News Flash

एस. सुकुमारन

मल्याळी साहित्यिक म्हणजे एम. सुकुमारन.

जीवनातील सर्व समस्यांवर तोडगा म्हणून कम्युनिस्ट विचारसरणीला आपलेसे त्यांनी केले खरे, पण कालांतराने त्यांना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षात उणिवा दिसल्या त्या त्यांनी साहित्याच्या माध्यमातून मांडल्या, त्यामुळे त्यांना काही कम्युनिस्ट नेत्यांनी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. सर्वच पक्ष लोकशाहीचा आव आणतात, पण उणिवा स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. कम्युनिस्ट पक्षातील उणिवा दाखवण्याचे धारिष्टय़ करणारे हे मल्याळी साहित्यिक म्हणजे एम. सुकुमारन.

कट्टर कॉम्रेड असूनही त्यांना माकपमधील उणिवा दिसल्या व त्या दूर न करण्याचे परिणाम आपण आधी पश्चिम बंगाल व नंतर त्रिपुरात पाहिले आहेत. पक्षातील उणिवा दाखवण्यासाठी त्यांनी १९७९ मध्ये ‘शेषक्रिया’ ही कादंबरी लिहिली होती. ती ‘कला कौमुदी’ या मल्याळी नियतकालिकात मालिका रूपाने प्रसिद्ध होत असतानाच कम्युनिस्ट नेत्यांनी ती थांबवण्यासाठी प्रकाशकांनाही धमकी दिली होती. सुकुमारन यांना ठार मारण्याची धमकी देऊन पक्षातून काढण्यात आले. त्यामुळे १९८२ मध्ये त्यांनी काही काळ लेखन सोडले होते. नंतर ‘पितृतर्पणम’ ही लघुकथा त्यांनी १९९२ मध्ये व ‘जनीथाकम’ (जेनेटिक्स) ही लघुकादंबरी १९९४ मध्ये लिहिली, नंतर ते पुन्हा कोशात गेले. केरळात कलाकार, साहित्यिकांना कराव्या लागणाऱ्या संघर्षांचे ते एक उदाहरण होते. अभिव्यक्तिस्वातंत्र्य की कम्युनिस्ट विचारसरणी यातून निवड करण्याची वेळ त्यांच्यावर आली त्यात त्यांनी अभिव्यक्र्तीला अग्रक्रम दिला. त्यांचा जन्म पल्लकडमधील चित्तूरचा. त्यांना माध्यमिक शाळेच्या पुढचे शिक्षण घेता आले नाही.  सुकुमारन हे कम्युनिस्ट असण्याबरोबरच मानवतावादी होते. त्यांनी संपत्ती जमवली नाही. ‘शेषक्रिया’ कादंबरी लिहिल्यामुळे त्यांना पक्षातून जावे लागले.  कुंजायप्पन या दलित पात्राच्या माध्यमातून त्यांनी या कादंबरीत कम्युनिस्ट पक्षातील दोष दाखवले. यातील कुंजायप्पन शेवटी दारिद्रय़ाला कंटाळून आत्महत्या करतो हे कम्युनिस्ट विचारसरणीचे अपयश होते. त्यांनी ‘माध्यमम’ या नियतकालिकाला असे सांगितले होते की, कुणी एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मी पात्रांची रचना करीत नाही, तर त्या कादंबरीत नोकरीच्या ठिकाणी जी माणसे भेटली त्यांची ती गुंफण आहे. त्यांना ‘मरिचितिल्लावरुदे समराकांगल’ या पुस्तकासाठी १९७६ मध्ये व ‘जनीथाकम’ पुस्तकासाठी १९९४  मध्ये असा दोनदा केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना चुवना चिहनांगल या लघुकथा संग्रहासाठी २००६ मध्ये मिळाला होता. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लेखक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 2:42 am

Web Title: loksatta vyakti vedh s sukumaran
Next Stories
1 प्रा. मार्गारेट मुरनन
2 आशा बगे
3 नील बसू
Just Now!
X