मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात ऋषितुल्य अशा काही व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे प्राचार्य रमेश सोहोनी. गणितामध्ये रमणारे प्रा. सोहोनी चांगल्या अध्यापकाबरोबरच उत्तम प्रशासक म्हणूनही शिक्षण क्षेत्रात आदर्श ठरले. धोरणी, करारी आणि मृदुभाषी ही त्यांची स्वभाव वैशिष्टय़े होती..  शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ते सातत्याने झटत राहिले. यामुळेच ते निवृत्त होऊन अनेक वष्रे झाले तरी शिक्षण क्षेत्रात कोणतीही अडचण आली की, प्राध्यापक किंवा कर्मचारी वर्ग त्यांचा सल्ला घेण्यासाठी जात असे. त्यांच्या या स्वाभावामुळेच अवघ्या २५व्या वर्षी ते मुंबई विद्यापीठात अधिसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल पाच वेळा ते अधिसभा निवडणूक जिंकत गेले आणि शिक्षकांचे प्रतिनिधित्व करत राहिले. याच कालावधीत विद्यापीठाच्या कार्यकारी (आताची व्यवस्थापन) परिषदेवर त्यांची निवड झाली. तेथे त्यांनी तब्बल १५हून अधिक वष्रे काम केले.

महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण लागू करण्याच्या नियमांची अंमलबाजवणी करण्यात सोहोनी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही प्रक्रिया सुलभ कशी होईल यासाठी त्यांनी काही कठोर नियमही तयार केले. त्या काळात महाविद्यालये शिक्षक किंवा कर्मचारी भरतीच्या जाहिराती त्यांच्या स्तरावर काढत असे व नियुक्ती करून तो तपशील विद्यापीठाकडे पाठवीत असे. मात्र या नियुक्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत यासाठी सोहोनी यांनी महाविद्यालयांनी जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी विद्यापीठाची परवानगी घेण्याची सक्ती केली. हा नियम सध्याही लागू असून यामुळे नियुक्त्यांमधील गैरप्रकार कमी झाले व योग्य उमेदवाराला नियुक्ती मिळू लागली.

रुपारेल महाविद्यालयात काही वष्रे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर १९६१मध्ये पूर्वीचे पार्ले व आताच्या साठय़े महाविद्यालयात ते रुजू झाले. गणितावर नितांत प्रेम करणारे सोहोनी या विषयात पारंगतही होते. त्यांनी केवळ विद्यार्थीच नव्हे तर अनेक शिक्षकांनाही घडविले. गणितातील विविध पैलूंवर त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत.  सोहोनी यांची योग्यता ओळखून संस्थेने त्यांच्याकडे प्राचार्यपदाची सूत्रे दिली. एक दशकाहून अधिक काळ त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषविले. या कालावधीत त्यांनी कडक शिस्तीने संस्थेचे काम चालविले. त्यांची शिस्त एवढी होती की कामे बिनचूक करण्याची सवयच त्या वेळच्या कर्मचाऱ्यांना लागल्याची आठवण सांगितली जाते. त्यांच्या काळात महाविद्यालयाला नवी झळाळी मिळाली. त्यांनी अनेक नवीन उपक्रम सुरू केले याचबरोबर महाविद्यालयाची नवी इमारतही उभी केली. त्या काळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मेहेरू बेंगॉली, डॉ. माधवराव गोरे, डॉ. स्नेहलता देशमुख यांनीही अनेकदा सोहोनी यांची मदत घेऊन विद्यापीठासमोर उभ्या असलेल्या अनेक अडचणी सोडविल्या आहेत.  निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेतून त्यांनी एक न्यास स्थापन केला. गरजू प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी त्या निधीचा वापर केला जाऊ लागला. सोहोनी यांचा मुंबई विद्यापीठाच्या जडण-घडणीत मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाने मुंबईच्या शिक्षण क्षेत्रातील एका ध्येयनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ पर्वाची सांगता झाली..