मोठय़ा कॉर्पोरेट्सचे शिवधनुष्य पेलण्यासाठी नेमलेल्या तरुण-तुर्काची कारकीर्द अल्पजीवी ठरण्याची दोन ठळक उदाहरणे गेल्या वर्षभरात आपल्याकडे दिसून आली आहेत. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून गेल्या वर्षी सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी झाली. तर या वर्षी इन्फोसिसच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदावरून विशाल सिक्का यांना राजीनामा द्यावा लागला. दोन्ही घटनांमध्ये एक समान दुवा निश्चित आहे. मिस्त्री आणि सिक्का यांच्यावर अनुक्रमे रतन टाटा आणि एस. नारायण मूर्ती यांनी निर्माण केलेल्या वलयास पात्र ठरण्याची जणू अतिरिक्त जबाबदारी होती. अखेरीस दोघांवरही त्यांचे पुराणपुरुष नाराज झाले आणि त्यांना जावे लागले. सिक्का गेल्यानंतर इन्फोसिसची हंगामी धुरा मूळ प्रणेते-प्रवर्तकांपैकी एक नंदन नीलेकणी यांच्यावर होती. त्यांच्याकडून ती धुरा आता सलील पारेख यांच्यावर आली आहे. म्हणजे एका अर्थाने पारेख यांच्यावर नारायण मूर्ती आणि नीलेकणी या दोहोंच्या वलयाचे वजन आहे.

पारेख (वय ५३ वर्षे) हे तरुण-तुर्क नाहीत. शिवाय इन्फोसिसबाहेरचे आहेत. यापूर्वी ते कॅपजेमिनी या फ्रेंच आयटी कंपनीचे संचालक होते. त्यांची निवड होण्यामागची कारणे अनेक आहेत. गेल्या दोनेक वर्षांत भारतीय आयटी उद्योगाच्या निर्यातीला आणि परदेशस्थ कारभाराला आर्थिक आणि राजकीय अशा दोन्ही कारणांमुळे फटका बसलेला आहे. नोकरकपातीचे संकट आयटी उद्योगावर सर्वाधिक गहिरे आहे. याचे कारण म्हणजे या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी कालसुसंगत राहणे अत्यावश्यक असते. कालसुसंगत नैपुण्य मिळवण्यासाठी भारतीय आयटी कामगार, शिक्षण संस्था, उद्योग यांची आणीबाणीची लढाई सुरू आहे. आजचे तंत्रज्ञान पूर्वी काही वर्षांत कालबाह्य़ ठरत होते. आज ते वर्षांगणिक आणि महिनोगणिक कालबाह्य़ ठरू लागले आहे. अशा परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उभे करणे, ते टिकवणे, या मनुष्यबळासाठी नवीन बाजारपेठा (युरोप आणि अमेरिकेतल्या) काबीज करणे किंवा निर्माण करणे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, वेळोवेळी यशस्वी विलीनीकरण आणि अधिग्रहण करत राहणे या सगळ्यासाठी एक जगड्व्याळी द्रष्टेपण आवश्यक बनले आहे. आयटी उद्योगातील वारंवार येणाऱ्या भूकंपांमुळे नोकरकपातीचे त्सुनामी उसळत आहेत. विशाल सिक्का यांची धोरणे इन्फोसिसच्या धुरिणांना असंवेदनशील वाटली. टाटा आणि नारायण मूर्ती हे दोघेही मानवी भांडवलाविषयी विशेष आस्था असणारे होते. नोकरकपात ही शिस्तबद्ध आणि संवेदनशील असावी याविषयी दोघेही आग्रही असतात. सिक्कांनी काही उच्चपदस्थांना नारळ देताना दिलेले बिदागीसदृश ‘सेवानियुक्ती वेतन’ (सेव्हरन्स पॅकेज) नारायण मूर्ती यांच्या नजरेत बेसुमार उधळपट्टीचे ठरले होते. या निसरडय़ा वाटा टाळण्याची मोठी जबाबदारी  पारेख यांच्यावर राहील. त्यांना युरोप आणि अमेरिकेतील बाजारपेठांची नेमकी जाण आहे. त्याचबरोबर एतद्देशीय परिस्थितीचे भानही आहे. २०१५ मध्ये आय-गेट या आयटी कंपनीचे अधिग्रहण हे त्यांच्या कारकीर्दीतले मोरपीस ठरले. गेली १७ वर्षे ते कॅपजेमिनीमध्ये महत्त्वाची पदे भूषवत होते. आज या कंपनीचे भारतात एक लाख आणि जगात साधारण दोन लाख नोकरदार आहेत, यात पारेख यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.  आधुनिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे मानल्या गेलेल्या अधिग्रहण कौशल्याचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. मितभाषी व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धिपराङ्मुखता ही कदाचित त्यांची अतिरिक्त परंतु महत्त्वाची वैशिष्टय़े ठरली असावीत! आजही इन्फोसिसचे ७० टक्के उत्पन्न अमेरिकी बाजारपेठेत सुनिश्चित होते. ट्रम्प-युगात ते टिकवणे आणि वाढवणे यातील पारेख यांचे यशापयश कंपनीच्या भवितव्याच्या दृष्टीनेच निर्णायक ठरू शकते.