15 December 2017

News Flash

रमेश देवाडीकर

झपाटलेली माणसेच इतिहास घडवतात.

लोकसत्ता टीम | Updated: August 1, 2017 3:08 AM

झपाटलेली माणसेच इतिहास घडवतात. त्यांच्यामुळेच त्या क्षेत्राची उंची वाढते. कबड्डीमहर्षी बुवा ऊर्फ शंकरराव साळवी यांच्यामुळे कबड्डी हा मराठी मातीतला सर्वसामान्यांचा खेळ आजचे सोनेरी दिवस अनुभवत आहे. त्यांच्यासारखी खेळाची निष्ठा जपलेला आणखी एक असामी म्हणजे रमेश देवाडीकर. कबड्डीच्या ध्यासापोटी घरदार, संसार, नातेवाईक आदी साऱ्यांचा त्याग करून बुवा साळवी यांनी दिलेला खेळाचा झेंडा अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी फडकत ठेवला. एक झपाटलेला कार्यकर्ता किंवा मैदानावरील कार्यकर्ता अशीच त्यांची ओळख होती. त्यामुळे देवाडीकर यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

देवाडीकर हे मूळचे कारवारचे; परंतु डोंबिवलीत आल्यावर बहीण मोहिनी देवाडीकर यांच्यामुळे ते कबड्डीकडे वळले. तसे त्यांचे शिक्षण फारसे झाले नव्हते; परंतु कार्य करण्यासाठी शिक्षणाची पात्रता मुळीच लागत नाही. डोंबिवलीच्या छत्रपती मंडळाची स्थापना त्यांनी केली. सुषमा सहस्रबुद्धे, जितेश जोशी असे कबड्डीतील अनेक हिरे या संघाने महाराष्ट्राला दिले. या संस्थेच्या यजमानपदाखाली अनेक महत्त्वाच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. हे आयोजन करताना वेळप्रसंगी ते कर्जबाजारीही झाले, कारण घेतलेले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठीची अफाट जिद्द त्यांच्यात होती. याच कार्यप्रणालीमुळे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या प्रमुख कार्यवाहपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष नकुल पाटील यांचा देवाडीकर यांच्यावर बराच विश्वास होता. मग त्यांच्या कार्याची हातोटी पाहून बुवा साळवी यांचे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी साळवींसोबत राज्य कबड्डी असोसिएशनचे संयुक्त कार्यवाह म्हणून बरीच वष्रे कार्य केले. त्यामुळेच साळवी यांच्या निधनानंतर प्रभारी सरकार्यवाह या पदासाठी सर्वानी बहुमताने देवाडीकर यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केले. नंतर झालेल्या निवडणुकीत मराठवाडय़ाची ताकद एकत्रित करून त्यांनी सरकार्यवाहपद मिळवले; परंतु या पदावर त्यांना दोन वष्रेच टिकता आले. ठाण्यातील राजकीय मंडळींनी जिल्हा संघटनेच्या निवडणुकीत त्यांना पाडले आणि मग घटनात्मक पेचप्रसंग करणारी चाल रचून त्यांना राज्याचे सरचिटणीसपद सोडायला लावले. गेली तीन वष्रे त्यांनी पालघर जिल्ह्य़ाकडे आपले लक्ष वळवले. तिथे खेळाडू घडवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले.

कृश शरीरयष्टी, बेताची उंची, झुपकेदार केस आणि साधी राहणी ही देवाडीकर यांची वैशिष्टय़े. खेळावर अखेरच्या श्वासापर्यंत निरंतर प्रेम केल्यामुळे विवाह वगैरे करायला त्यांना मुळीच फुरसत मिळाली नाही. पद असो वा नसो.. त्यामुळे देवाडीकर यांचे कार्य कधीच अडले नाही. स्पध्रेचे संयोजन, दौरे, कार्यक्रम आदी कोणत्याही जबाबदाऱ्या ते हिरिरीने सांभाळायचे. मैदान तयार करण्याच्या वेळी ते कोणताही मुलाहिजा न बाळगता स्वत: कामाला लागत. अगदी कुणी चुकल्यास साळवींप्रमाणेच ते जिथल्या तिथे रागे भरायला मागेपुढे पाहायचे नाहीत.

बुवा साळवी यांच्या हयातीत त्यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ ‘कबड्डी दिन’ साजरा करण्याची प्रथा देवाडीकर यांनीच डोंबिवलीत सर्वप्रथम सुरू केली. हा कबड्डी दिन आजतागायत १५ जुलै या दिवशी राज्यात साजरा केला जातो. बुवा साळवी यांच्याप्रमाणेच रमेश देवाडीकर म्हणजे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर एक संस्थाच होती. विविध कबड्डी मंडळांशी असलेला त्यांचा संबंध, खेळाविषयीची आस्था, आधुनिकीकरणाचा आग्रह आणि माणसांसोबत एकत्रित काम करण्याची वृत्ती यामुळेच त्यांचे जाणे कबड्डी क्षेत्राला शोकाकुल करणारे आहे.

First Published on August 1, 2017 3:08 am

Web Title: loksatta vyakti vedh ramesh devadikar