21 November 2017

News Flash

डॉ. नितीन करमळकर

हे विद्यापीठाचे विसावे कुलगुरू आहेत.

Updated: May 19, 2017 4:12 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या परंपरेचा वारसा आता डॉ. नितीन करमळकर यांच्या हाती आला आहे. हे विद्यापीठाचे विसावे कुलगुरू आहेत. विधि, भाषा, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेल्या बहुतेक कुलगुरूंनी विद्यापीठाला नवी दिशा दिली. आता पर्यावरणतज्ज्ञ कुलगुरू विद्यापीठाला मिळाले आहेत. जवळपास पस्तीस वर्षांहून अधिक काळ ते पुणे विद्यापीठाशी जोडले गेले आहेत. विद्यार्थिदशेपासून ते पुणे विद्यापीठाशी जोडले गेले आहेत. विद्यापीठाची खडान्खडा माहिती, विद्यापीठाच्या विकासाबाबत दूरदृष्टी, शिक्षण क्षेत्रातील बदलांची तसेच विद्यार्थ्यांच्या गरजांची जाणीव, संशोधन क्षेत्रातील काम, प्रशासकीय शिस्त, विद्यापीठाचा परिसर आणि पर्यावरणाबाबत असलेली आस्था या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

मूळचे कणकवली येथील डॉ. करमळकर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुणेकर झाले. त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून भूगर्भशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. विद्यापीठातूनच भूरसायनशास्त्र विषयात पीएच.डी. केली. पीएच.डी. पूर्ण झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये त्यांनी काही काळ संशोधक म्हणून काम केले. विद्यापीठात १९८८ मध्ये प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. विद्यापीठात भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी २०१० ते २०१३ या कालावधीत काम पाहिले. पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी २०१३ पासून ते सांभाळत आहेत.  त्याचबरोबर विद्यापीठातील अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्याही पेलल्या आहेत. विद्यापीठाच्या ‘इंटर्नल क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स सेल’चे प्रमुख म्हणून ते २०११ पासून काम पाहत आहेत. विद्यापीठाच्या अधिसभेचे, परीक्षा मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यंदा विद्यापीठाला मिळालेली ‘नॅक’ची अ + श्रेणी, राष्ट्रीय मूल्यांकन प्रणालीत स्थान मिळण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

पर्यावरण, भूगर्भशास्त्र, भूरसायनशास्त्र हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. दगडांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. आतापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोध नियतकालिकांमधून त्यांचे ३५ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. सध्या १० राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोध प्रकल्पांसाठी ते काम करत आहेत. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स येथील संस्थांबरोबर त्यांचे संशोधन प्रकल्प सुरू आहेत. कच्छ, लडाख, हिमालय पर्वतरांगा, दख्खनचे ज्वालामुखीय पठारावरील दगड यांवर त्यांचे संशोधन सुरू आहे. पर्यावरणशास्त्रावरील त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. पर्यावरण अहवाल तयार करणे, ऊर्जा प्रकल्प, धरणे यांच्या निर्मिती आणि देखभालीसाठी ते मार्गदर्शक म्हणूनही काम पाहतात. कच्छमधील भूखनिजांवरील संशोधनासाठी त्यांना ‘मिनरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’कडून भूगर्भशास्त्रातील मानाचे ‘प्राध्यापक सी. नागण्णा सुवर्णपदक’ मिळाले आहे. त्यांच्या हाताखाली २००७ पासून पाच विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे, तर पाच विद्यार्थी सध्या संशोधन करत आहेत.

विद्यापीठातील दबावगटांचे राजकारण, अंतर्गत शिस्त आणि शैक्षणिक गुणवत्तावाढ अशी समीकरणे सांभाळून गेल्या काही वर्षांमध्ये ढासळत गेलेली विद्यापीठाची विश्वासार्हता पुन्हा मिळवण्याचे आव्हान डॉ. करमळकरांना आता पेलावे लागणार आहे. विद्यार्थी, शिक्षक, विभागप्रमुख, अधिकार मंडळावरील पदाधिकारी, अधिसभा सदस्य अशा वेगवेगळ्या पदांवर काम केल्यामुळे विद्यापीठाशी संबंधित प्रत्येक घटकाच्या गरजांची, मानसिकतेची जाण असलेली व्यक्ती विद्यापीठाला कुलगुरू म्हणून मिळाली आहे. शिक्षण, संशोधन आणि प्रशासन अशा बाबींवर हुकमत असणाऱ्या डॉ. करमळकरांकडून शिक्षण क्षेत्राला आणि विद्यापीठाला अपेक्षा आहेत.

 

First Published on May 19, 2017 4:12 am

Web Title: loksatta vyakti vedh nitin karmalkar