळी वादळ उठवून देणारे प्रफुल्लकुमार मोहन्ता यांच्याशी बरेचसे साम्य होते. डेंगा वा मोहन्ता हे बंडखोर वृत्तीचे. प्रसंगी हिंसाचारासही उत्तेजन देणारे, परंतु नंतर अनेकांनी सूचना केल्याने मतपरिवर्तन होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले. मार्टिन मॅकगिनेसही तसेच एके काळी ब्रिटनमधील क्रमांक एकचा कडवा अतिरेकी अशी त्यांची ओळख बनली होती; पण नंतर मात्र उत्तर आर्यलडमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी सुरू झालेल्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांनी काम केले.

उत्तर आर्यलडने कायमच युनायटेड किंग्डमचा भाग होणे नाकारले. राजकीय स्वातंत्र्याऐवजी त्यांना स्वायत्तता मिळाली. याच आर्यलडमधील एके काळच्या आयरिश रिपब्लिकन आर्मी (आयआरए) या हिंसाचारी संघटनेचे ते प्रमुख कमांडर होते. त्या आधी १९७२ मध्ये ते या संघटनेत क्रमांक दोनचे कमांडर होते. तेव्हा एका रविवारी मानवी हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर गोळीबार करण्यात आला. यात १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी स्फोटके आणि दारूगोळा भरलेल्या गाडीजवळ उभ्या असलेल्या मार्टिन यांना अटक झाली. नंतर रीतसर खटला चालला व त्यांना शिक्षाही झाली.  १९७४ पर्यंत ते आयआरएशी संबंध ठेवून होते. पुढे मात्र ते आयआरएचा कमांडर असल्याचा थेट इन्कार करू लागले.

उत्तर आर्यलडमधील संघर्षांत सुमारे ३६०० जणांना प्राण गमवावे लागल्याने मार्टिन यांच्याविषयी जनमानसात द्वेषाची भावना निर्माण झाली होती. ब्रिटिश सैन्य आयआरएचा पराभव करू शकणार नाही तसेच आयआरएसुद्धा ब्रिटिश सैन्याला नामोहरम करू शकणार नाही, असे मत तेव्हा अनेक बुद्धिवादी मांडू लागले होते. त्याने मग मार्टिन याचेही मतपरिवर्तन होऊ लागले. संघर्षांऐवजी चर्चेतूनच प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे ते आपल्या समर्थकांना सांगू लागले. १९८२ मध्ये ते स्टॉरमंट येथून उत्तर आर्यलडच्या असेंब्लीवर निवडून गेले. नंतर हिंसाचाराला मूठमाती देण्यासाठी जो ‘गुड फ्रायडे करार’ झाला त्यात मुख्य संवादक म्हणून मार्टिन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. आयआरएने २००५ मध्ये शस्त्रास्त्रे खाली ठेवली आणि ते सत्तेत सहभागी झाले. यानंतर २००७ मध्ये मार्टिन यांना मंत्रिपद भूषवण्याचीही संधी मिळाली.

२०१२ मध्ये तर ब्रिटनच्या राणीने मार्टिन यांच्याशी हस्तांदोलन करण्याची ऐतिहासिक घटना घडली. जगभरातील माध्यमांनी या घटनेला अगदी ठळक प्रसिद्धी दिली. वेस्टमिन्स्टर येथे मग त्यांनी अत्यंत भावुक होऊन भाषण केले. ‘‘उत्तर आर्यलडमधील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मला खेद वाटतो आहे. ज्यांचे आप्त या संघर्षांत गेले त्यांच्या वेदनांकडे आता दुर्लक्ष होणार नाही. सर्व भूतकाळ विसरून आपण एका चांगल्या आणि शांततेच्या मार्गावरील सहप्रवासी बनू या,’’ असे ते या वेळी म्हणाले होते. मार्टिन मॅकगिनेस यांनी उत्तर आर्यलडमध्ये शांतता नांदावी यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मतमतांतरे असली तरी त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले. जानेवारी महिन्यात त्यांना अत्यंत दुर्मीळ अशा आजाराने ग्रासले व या आजाराशी सामना करतानाच मंगळवारी, वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. एके काळचा बंडखोरांचा नेता ते नंतरच्या काळातील शांतिदूत हा त्यांचा प्रवास विलक्षण होता हे नक्की..

 

First Published on March 24, 2017 3:54 am

Web Title: loksatta vyakti vedh martin mcguinness