भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने गेल्या वर्षी एकाच वेळी १०४ उपग्रह सोडण्याचा विक्रम केला होता. याशिवाय चांद्रयान, मंगळ मोहिमेसह अनेक मोहिमा इस्रोने यशस्वीपणे व कमी खर्चात पार पाडल्या. अनेक व्यावसायिक उपक्रम राबवून इस्रोची आर्थिक क्षमता वाढत आहे. सरकारवरचे अवलंबित्व कमी होत आहे.  इस्रोकडे चांगल्या बुद्धिमान व समर्पण वृत्तीच्या वैज्ञानिकांची कमी नाही. ज्या १०४ उपग्रह सोडण्याच्या मोहिमेचा वर उल्लेख केला आहे त्यात सहभागी वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे एस.सोमनाथ. त्यांच्याकडे आता विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या संचालकपदाची धुरा देण्यात आली आहे

सोमनाथ हे या केंद्राचे माजी सहायक संचालक असून सध्या ते लिक्विड प्रॉपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक आहेत. इस्रोपुढे जीएसएलव्ही म्हणजे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी करण्याचे जे मोठे आव्हान होते ते पेलण्यात सोमनाथ यांचा मोठा वाटा आहे. डिसेंबर २०१४ मध्ये जीएसएलव्ही एमके ३ या प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी झाले होते, त्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

सोमनाथ हे मूळचे केरळचे. त्यांचे शिक्षण बेंगळूरु येथील आयआयएस्सी या संस्थेत झाले. तेथे त्यांना हवाई अभियांत्रिकीत सुवर्णपदक मिळाले होते. त्यापूर्वी त्यांनी कोलमच्या टीकेएम अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली. अमेरिकेच्या दबावामुळे रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिने व त्याचे तंत्रज्ञान नाकारले. त्यानंतर जेव्हा देशातच क्रायोजेनिक इंजिने तयार करण्याचा संकल्प करण्यात आला त्यात सोमनाथ सहभागी होते. सध्या त्यांच्यापुढे पुढील महिन्यात होणाऱ्या दोन उड्डाणांचे आव्हान आहे. जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकाच्या आणखी यशस्वी चाचण्या घेण्याला त्यांचे प्राधान्य असणार आहे. कारण आपली चांद्रयान दोन मोहीम ही एप्रिलमध्ये होण्याची शक्यता असून त्यात जीएसएलव्ही मार्क ३ हा जास्त ताकदवान प्रक्षेपक वापरण्याची योजना आहे. यात दोनशे टनांचे निम्न क्रायोजेनिक इंजिन वापरले जाणार असून त्याच्या निर्मितीत सोमनाथ यांची कामगिरी महत्त्वाची आहे. १९८५ मध्ये इस्रोत दाखल झाल्यानंतर त्यांनी पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, क्रायोजेनिक इंजिने, द्रव इंधनावर चालणारे प्रक्षेपक या अनेक प्रकल्पांत काम केले आहे. अ‍ॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अवकाश सुवर्णपदक, इस्रोचा उत्तम गुणवत्ता पुरस्कार, सामूहिक नेतृत्व पुरस्कार त्यांना मिळाला. इंडियन नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग, एरॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, अ‍ॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांचे ते फेलो आहेत.