‘सार्वजनिक काका’ ही अस्सल पुणेरी संकल्पना ज्यांना माहिती असेल त्यांना रा. मो. हेजिब यांच्याकडे पाहून ती तंतोतंत पटावी इतके ते दिल्लीमधील मराठी सार्वजनिक जीवनाशी एकरूप झालेले होते. १९६० मध्ये महाराष्ट्राचा मंगलकलश आणल्यानंतर १९६२ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी संरक्षणमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. दिल्लीतील मराठी मंडळींसाठी एखादे सांस्कृतिक व्यासपीठ असले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले आणि त्यातूनच महाराष्ट्र सांस्कृतिक समितीची स्थापना झाली. त्यात यशवंतराव तर होतेच, डॉ. भा. कृ. केळकर, रमेश मुळगुंद आदींबरोबर हेजिबदेखील होते. म्हणजे महाराष्ट्र राज्यस्थापनेचा पहिला वर्धापन दिन आणि अलीकडे झालेला सुवर्ण महोत्सवही साजरा करण्यातही त्यांचा पुढाकार होता. गौरवर्ण व काहीशा स्थूल अंगकाठीचे हसतमुख हेजिबकाका दिल्लीतील अनेकांना आपलेसे वाटत. दिल्लीकर मराठीजनांना गेली कित्येक दशके गणेशोत्सव किंवा यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देण्यात त्यांचा पुढाकार राहिला. सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून गाजलेली मराठी नाटके, प्रख्यात कलावंत, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते आदी मराठी नामवंतांना दिल्लीत आणण्यात हेजिब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पुढाकार असायचा. यशवंतराव चव्हाण, वसंतराव साठे ते शरद पवार, नितीन गडकरी- प्रकाश जावडेकर यांच्यापर्यंत सर्व मराठी नेत्यांशी त्यांचा उत्तम संपर्क होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जन्माने पुणेकर परंतु वृत्तीने आणि अंत:करणाने सर्वस्वी दिल्लीकर असलेले हेजिब वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने लहानपणीच दिल्लीत आले आणि दिल्लीकर होऊन गेले. नीना हेजिब यांची हसतमुख साथ त्यांना सार्वजनिक जीवनातही कायम मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागात जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक आदी पदांवर त्यांनी काम केले. यातून त्यांचा जनसंपर्क वाढला. सार्वजनिक समितीच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीत मराठी नामवंत कलाकारांना दिल्लीत आवर्जून आणले. नुसतेच कार्यक्रमापुरते आणले, असे नव्हे, तर त्यांच्याशी असलेला संपर्क-मैत्रीचा दिवा कायम तेवत ठेवला. त्यांच्या स्नेहाचा हा धागा भालजी पेंढारकर, बाबासाहेब पुरंदरे, पु. ल. देशपांडे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापासून नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, बेला शेंडे व मुक्ता बर्वे यांच्यासारख्या हजारो मराठी ताऱ्यांपर्यंत चिवटपणे कायम बांधलेला राहिला. एखादा कार्यक्रम ठरविला की तो पार पडेपर्यंत त्यात झोकून देण्याची हेजिब यांची वृत्ती होती.  आपण काळाच्या कायम बरोबर राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. त्यातूनच त्यांनी निवृत्तीनंतर इंटरनेटचा वापर शिकून घेतला. नव्या पिढीचे संपर्कशास्त्र समजून घेतले आणि सामाजिक माध्यमांवर सक्रिय झाले. महाराष्ट्राच्या अर्धशतकी वाटचालीचे साक्षीदार असलेले हेजिब दिल्लीतील वाढता मराठी टक्का आणि नव्या पिढीच्या बदललेल्या संकल्पना यांचेही साक्षीदार ठरले. मात्र अलीकडे मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांकडे नवी पिढी वळत नसल्याची खंत त्यांच्या मनात असे. कार्यक्रमाला आलेल्यांना ते, मुलाला किंवा मुलीला आणले नाही का, असे आवर्जून विचारत. अगदी अलीकडे सर्वोच्च न्यायालय परिसरात लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या कार्यक्रमात व नंतरही आगामी गणेशोत्सवाचे नियोजन करणारे हेजिब यांचा उत्साह पाहता वयाच्या ७४व्या वर्षी जगाच्या रंगमंचावरून अशी अचानक ‘एग्झिट’ घेतील, असे कोणालाही वाटले नव्हते. त्यांच्या निधनाने दिल्लीतील मराठी विश्वाला ‘योजक: तत्र दुर्लभ:’ या उक्तीची शब्दश: प्रचीती आली असणार!

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyakti vedh r m hejib
First published on: 17-08-2017 at 02:28 IST