17 December 2018

News Flash

इब्राहिम जोयो

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील अबाद या छोटय़ाशा गावी  १९१५ मध्ये त्यांचा जन्म झाला.

‘विसाव्या शतकातील पाकिस्तानचा आवाज’ अशी ओळख सिंधी लेखक इब्राहीम जोयो यांनी निर्माण केली होती ती धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी विचारांमुळे. पाकिस्तानात गेल्या शतकात घडलेल्या अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींचे साक्षीदार असलेले जोयो यांचे साहित्यिक, विचारवंत, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते असे बहुपेडी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील अबाद या छोटय़ाशा गावी  १९१५ मध्ये त्यांचा जन्म झाला. लहान असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले. जी एम सईद नावाच्या धर्मगुरूने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर दोन वर्षे जोयो सिंध मदरशात गेले. पुढे याच मदरशात शिक्षक बनण्याचे त्यांचे ध्येय होते. यासाठी लागणारी पदवी  मिळवण्यासाठी तेव्हाच्या मुंबई इलाख्यातच जावे लागे. एव्हाना जोयो आणि सईद यांचे सौहार्दाचे संबंध प्रस्थापित झाले होते. त्यांनी जोयो यांची मुंबईतील खर्चाची जबाबदारी घेतली. मुंबईत राहात असताना त्यांचा मार्क्‍सवादी लेखक व पत्रकारांशी संबंध आला. या मंडळींचा काँग्रेस व मुस्लीम लीग या दोहोंच्या धोरणांना विरोध होता. त्यांचे विचार ऐकून व वाचून जोयो प्रभावित झाले. जातीय राजकारण हे धोकादायकच आहे, यामुळे हिंदू आणि मुस्लीम यांच्यात विनाकरण वितुष्ट येते, अशी त्यांची धारणा बनली व अशा राजकारणाला ते विरोध करू लागले. भांडवलदार तसेच जमीनदार हे जनतेच्या भावना भडकावून समाजात फूट पाडण्याचे कारस्थान करतात, असे त्यांचे स्पष्ट मत बनले. मुंबईतून क्रांतिकारी विचारांची शिदोरी घेऊन ते परत सिंधमध्ये आले. सिंध मदरशामध्ये ते रीतसर अध्यापक बनले. त्याच सुमारास ‘फ्रीडम कॉलिंग’ हे मासिक त्यांनी सुरू केले. यामधून त्यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांचे जोरदार समर्थन सुरू केले. या बदल्यात त्यांना ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य हवे होते! शिक्षक म्हणून काम करीत असतानाच जोयो यांनी ‘सेव्ह सिंध, सेव्ह कॉन्टिनंट’ हे पुस्तक लिहिले. यात त्यांनी जमीनदार आणि भांडवलदारांच्या जातीयवादावर आसूड ओढले. या पुस्तकाने तेव्हा सर्वत्र खळबळ माजली. या लिखाणाबद्दल मदरशाच्या सेवेतून त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले. यासाठी तेव्हाचे शिक्षणमंत्री पीरइलाही बक्ष यांच्यावर चोहोबाजूंनी दबाव आणला गेला. पण या हकालपट्टीने ते डगमगले नाहीत. त्यांनी मग पालिकेच्या शाळेत नोकरी पत्करली. १९५१ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे ते वरच्या पदावर पोहोचले. सिंधी साहित्यासाठी असलेल्या उच्चस्तरीय कार्यकारी समितीचे ते सचिव बनले. नंतर ‘मेहरान’ या त्रमासिकाचे संपादकपद त्यांच्याकडे चालून आले. या समितीचे नामकरण नंतर सिंध अबादी बोर्ड असे झाले. शिक्षण विभागात जोयो यांनी मग जनसंपर्क अधिकारी, उप संचालक, पाठय़पुस्तक मंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली. लिखाण चालूच होते. सिंधी सोयायटीतर्फे त्यांची २०हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली. रुसो, ब्रेख्त, चेकॉव्ह हे त्यांचे आवडते लेखक. युरोपातील अनेक लेखकांची उत्तमोत्तम पुस्तके त्यांनी सिंधी भाषेत अनुवादित केली. साहित्याच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल २०१३ मध्ये जोयो यांना पाकिस्तान अकादमीतर्फे गौरवण्यात आले.

सिंध असेम्ब्लीमधील अनेक सदस्यांशी त्यांचा सतत पत्रव्यवहार चाले. शिक्षण, पाणी, सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रांत काय करणे गरजेचे आहे, याबद्दल सूचना ते करीत व सदस्यही त्याची दखल घेत. १०२ वर्षांचे कृतार्थ आयुष्य जगल्यानंतर परवा त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

First Published on November 10, 2017 2:50 am

Web Title: loksatta vyakti vedh muhammad ibrahim joyo