X

संजीव सिन्हा

 गोदरेजसहित अनेक नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या बहुचर्चित बुलेट ट्रेन योजनेचा पायाभरणी समारंभ गुरुवारी गुजरातमधील साबरमती स्थानकानजीक होत असताना अशा प्रकल्पांची देशाला खरेच गरज आहे का, या महागडय़ा गाडीतून गोरगरिबांना प्रवास करता येणार आहे का, अशी चर्चा देशात सुरू असली तरी जपान सरकारने या प्रकल्पासाठी नेमलेले मुख्य सल्लागार संजीव सिन्हा मात्र अत्यंत साध्या आणि निम्न मध्यवर्गीय कुटुंबातून आले आहेत. राजस्थानच्या दुष्काळग्रस्त बाडमेर शहरातून आयआयटीचे अभियंता झालेले ते पहिलेच असून त्यांच्या या प्रसिद्धीने या शहरात सध्या आनंदीआनंद पसरला आहे.

मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या या बुलेट ट्रेनचा अंदाजित खर्च या घडीला १ लाख कोटी एवढा असून यातील ९० टक्के रक्कम जपानकडून आपल्याला कर्जरूपात मिळणार आहे. तासाला २८५ किलोमीटरचे अंतर पार करणाऱ्या या अतिजलद रेल्वेमार्गाच्या उभारणीची जबाबदारी मिळालेले संजीव सिन्हा अवघे ४४ वर्षांचे आहेत. २१ जानेवारी १९७३ ही त्यांची जन्म तारीख. अत्यंत बुद्धिमान असलेले संजीव दहावीच्या परीक्षेत राज्यातून अव्वल तर बारावीच्या परीक्षेत  आठवे आले. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने कोणतीही शिकवणी न लावता स्वत:च अभ्यास करून त्यांनी हे यश मिळवले. जेईईची प्रवेश परीक्षाही ते स्वयंअध्ययनातून उत्तीर्ण झाले. मग गुणवत्तेवर आयआयटी कानपूरमध्ये त्यांना प्रवेश मिळाला खरा, पण त्यासाठी लागणारे शैक्षणिक शुल्क तसेच अन्य खर्च करण्याची कुवत वडिलांची नव्हतीच. पैशांची जमवाजमव होणे अशक्य दिसत असल्याने त्यांनी आयआयटीत न जाण्याचे ठरवले होते, पण एका बँकेने वडिलांना कर्ज देण्यास होकार दिल्याने त्यांचे आयआयटीत जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले. येथून पदवी घेतल्यानंतर त्यांनी आवडीच्या पदार्थविज्ञान शास्त्रातील पदव्युत्तर पदवी मिळवली.

गोदरेजसहित अनेक नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले. नंतर ते जनरल टेक कॉर्पोरेशनमध्ये रुजू होण्यासाठी टोकियोत गेले. तेथे त्यांनी वित्तीय व्यवस्थापनातील पदवीही मिळवली. यानंतर त्यांनी गोल्डमन, मिझुहो सिक्युरिटीज यांसारख्या जपानी कंपन्यांत महत्त्वाची पदे भूषवली. टाटा अ‍ॅसेट मॅनेजमेंट तसेच टाटा रिअल्टी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी जपानमधील मुख्य प्रतिनिधी म्हणून काम केले. सिन्हा हे अनेक वर्षांपासून जपानमध्ये वास्तव्यास असून त्यांची पत्नीही जपानीच आहे.

‘भारतासारख्या देशात बुलेट ट्रेनची उभारणी हे फार मोठे आव्हानात्मक काम आहे. भारत आणि जपान या सरकारांमधील मुख्य दुवा वा सेतूसारखे काम मला करावे लागेल. हा प्रकल्प दोन्ही सरकारांसाठी जेवढा प्रतिष्ठेचा आहे, तेवढाच तो गुंतागुंतीचाही आहे याची मला जाणीव आहे. राजकीय इच्छा असली तरी तिला मूर्त रूप देणे कठीण असते. प्रकल्पासाठी भूसंपादन ते इंग्रजी भाषा जाणणारे कामगार, कर्मचारी मिळवणे वाटते तेवढे सोपे नाही. जपानने आपल्या देशात बुलेट ट्रेनचे अनेक प्रकल्प पूर्ण केले असले तरी तैवान वगळता अन्य बाहेरच्या देशांत ही सुसाट वेगाने धावणारी रेल्वे आम्ही उभारलेली नाही. भारतीय रेल्वेचे जाळे खूप विस्तारले असले तरी विकसित देशांच्या तुलनेत ही रेल्वे खूप मागे आहे. त्यामुळे आपल्याला अत्याधुनिक रेल्वे देशात आणावीच लागेल,’ असे सिन्हा म्हणतात. त्यांच्या प्रयत्नांना कसे यश मिळते ते येणाऱ्या काळात दिसेलच..