12 December 2017

News Flash

पेगी अ‍ॅनेट व्हिटसन

अवकाशातील वास्तव्य हे फार जोखमीचे काम असते

लोकसत्ता टीम | Updated: April 8, 2017 2:55 AM

पेगी अ‍ॅनेट व्हिटसन

अवकाशातील वास्तव्य हे फार जोखमीचे काम असते, कारण अधिक काळ सूक्ष्म गुरुत्वासारख्या प्रतिकूल परिस्थितीत राहणे हे माणसाच्या सहनशक्तीची परीक्षा असते. पण जे अवकाशवीर अंतराळ स्थानकात वास्तव्यासाठी जातात त्यांना मुळातच त्याची आस व ध्यासही असतो. त्यामुळे ते लीलया अशी आव्हाने पेलत असतात. महिलांनीही अवकाश स्थानकात वास्तव्यात मोठी कामगिरी केली आहे, अनेक विक्रम केले आहेत. आता त्यात अमेरिकेच्या पेगी अ‍ॅनेट व्हिटसन या सर्वाधिक काळ अवकाश स्थानकात राहणाऱ्या अमेरिकी अवकाशवीराचा मान पटकावणार आहेत. एप्रिलअखेरीस हा विक्रम त्या नोंदवणार आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचा अवकाशातील मुक्काम नासाने तीन महिन्यांनी वाढवला आहे.

व्हिटसन यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये रशियाच्या सोयूझ अग्निबाणाच्या मदतीने अवकाश स्थानकाकडे झेप घेतली होती. त्या वेळी ओलेग नोव्हिटस्की व थॉमस पेसक्वेट हे सहकारी त्यांच्या समवेत होते. त्यांचे अवकाश वास्तव्य जूनमध्ये संपणार होते, त्यानुसार पेसक्वेट व नोव्हिटस्की हे परतही येणार आहेत; पण व्हिटसन यांचा मुक्काम मात्र वाढला आहे. अवकाश वास्तव्यात मला आनंद आहे, असे त्या सांगतात. अवकाश स्थानकात राहून आपण मोठे योगदान देत आहोत असेच मला वाटते. आयुष्याचा प्रत्येक क्षण मनोमन मी या कार्यात अर्पण करीत आहे. त्यामुळे आणखी तीन महिने राहायला मिळणार याचा आनंदच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अवकाश स्थानकात राहणाऱ्यांची संख्या रशियाने कमी करण्याचे ठरवल्यामुळे पेगी यांना ही संधी मिळाली आहे. येत्या २४ एप्रिलला पेगी व्हिटसन या अवकाश वास्तव्याचे ५३४ दिवस पूर्ण करणार आहेत. त्यामुळे त्या जेफ विल्यम्स यांचा विक्रम मोडणार आहेत, हा विक्रम गेल्या सप्टेंबरमध्ये विल्यम्स यांनी केला होता. नुसता एवढाच विक्रम पेगी यांच्या नावावर नाही, तर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील त्या पहिल्या अमेरिकी कमांडर आहेत व आता पुढील आठवडय़ात दुसऱ्यांदा स्थानकातील चमूचे नेतृत्व करणार आहेत. त्यांनी दुसऱ्या कुठल्याही महिलेपेक्षा जास्त स्पेसवॉक केले असून येत्या काही महिन्यांत त्या आणखी स्पेसवॉक करून त्यातही विक्रम करतील. त्यांनी अवकाश वास्तव्याच्या प्रदीर्घ मोहिमा केल्या आहेत.

व्हिटसन यांचा जन्म आयोवात माऊंट अयर येथे झाला व बेकनसफिल्ड परिसरात त्यांचे बालपण गेले. आयोवा वेसलन कॉलेजमधून त्या विज्ञानाच्या पदवीधर बनल्या. राइस विद्यापीठातून जैवरसायनशास्त्रात डॉक्टरेट केल्यानंतर जॉन्सन स्पेस सेंटर येथे त्यांनी संशोधनाचे काम सुरू केले. त्यानंतर कृग इंटरनॅशनल संशोधन गटात त्या काम करीत होत्या. मीर शटल कार्यक्रमात त्यांनी काही काळ काम केले. १९९६ मध्ये त्यांची जॉन्सन स्पेस सेंटर येथे अवकाशप्रवासासाठी उमेदवार म्हणून निवड झाली, त्याआधी त्यांनी नासात जैवरसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले होते. सोळाव्या मोहिमेत त्यांनी सुनीता विल्यम्सचा स्पेसवॉकचा विक्रम मोडला. २००२ व २००७ मध्ये त्यांनी दोन प्रदीर्घ अवकाश वास्तव्य मोहिमा केल्या. आताची म्हणजे २०१६ मधली त्यांची तिसरी मोठी मोहीम. अवकाश स्थानकात त्यांनी सूक्ष्म गुरुत्वाचे माणसावर काय परिणाम होतात याचा अभ्यास करणारे प्रयोग केले. २००८ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील चमूचे नेतृत्व केले होते. पुरुष व स्त्री अशा सर्वच अवकाशवीरांत रशियाचे गेनाडी पडालका यांचा अवकाश वास्तव्याचा विक्रम ८७९ दिवसांचा आहे, तोही विक्रम एखाद्या महिलेने मोडला तर तो सर्वात मोठा टप्पा ठरणार असून ते अशक्य नाही, हेच व्हिटसन यांच्या कामगिरीतून दिसून येत आहे.

 

First Published on April 8, 2017 2:55 am

Web Title: loksatta vyakti vedh peggy whitson