एड्सविरोधात ज्यांनी व्रतस्थपणे संशोधन करून त्यातील उपचारांची प्रगती सतत साध्य केली, त्यांच्यापैकी एक म्हणजे मॅथिल्ड क्रिम. त्यांचे सोमवारी वयाच्या ९१व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. त्यांचे महत्त्वाचे काम केवळ विषाणू वैज्ञानिक एवढेच मर्यादित नव्हते, तर एड्ससारख्या दुर्धर रोगावर त्यांनी जनजागृती केली. जगात ३.९ कोटी लोक आतापर्यंत एड्सने मरण पावले आहेत. एड्सचा विषाणू माणसात पसरत असल्याचे दिसून आले तो काळ १९८०च्या सुमाराचा होता. त्या वेळी जनुक शास्त्रज्ञ व विषाणू शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी या रोगाविरोधात रणशिंग फुंकलेच, पण त्याच्या जोडीला त्यांनी एड्सग्रस्तांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अमेरिकेतील एड्सविरोधी मोहिमेत त्या अग्रणी होत्या.

२०१६ मध्ये ३६.७ दशलक्ष लोकांना एचआयव्हीची लागण झाली. हे प्रमाण २०१५च्या तुलनेत तीन लाखांनी कमी होते. मृतांची संख्याही १९ लाखांवरून १० लाखांवर आली याचे श्रेय क्रिम यांच्यासारख्या लढवय्यांनाच आहे. त्यांचा जन्म १९२६ मध्ये इटलीत झाला.  जीवशास्त्र व जनुकशास्त्र हे त्यांचे आवडते विषय होते. यहुदी विद्यार्थ्यांशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर १९५४ मध्ये त्यांनी जन्माने जर्मन असलेले इस्रायली रेणवीय जीवशास्त्रज्ञ लिओ सॅश यांच्याबरोबर संशोधन सुरू केले. त्यात कर्करोगकारक विषाणूंचा अभ्यास करून काही संशोधन निबंध लिहिले होते. वेझमानचे विश्वस्त क्रिम यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या न्यू यॉर्कला गेल्या. त्या काळात अमेरिकेत एड्स जोरात होता. त्याला कारण जीवनशैली हे होते. त्यातून धडा शिकणे आवश्यक आहे हे त्याच वेळी क्रिम यांनी सांगितले होते. १९९२ मध्ये त्यांनी एड्स संशोधन संस्था सुरू केली. राजकारण, कला, करमणूक, समाज अशा क्षेत्रांतील धुरीणांनी यात त्यांना मदत केली. इटालियन, जर्मन, फ्रेंच व हिब्रू, इंग्रजी यासह अनेक भाषा त्यांना येत होत्या, त्यामुळे त्यांचे ज्ञान त्या सर्वांपर्यंत परिणामकारकतेने पोहोचवू शकल्या. ड्रग्ज व समलिंगी संबंधातून असणारे धोके त्यांनी सांगितले, पण या कारणास्तव या वर्गातील लोकांची छळवणूक होऊ नये या मताच्या त्या होत्या. त्या काळात एड्स झालेल्या व्यक्तींना अमेरिकेसारख्या प्रगत देशात काही राज्यांमध्ये वेगळे ठेवले जात होते, त्यावरून समाजजागृतीची किती आवश्यकता होती हेच लक्षात येते. त्यासाठी त्यांनी एलिझाबेथ टेलरसह अनेक नामांकितांची मदत घेऊन आपले संशोधन व सामाजिक काम पुढे नेले. अमेरिकी अध्यक्षांचा मेडल ऑफ फ्रीडम पुरस्कार हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मिळाला होता. वैज्ञानिकाबरोबरच सामाजिक भान असलेल्या मोजक्या संशोधकांपैकी त्या होत्या यात शंका नाही.