23 November 2017

News Flash

संजय कुमार

देशाच्या संरक्षणासाठी लष्कर, नौदल आणि वायुदलातील जवान सेवा बजावत असतात.

लोकसत्ता टीम | Updated: July 13, 2017 4:18 AM

देशाच्या संरक्षणासाठी लष्कर, नौदल आणि वायुदलातील जवान  सेवा बजावत असतात. तर अंतर्गत सुरक्षेसाठी केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारीतील सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल,  राष्ट्रीय सुरक्षा दल अशा विविध यंत्रणा कार्यरत आहेत. गेल्या दहा वर्षांत यात भर पडली ती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची म्हणजेच ‘एनडीआरएफ’ची. देशात अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात लोकांच्या मदतीला तातडीने धावून जाणे हे या दलाचे प्रमुख कार्य. हरयाणाचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांची अलीकडेच या दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

पावसाळ्यात विविध नद्यांना येणारे पूर, ढगफुटी, भूस्खलन, दरडी कोसळणे अशा प्रकारची संकटे येत असतात. अशा वेळी घटनास्थळी त्वरेने पोहोचणे आणि कमीत कमी जीवित व वित्तहानी होईल याकडे या दलास लक्ष द्यावे लागत असल्याने पोलीस सेवेत हे पद महत्त्वाचे मानले जाते. भारतीय पोलीस सेवेच्या १९८५ च्या तुकडीतील हरयाणा केडरचे अधिकारी असलेल्या संजय कुमार यांनी राज्यात विविध पदे भूषविली आहेत. कुलू येथे पोलीस अधीक्षक, सिमला परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अशा पदांवर कुशलतेने काम केल्यानंतर केंद्रात त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. काही काळ ते केंद्रीय राखीव पोलीस दलात होते. रेल्वे मंत्रालयात मुख्य दक्षता अधिकारी या पदावर असताना रेल्वेचे एजंट आणि काही कर्मचाऱ्यांचे साटेलोटे उघडकीस आणून कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई त्यांनी केली होती. आयपीएस पोलीस अधिकारी म्हणजे वातानुकूलित दालनात बसून आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना नुसते आदेश देणे नव्हे, हे त्यांनी विविध जिल्ह्य़ांत सेवा बजावताना दाखवून दिले. दररोज दोन तास ते सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यासाठी राखून ठेवत. या काळात राजकीय नेते आले तरी त्यांना प्रतीक्षालयातच थांबावे लागत असे. अपर पोलीस महासंचालक असताना राज्याची सर्व पोलीस ठाणी ऑनलाइन व्हावीत यासाठी त्यांनी गृह मंत्रालयातून विशेष निधी मंजूर करवून आणला होता. पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवणे, पासपोर्टसाठी लागणारा पोलीस पडताळणी अहवाल ऑनलाइन पाठवणे यांसारखे विधायक उपक्रम राज्यात त्यांनी राबवल्याने जनतेत ते लोकप्रिय बनले. निस्पृह व सचोटीचा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा असल्यामुळेच राज्याच्या पोलीस महासंचालपदी त्यांची नियुक्ती करताना दोन अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून सरकारने त्यांनाच बढती दिली. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या निवृत्तीस काही महिन्यांचाच कालावधी उरलेला असतानाही त्यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या महासंचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दिल्लीत प्रतिनियुक्तीवर असताना गृह खात्यांतील वरिष्ठांशी त्यांचा निकटचा संबंध आला होता. या दलाचे आधीचे प्रमुख आर. के. पचनंदा यांची बदली झाल्यानंतर मग त्यांच्या जागी कोणाला नेमायचे याचा शोध घेण्याची आवश्यकताच उरली नाही.आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार २००६ मध्ये ‘एनडीआरएफ’ची स्थापना करण्यात आली. विविध राज्यांत या दलाच्या १२ बटालियन्स कार्यरत असून आजमितीस १३ हजार जवान यात कार्यरत आहेत. नैसर्गिक आपत्तींबरोबर जैविक वा रासायनिकअस्त्रांचा हल्ला झाला तरी त्यास समर्थपणे तोंड देता यावे याचे दलातील जवानांना प्रशिक्षण दिलेले असते. अशा या दलाचे प्रमुखपद देऊन सरकारने संजय कुमार यांच्या आजवरच्या सेवेचा गौरवच केला आहे.

 

First Published on July 13, 2017 4:18 am

Web Title: loksatta vyakti vedh sanjay kumar