23 April 2019

News Flash

प्रा. रुस्तुम अचलखांब

जालना जिल्ह्यतील मानेगाव येथे अचलखांब यांचा जन्म झाला.

कलाक्षेत्रामध्ये संशोधन करणारा माणूस सादरीकरणात कमी पडतो आणि सादरीकरण करणारे संशोधनाच्या वाटेलाच जात नाहीत. लोककलेच्या क्षेत्रात या दोन्हींचा अजोड मिलाफ म्हणजे प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब. मराठी मुलखातील शाहिरीची परंपरा अभ्यासून त्यातील आठवणींच्या पातळीवर जीर्ण-शीर्ण पण महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचे संशोधन करणाऱ्यांच्या अग्रस्थानी प्रा. अचलखांब यांचे नाव घ्यावे लागेल. मराठी माणसावर तमाशाचा प्रभाव. पण त्यातील माणसे आणि त्यांचे जगणे यावर मात्र फारसे कोणी बोलायचे नाही, अशा काळात अचलखांब यांनी काम केले.

जालना जिल्ह्यतील मानेगाव येथे अचलखांब यांचा जन्म झाला. मोठय़ा कष्टात त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे बालपण आणि शिक्षणासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता याचा ऊहापोह ‘गावकी’ या त्यांच्या आत्मकथनामध्ये ठसठशीतपणे दिसून येतो. तमाशा कलावंतांच्या मुलाखती घेण्यापासून ते शाहिरी परंपरेने नक्की काय दिले आहे, हे जाणून घेण्यासाठी अचलखांब यांचे साहित्य आजही अभ्यासक आवर्जून वाचतात. भाऊ फक्कड, शिवा-संभा, भाऊ-बापू आणि पवळाबाई यांनी शाहिरीची परंपरा समृद्ध केली, हे मानणारा आणि त्याचे श्रेय जाहीरपणे सांगणाऱ्यामध्ये अचलखांब मराठवाडय़ात अग्रभागी होते.  बोली, भाषा, लकबी आणि त्याची धाटण माहीत असणारा, त्याचे सादरीकरण करणारी ही व्यक्ती तशी स्वभावाने फटकळ. पण विचारांच्या कक्षा विस्तारलेल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बारकाईने वाचून त्यावर मते व्यक्त करताना त्यांची प्रतिभा अधिक उजळून निघत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम करताना अचलखांब यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांनी ७० नाटकांचे दिग्दर्शन केले. गाढवाचे लग्न, संगीत सौभद्र, एकच प्याला यांसह विविध नाटय़प्रयोग करणाऱ्या अचलखांब यांचा कल मात्र संशोधनाचा होता. कैफियत हे नाटक, रंगबाजी अभिनयशास्त्र, तृतीय नाटकाचा पहिला प्रयोग, आंबेडकरी शाहिरीचे नवे रंग असे साहित्य आणि नाटय़क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोग लक्षणीय आहेत. जालना जिल्ह्यतील विदर्भाला लागून असणाऱ्या गावांची बोली भाषा निराळी आहे. ती जाणून घ्यायची असेल तसेच सामाजिक उतरंड समजून घेण्यासाठी त्यांचे ‘गावकी’ यांचे आत्मकथन उपयोगी ठरणारे आहे. ‘अस्मितादर्श’ चे लेखक होणे हे मराठवाडय़ात मानाचे मानले जाते. गंगाधर पानतावणे यांनी अचलखांब यांच्याकडून अनेक विषयांवर लिखाण करून घेतले. भारतीय, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रंगभूमीचाही त्यांनी अभ्यास केला होता. डॉ. यू. म. पठाण, प्रा. एस. एस. भोसले या प्राध्यापकांनी प्रा. अचलखांब यांना लिहिते केले.  पठ्ठे बापूराव यांची दुसरी पत्नी पवळा यांच्यावर अचलखांब यांनी केलेले संशोधन महत्त्वपूर्ण मानले जाते. लोककलावंत दुर्लक्षित होऊ नये, ती कला जिवंत राहायला हवी, त्यातील माणसे सांस्कृतिकदृष्टय़ा अधिक प्रगल्भ असतात असा संदेश देत जगणाऱ्या अचलखांब यांचे आयुष्य या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी प्रेरणा देणारे ठरेल. दुर्लक्षित कलाकरांना शोधणे, ते म्हणत असणारे काव्य, त्याच्या चाली याच्या नोंदी करून घेणे, त्या चाली आणि ती कला जशास तशी मध्यमवर्गीय माणसापर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी संगीत मनमोहन नावाचा प्रयोग केला. पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याचे सादरीकरण करण्यासाठीचा चमू उभा करणे, याकरिता अचलखांब यांनी घेतलेली मेहनत  विसरता येणार नाही. त्यांच्या निधनाने लोककला आणि मराठवाडय़ातील रंगभूमीची मोठी हानी झाली आहे.

First Published on October 26, 2017 4:53 am

Web Title: loksatta vyakti vedh rustum achalkhamb