बडोदा येथे होणाऱ्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सरकारकडून ५० लाखांचे अनुदान घेऊनही हे संमेलन बहुतेक वेळा गाजते ते साहित्यबाह्य़ गोष्टींमुळेच. अशा संमेलनातील राजकारणापासून दूर राहूनही मराठीत अनेक साहित्य संमेलने होत असतात. विदर्भ आणि मराठवाडा विभागीय साहित्य संमेलने, दलितसाहित्य संमेलन, औदुंबर संमेलन, शेतकरी साहित्य संमेलन ही त्यांपैकी काही. याखेरीज विद्रोही साहित्य संमेलनही गेली अनेक वर्षे नियमितपणे भरत असून समाजातील बदलत्या प्रवाहांची त्यात आवर्जून दखल घेतली जाते. यंदा हे संमेलन २३-२४ डिसेंबरला शहादा येथे होणार असून त्याच्या अध्यक्षपदी आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां व साहित्यिका नजुबाई गावित यांची एकमताने निवड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे जिल्ह्य़ातील आदिवासी व भूमिहीन कष्टकरी कुटुंबात १० जानेवारी १९५० रोजी जन्मलेल्या नजुबाईंना लहानपणापासूनच दारिद्रय़ाशी सामना करावा लागला. दहा भावंडे असल्याने जेमतेम चौथीपर्यंतच त्यांना शिक्षण घेता आले. आदिवासी समाजाची भयानक पिळवणूक होत आहे हे त्यांना वेळीच उमगले. त्यामुळेच १९७२ मध्ये त्यांनी चळवळीत स्वत:ला झोकून दिले. चळवळ चालवायची तर राजकीय पक्षाचे पाठबळ मिळायला हवे, या हेतूने त्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल झाल्या. यातूनच धुळे येथे श्रमिक महिला सभेची स्थापना त्यांनी केली. चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनात विद्युत भागवत, छाया दातार आदींसोबत संघर्षांत नजुबाई आघाडीवर होत्या. पुढे ‘सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षा’तून अनेक लढे त्यांनी दिले. वनजमीन हक्काचा लढा उभारण्यात त्या पुढे होत्या. एक गाव एक पाणवठा, विषमता निर्मूलन यांसारख्या सामाजिक चळवळींमध्ये नजुबाई होत्या. आदिवासी महिलांवर कमालीचा अन्याय होत असल्याने त्यांनी याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. परंतु आदिवासी स्त्रिया हिंदू नसल्यामुळे हिंदू कोड बिल वा कोणत्याही प्रकारचे कायदे आदिवासींना लागू होत नसल्याचा धक्कादायक निकाल तेव्हा न्यायालयाने दिला. या निर्णयाने त्या पेटून उठल्या. अनेक स्त्रीमुक्ती संघटनांना सोबत घेऊन त्यांनी आदिवासी महिलांना हिंदू कोड बिल लागू करावे यासाठी संघर्ष केला. मात्र यात त्यांना यश आले नाही.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyakti vedh najubai gavit
First published on: 18-11-2017 at 02:56 IST