20 February 2019

News Flash

परेश धनानी

आपल्याकडे राजकारणात लहान वयात मोठे पद मिळणे तसे विरळाच.

आपल्याकडे राजकारणात लहान वयात मोठे पद मिळणे तसे विरळाच. मग अशा व्यक्तीला घराण्याची पाश्र्वभूमी असावी लागते. तरीही कर्तृत्वाने काही जणांकडे अशी पदे चालून येतात. गुजरातमध्ये विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार ४१ वर्षीय परेश धनानी यांनी नुकताच स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे हे गृहराज्य असल्याने काँग्रेस आक्रमक चेहऱ्याच्या शोधात होती. त्यातच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शक्तिसिंह गोहिल, अर्जुन मोधवाडिया असे प्रमुख नेते पराभूत झाल्याने धनानी यांच्यासाठी ही एक संधीच चालून आली.

सौराष्ट्र विभागातील अमरेली मतदारसंघातून विजयी झालेल्या धनानी यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी काँग्रेसने निवड करून नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. नॅशनल स्टुडंट्स युनियनपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत सौराष्ट्रमधून काँग्रेस भाजपपेक्षा सरस ठरली, त्यात धनानी यांचा मोलाचा वाटा आहे. २००२मध्ये पहिल्यांदा त्यांनी सध्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम रुपाला यांना पराभूत करण्याची किमया केली. मात्र त्यानंतर २००७ मध्ये दिलीप संघानी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र पुन्हा २०१२ मध्ये संघानी यांना पराभूत करून ही जागा खेचून आणली. यावेळी त्यांनी माजी मंत्री भावकु उधेड यांचा पराभव करत तिसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश केला. पाटीदार समाजातून आलेले धनानी हे आक्रमक नेते आहेत. आताही पदभार स्वीकारल्यावर भाजपला राज्यातून हटविल्याशिवाय हारतुरे स्वीकारणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या हेतूनेच काँग्रेसने दहाव्यांदा आमदार झालेल्या मोहनसिंह राठवा,  कुंवरजी बावलिया अशा विविध जातींमधील प्रभावी नेत्यांना मागे टाकत धनानी यांना प्राधान्य दिले. गुजरातमध्ये दोन दशकांहून अधिक काळ काँग्रेस सत्तेबाहेर आहे. यावेळी काँग्रेसने भाजपला जबरदस्त झुंज देत ७७ जागा पटकाविल्या. सत्ताधारी भाजपकडे ९९ आणि एका अपक्षाचा पाठिंबा असे शंभरचे संख्याबळ विचारात घेतले, तर विरोधकांचीही ताकद तब्बल ८२ जणांची आहे. त्यामुळे संसदीय आयुधे वापरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करताना धनानी यांचे कसब लागणार आहे. गुजरातमध्ये लोकसभेच्या सर्व २६ जागा भाजपकडे आहेत. त्यामुळे २०१९ लोकसभा निवडणुकीत धनानी यांची कसोटी आहे. काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावरही त्यांना लक्ष द्यावे लागेल. भाजपने विविध राज्यांमध्ये तरुण नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न चालविला असताना, काँग्रेसनेही आता गुजरातमधून या प्रयोगाला धनानींच्या रूपाने उत्तर दिले आहे.

First Published on January 25, 2018 2:34 am

Web Title: loksatta vyakti vedh paresh dhanani