‘‘सध्याचे सरकार भारताला पाकिस्तानप्रमाणेच एकधर्मीय म्हणजे हिंदूधर्मीय करू पाहत आहे. यामुळे देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सर्व आपल्या लोकशाहीविरोधात आहे. हे माझ्यासारखी व्यक्ती कदापि सहन करू शकत नाही,’’ असे सांगत २०१५ मध्ये ज्येष्ठ वैज्ञानिक पुष्प मित्र भार्गव यांनी त्यांना देण्यात आलेला पद्मभूषण पुरस्कार परत केला होता. सध्या देशात सुरू असलेल्या अवैज्ञानिक वातावरणाविरोधात ९ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चालाही त्यांनी पाठिंबा दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विज्ञानवादी डॉ. भार्गव यांनी  वेळोवेळी समाजात अवैज्ञानिक वातावरण पसरवणाऱ्यांविरोधात आवाज उठवला. हा वैज्ञानिक केवळ प्रयोगशाळेत रमला नाही. म्हणूनच जीवशास्त्रज्ञ म्हणून वैज्ञानिक कारकीर्द घडविणारे भार्गव केवळ वैज्ञानिक म्हणून नव्हे तर विज्ञान कार्यकर्ता म्हणूनही ओळखले जात होते. मुरली मनोहर जोशी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री असताना त्यांनी विज्ञान शिक्षणात ज्योतिषशास्त्राचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात त्यांनी न्यायालयात दावा केला होता.  याआधी त्यांनी राजा रामण्णा आणि पी. एन. हक्सर यांच्यासोबत १९८१ मध्ये इंदिरा गांधी यांच्या विज्ञानधोरणांना आव्हान देणारा ‘अ स्टेटमेंट ऑन सायन्टिफिक टेम्पर’ या मथळय़ाखाली लेख लिहिला होता. त्यांच्या या लेखाचा दाखला आजही अनेक ठिकाणी दिला जातो. त्यांनी जीएम बियाणे आणि कुडानकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्पालाही विरोध केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळेच देशात जीएम उत्पादनांवर बंदी आणणे शक्य झाले. केवळ सरकारच नव्हे तर वैज्ञानिकांनाही त्यांनी लक्ष्य केले होते. १९९७ मध्ये त्यांनी देशात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सायन्स काँग्रेस’ला आव्हान देणारी याचिका केली होती. भारतीयांच्या मूलभूत हक्कांच्या यादीत वैज्ञानिक वातावरणाचा समावेश करण्यासाठी संविधानात करण्यात आलेल्या ४२ व्या सुधारणेत डॉ. भार्गव यांचा मोलाचा वाटा होता.

डॉ. भार्गव यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९२८ रोजी राजस्थान येथे झाला.  शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी १९४४ मध्ये त्यांनी लखनौ विद्यापीठातून गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांत पदवी मिळवली. यानंतर दोन वर्षांत अवयवासंबंधित रसायनशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी वयाच्या २१व्या वर्षी कृत्रिम अवयवांसंबंधीचे रसायनशास्त्र हा विषय घेऊन पीएच.डी. पूर्ण केली. मग त्यांनी हैदराबाद येथील केंद्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांना पोस्ट डॉक्टरेटसाठी अमेरिकेतील कर्करोग संशोधन संस्थेत जाण्याची संधी मिळाली. १९७७ मध्ये त्यांनी हैदराबाद येथे पेशीसंबंधित आण्विक जैवविज्ञान केंद्राची(सीसीएमबी)स्थापना केली. देशात वैज्ञानिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी त्यांनी १९६३ मध्ये सतीश धवन आणि अब्दुर रेहमान यांच्यासोबत काम करीत ‘सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ सायन्टिफिक टेम्पर’ या संस्थेची स्थापना केली. देशातील महत्त्वाची विज्ञान संस्था ‘सीएसआयआर’चा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार समोर आणणाऱ्या शिवा अय्यादुराई यांच्या अहवालाला डॉ. भार्गव यांनी समर्थन दिले व २००९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पत्र लिहून या अहवालाची दखल घेण्यास भाग पाडले. विज्ञान आणि विज्ञानाशी संबंधित प्रत्येक चळवळीशी डॉ. भार्गव यांचे नाव जोडले गेले आहे. यामुळेच देशातील वैज्ञानिक धोरणांमध्ये त्यांची भूमिका मोलाची ठरली आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक सच्चा विज्ञानवादी गमावला आहे.

 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyakti vedh pushpa mitra bhargava
First published on: 03-08-2017 at 04:50 IST