X

रजनीश कुमार

स्टेट बँक समूहातीलच ५९ वर्षीय रजनीश कुमार हे स्टेट बँकेचे २५वे अध्यक्ष बनले आहेत.

स्टेट बँक समूहातीलच ५९ वर्षीय रजनीश कुमार हे स्टेट बँकेचे २५वे अध्यक्ष बनले आहेत. २०० वर्षे जुन्या या बँकेच्या अरुंधती भट्टाचार्य या पहिल्या महिला अध्यक्षा. शुक्रवारी त्यांची कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर कुमार हे शनिवारी भारतातील सर्वात मोठय़ा बँकेची सूत्रे हाती घेतील.

भौतिकशास्त्रातील पदवीधारक कुमार हे तसे टेनिससारख्या खेळाचेही चाहते आहेत. अधिकारी ते अध्यक्ष असा प्रवास त्यांनी तीन दशकांच्या आत पूर्ण केला आणि तेही एकाच मान्यताप्राप्त वित्त संस्थेत. पाच सहयोगी बँका व भारतीय महिला बँकेच्या मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरणानंतर जगातील आघाडीच्या ५० बँकांमध्ये समावेश झालेल्या स्टेट बँकेचे अध्यक्षपद भूषविताना कुमार यांच्यासमोर अनोखे आव्हान आहे. रजनीश कुमार हे १९८० मध्ये स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ म्हणून रुजू झाले. स्टेट बँकेचीच गुंतवणूक बँक असलेल्या एसबीआय कॅपिटल मार्केट्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कुमार होते. तसेच स्टेट बँकेच्या कॅनडा, ब्रिटनमधील व्यवसायाची जबाबदारीही त्यांनी हाताळली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवसाय, कंपन्या तसेच किरकोळ व्यवसायाशीही ते परिचित आहेत. २०१५ मध्ये ते स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक बनले. पंतप्रधान मोदी यांच्या ‘जन धन योजना’ प्रारंभीच्या कालावधीत स्टेट बँकेत त्याची यशस्वी अंमलबजावणी कुमार यांनी केली आहे.

स्टेट बँक अध्यक्षपदासाठी जूनमध्ये झालेल्या मुलाखतीत यश मिळविणाऱ्या कुमार यांना त्यासाठी बँकेतीलच अन्य चार व्यवस्थापकीय संचालकांची स्पर्धा होती. मात्र कुमार यांना एकमताने निवडण्यात आले. ‘मालमत्ता गुणवत्ता हे एक आव्हान आहे. आणि ते सुधारण्याला आपले प्राधान्य असेल,’ असे कुमार यांचे नियुक्तीनंतर पहिले भाष्य आहे. ‘टिझर रेट’, महिलांसाठी निराळा कर्ज व्याजदर अशा बँकिंग क्षेत्रातील क्लृप्त्या प्रथमच अनुसरणाऱ्या स्टेट बँकेची ही परंपरा कुमार यांना कायम राखावी लागेल.

मोठय़ा संख्येतील खातेदार, ग्राहक यांना सुलभ, स्वस्त सेवा देणे आणि दुसरीकडे आर्थिक मंदीचा सामना करणारे उद्योग, कंपन्यांची बँक खाती योग्य रीतीने हाताळणे यासाठी कुमार यांना कसब दाखवावे लागेल. व्यवस्थापकीय संचालक म्हणून भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली कुमार हे किरकोळ व्यवसाय पाहत होते; त्यामुळे त्यांना ते अडचणीचे जाणार नाही. मुख्य स्टेट बँकेत नुकत्याच विलीन झालेल्या भारतीय महिला बँक व पाच सहयोगी बँकांमुळे झालेल्या अतिरिक्त मनुष्यबळाचे व्यवस्थापनही त्यांना पाहावे लागेल.

बँकेची ढोबळ अनुत्पादित मालमत्ता (थकीत कर्जे) जून २०१७ अखेरच्या तिमाहीत काही प्रमाणात कमी झाली असली तरी ती अद्यापही १.८८ लाख कोटी अशी चिंताजनक स्थितीतच आहे. बुडीत कर्जे वसुलीसाठी भट्टाचार्य यांच्या कारकीर्दीत मोठय़ा प्रमाणात प्रयत्न झाले. मात्र त्याला फारसे यश आले नाही.

विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्स कंपनीच्या मालमत्तांच्या लिलावाला तिसऱ्यांदाही खरेदीदार मिळाला नाही. मोठय़ा संख्येतील थकीत कर्ज असलेल्या कंपन्यांविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्टेट बँकेने आघाडी घेतली आहे. तंत्रज्ञानाची कास तेवढय़ाच उद्यमतेने धरत खासगी बँकांना जवळही न फिरकू देणाऱ्या स्टेट बँकेचा रथ तेवढय़ाच गतीने पळविण्याकरिता कुमार यांची कसोटी लागणार आहे.

 

Outbrain