News Flash

डॉ. राजीव कुमार

नियोजन आयोग मोडीत काढून मोदी सरकारने निती आयोगाची स्थापना केली. 

देशाच्या विविध क्षेत्रांतील धोरणांची निश्चिती करण्यासाठी असलेला नियोजन आयोग मोडीत काढून मोदी सरकारने निती आयोगाची स्थापना केली.  त्याचे पहिले उपाध्यक्ष असलेले अरविंद पानगढिया यांनी कोलंबिया विद्यापीठातील अध्यापनाचे काम पुढे सुरू ठेवण्यासाठी राजीनामा दिल्याने या पदावर आता राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निती आयोगात काम करताना पानगढिया यांना अभिजन वर्गाला सोयीची धोरणे निश्चित केल्याच्या संघाच्या टीकेचे धनी व्हावे लागले, पण त्यांनी कुठल्याही दबावांना न जुमानता ध्येयधोरणांची मुहूर्तमेढ रोवली व निती आयोग या नव्या संस्थेचा पाया भक्कम केला. आता हे काम राजीव कुमार यांना पुढे न्यायचे आहे. ते मोदी यांच्या खास वर्तुळातील असले, तरी त्यांना निती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना नवी ओळख तयार करावी लागेल.

सरकारला सल्ला देणाऱ्या अनेक वैचारिक मंचांवर त्यांनी काम केलेले आहे, शिवाय अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. औद्योगिक व शैक्षणिक वर्तुळातही त्यांचे नाव आहे. पंतप्रधान मोदी यांचे राजकारण व धोरणे यावर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. ‘मोदी अ‍ॅण्ड हिज चॅलेंजेस’ हे पुस्तक त्यांनी २०१६ मध्ये लिहिले, मोदी यांच्या झंझावाताची चर्चा आता संपूर्ण जगात असून त्यांचे नेतृत्व ध्रुवीकरण करणारे आहे, त्यात काहींनी त्यांना आदर्शाचा दर्जा दिला तर काहींनी त्यांच्या हेतू व पद्धतींवर शंका घेतली, असे त्यात त्यांनी म्हटले होते. त्यांना खरी प्रसिद्धी त्यांच्या या पुस्तकांमुळे मिळाली. कुमार हे ऑक्स्फर्ड विद्यापीठाचे डी.फिल. व लखनौ विद्यापीठाचे पीएच.डी. आहेत. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे ते वरिष्ठ फेलो असून ते पुण्याच्या गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिक्स या संस्थेचे कुलपती आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री या संस्थेचे ते सरचिटणीस होते तर कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संस्थेत मुख्य अर्थतज्ज्ञ होते. कौन्सिल फॉर रीसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स या संस्थेत ते मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक होते. भारतीय बँकांतील अनुत्पादक कर्जाची समस्या, बँकिंग सुधारणा व शेती क्षेत्राची दुरवस्था अशा अनेक समस्या त्यांच्यापुढे आहेत. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे संचालक म्हणून काम केलेले असल्याने त्यांना बँकिंग क्षेत्राची सखोल माहिती आहे. त्याचा उपयोग त्यांना यात होईल. त्यांनी अर्थकारणाचा भारतीय परिप्रेक्ष्यातून अभ्यास केलेला असल्याने त्याचा फायदा आसियान, चीन, जपान व ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबरच्या मुक्त व्यापार करारात होईल.     शेतक ऱ्यांची कर्जमाफी व रोजगारनिर्मिती या दोन विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. आता त्यांना त्यांच्या या संदर्भातील संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी आहे.

कुमार यांनी नोटाबंदीला पाठिंबा दिला होता. अर्थमंत्रालयाचे सल्लागार, रिझव्‍‌र्ह बँकेचे स्वतंत्र संचालक म्हणून काम करताना त्यांना स्थूल अर्थशास्त्राचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला, त्याचा उपयोग त्यांना उपाध्यक्ष म्हणून काम करताना होणार आहे. या पदासाठी सुरेश प्रभू, माजी सचिव एन. के. सिंग, संजय मित्रा, अशोक लवासा यांच्या नावांची चर्चा होती, पण त्यात राजीव कुमार यांनी बाजी मारली. राजीव कुमार हे गेली ३५ वर्षे अर्थशास्त्रात काम करीत आहेत. या जोडीला ते सहज योगाचे साधकही आहेत. ही दीक्षा त्यांना निर्मलादेवी यांच्याकडून मिळाली व त्यांच्या दिल्लीतील सर्व कार्यक्रमांचे आयोजन तेच करीत असत. सामाजिक कार्यातही ते मागे नाहीत. त्यांनी ‘पहले इंडिया’ नावाची एक स्वयंसेवी संस्थाही स्थापन केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 12:13 am

Web Title: loksatta vyakti vedh rajiv kumar
Next Stories
1 ताहेर पूनावाला
2 दीना बंग्देल
3 पुष्प मित्र भार्गव
Just Now!
X