12 December 2017

News Flash

रॉबर्ट टेलर

वास्तव अर्थाने ते वैज्ञानिक होते असे नाही.

लोकसत्ता टीम | Updated: April 17, 2017 12:25 AM

वास्तव अर्थाने ते वैज्ञानिक होते असे नाही. त्यांच्या नावाने पेटंट्स नव्हती, पण संशोधनाचे नियोजन त्यांनी ज्या पद्धतीने केले त्यातून आज संगणकाचे आधुनिक जग आपण पाहात आहोत. इंटरनेटच्या निर्मितीचे श्रेय तसे अनेकांना जाते, पण ते त्यांना फारसे दिले गेले नाही, तरी त्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे नाव रॉबर्ट टेलर. पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी आधुनिक संगणक विज्ञानाला नव्या दिशेने वाटचाल करायला लावली.

१९६६ मध्ये अर्पा म्हणजे पेंटॅगॉनच्या अ‍ॅडव्हान्स्ड रीसर्च प्रोजेक्ट्स या संस्थेत असताना त्यांना अकार्यक्षम संदेशवहनाचा वैताग आला होता. तेथे सहकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना तीन वेगळे संगणक वापरावे लागत होते, त्यातून त्यांना संगणक प्रणाली एकमेकांना जोडण्याची म्हणजे इंटरनेटची कल्पना सुचली. त्यातूनच आधी अर्पानेट व नंतर इंटरनेटचा जन्म झाला. त्यासाठी टेलर यांनी स्टॅनफर्डचे बिल डुवाल, कॅलिफोर्निया विद्यापीठाचे लेन क्लेनरॉक व प्रोग्रॅमर चार्ली क्लाइन यांना एकत्र आणले. त्यात चार्लीने २९ ऑगस्ट १९६९ रोजी पहिला संदेश एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाकडे पाठवण्याचा प्रयोग केला. तो संदेश मेन्लो पार्क येथे स्टॅनफर्ड रीसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये बसलेल्या डुवॉल यांना मिळाला होता. अर्पाचे प्रमुख चार्ली हेर्झफिल्ड यांच्याकडे संगणक जोडण्याची कल्पना टेलर यांनी मांडली ती हेर्झफिल्ड यांना एकदम आवडली व त्यांनी अमेरिकेच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रकल्पातील लाखो डॉलरचा निधी इंटरनेटनिर्मितीकडे वळवला होता.

टाइप कमांडरऐवजी आयकॉन्स वापराचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांनी अनेक व्यक्तिगत वर्कस्टेशन्सही तयार केली होती. ते विज्ञानवादाइतकेच मानवतावादाला महत्त्व देणारे होते. अल्टो संगणकासाठी त्यांनी मोठे काम केले होते. त्यासाठी निधीही त्यांनी मिळवला. तो व्यक्तिगत संगणकाचा प्रयोग होता. संगणकाचा माऊस डग्लस एंजलबर्ट यांनी तयार केला. नासात काम करीत असतानाच त्यांना एंजलबर्ट यांचे कार्य समजताच त्यांनी त्याचे महत्त्व ओळखून द्रष्टेपणाने मोठा निधी त्यांच्या संशोधनाकडे वळवला. केनेडी प्रशासन मानवाला चंद्रावर पाठवण्यात गुंतले असताना लिकलायडर नावाचे टेलर यांचे एक मानसशास्त्रज्ञ व संगणक वैज्ञानिक मित्र होते, त्यांनी मॅन-कॉम्प्युटर सिम्बायोसिस नावाचा संशोधन निबंध लिहिला होता. तेच इंटरनेट व व्यक्तिगत संगणकनिर्मितीचे खरे मूळ होते. त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानवशास्त्राचीही चर्चा केलेली होती. रॉबर्ट विल्यम टेलर यांचा जन्म १० फेब्रुवारी १९३२ रोजी डल्लास येथे झाला. ऑस्टिनच्या टेक्सास विद्यापीठात प्रायोगिक मानसशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. तेथेच त्यांना माणूस-संगणक यांच्या संबंधाच्या अभ्यासाची गोडी लागली. १९६९ मध्ये पेंटगॉन सोडल्यानंतर झेरॉक्स पालो अस्टो संशोधन केंद्रात त्यांनी काम केले. तेथेच अल्टो या व्यक्तिगत संगणकाचा जन्म झाला. लेसर प्रिंटरचा शोधही तेथेच लागला. भविष्यातील कार्यालय कसे असेल हे टेलर यांच्या गटाने तेथे दाखवून दिले. पहिला वर्ड प्रोसेसिंग प्रोग्रॅम तयार करणारे व नंतर मायक्रोसॉफ्टमध्ये गेलेले चार्लस सिमोनी यांनीही अनेक कल्पना टेलर यांच्या गटाकडूनच घेतल्या होत्या. १९९० मध्ये टेलर यांनी डिजिटल इक्विपमेंट सिस्टम्स रीसर्च लॅबोरेटरी पालो अल्टोत स्थापन केली, त्यात अल्टाव्हिस्टा या पहिल्या इंटरनेट शोधयंत्राची निर्मिती झाली. संगणक विज्ञानातील नवे तंत्रज्ञान निर्माण करतानाच त्यांनी नवीन संकल्पना असलेली वैज्ञानिकांची पिढीही तयार केली. हेच त्यांचे मोठे काम होते. त्यांच्या निधनाने संगणक विज्ञानातील एका युगाचा अस्त झाला..

 

First Published on April 17, 2017 12:25 am

Web Title: loksatta vyakti vedh robert taylor