सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा, प्रभावी वक्तृत्व आणि त्याला सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड ही ज्येष्ठ समाजवादी नेत्या, विचारवंत आणि लेखिका प्रा. पुष्पा भावे यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े. विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता. रूढार्थाने मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक या नात्याने अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना केवळ हस्तिदंती मनोऱ्यात राहण्याऐवजी क्रियाशील स्वभावामुळे त्या सातत्याने समाजाशी जोडल्या गेल्या.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये भाग घेत त्यांनी ही नाळ यशस्वीपणे सांभाळली. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून आहेत. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी आहेत.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प

मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडल आयोग अशा प्रश्नांवर झालेल्या चळवळींवर पुष्पाताईंचा वैचारिक ठसा होता. आणीबाणीविरोधात लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून जन्माला आलेल्या जनता पक्षाचे पुष्पाताईंनी तडफेने काम केले. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, सतीश आळेकर या दिग्गजांना पुष्पाताई काय म्हणतात याविषयी उत्सुकता असे. रुईया महाविद्यालयातील अध्यापन क्षेत्रातून निवृत्त झाल्या तरी पुष्पाताई सामाजिक कार्यातून थांबल्या नाहीत, तर उलट सामाजिक चळवळींसाठी अधिकाधिक वेळ देता येईल याचा आनंद त्यांना होता.

२०१३ मध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठास दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास त्यांनी विरोध केला होता तो ठाकरे यांनी साहित्यिकांचा अपमान केला होता म्हणून. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मानवी हक्कांसाठी काम करणारी मेहेर संस्था अशा विविध संस्था-संघटनांमध्ये पुष्पाताई पदाधिकारी आहेत. ‘गुड मुस्लीम, बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी यांच्या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा पुष्पाताईंनी मराठी अनुवाद केला आहे. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ सामाजिक प्रश्न आणि चळवळी यांच्याशी केवळ जोडल्याच गेलेल्या नव्हे तर आधारस्तंभ राहिलेल्या पुष्पाताईंना समाजकार्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मराठवाडय़ातील ध्येयवादी संपादक अनंतराव भालेराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी पुष्पाताईंची झालेली निवड त्या पुरस्काराचाच सन्मान वाढविणारी ठरली आहे.