25 September 2020

News Flash

शोभना कामिनेनी

‘सीआयआय’ अर्थात ‘भारतीय औद्योगिक महासंघ’

‘सीआयआय’ अर्थात ‘भारतीय औद्योगिक महासंघ’ ही उद्योग जगताची सर्वोच्च व देशव्यापी संघटना. या बिगरसरकारी उद्योग संघटनेच्या अध्यक्षपदासारख्या सर्वोच्च पदावर शोभना कामिनेनी यांची निवड झाली आहे. ५६ वर्षीय शोभना यांची निवड देशात वस्तू व सेवा करप्रणाली लागू होणाऱ्या वर्षांत होत आहे, या दृष्टीने महत्त्वाची आहे.

दक्षिणेत विशेष लोकप्रिय असलेल्या व रुग्णालय साखळीचे विस्तृत जाळे असलेल्या अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइजेसच्या शोभना या कार्यकारी उपाध्यक्षा आहेत. आघाडीच्या संघटनेच्या अध्यक्षपदावर विराजमान होणाऱ्या शोभना या पहिल्या महिला आहेत. शोभना यांच्या रूपात संघटनेला तिच्या स्थापनेपासून, १८९५ पासून प्रथमच महिला नेतृत्व लाभले आहे. अपोलो हॉस्पिटलचे संस्थापक व अध्यक्षा डॉ. प्रताप रेड्डी यांची शोभना ही तिसरी कन्या. चेन्नईच्या स्टेला मॅरिस महाविद्यालयातून अर्थशास्त्रातील स्नातक पदवी घेणाऱ्या शोभना यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून रुग्णालय व्यवस्थापन विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ‘सीआयआय’च्या दक्षिणेतील शाखांचे नेतृत्व त्यांनी यापूर्वी केले आहे.

अपोलो रुग्णालयाचे प्रकल्प, पायाभूत सुविधा आदींमध्ये त्या लक्ष घालतात. त्याचबरोबर अपोलो फार्मसी या औषध व्यवसायाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. हा विभाग अपोलो समूहाच्या एकूण उलाढालीत तब्बल ४५ टक्के हिस्सा राखतो. अपोलो समूहातील केईआय या मालवाहतूक तसेच पायाभूत सेवा कंपनीच्याही त्या उपाध्यक्षा आहेत. पतीबरोबर त्यांनी या कंपनीची स्थापना केली. अपोलो ग्लोबल प्रोजेक्ट्स कन्सल्टन्सी आणि अपोलो फार्माच्या संशोधन व नावीन्य विभागाचे प्रमुखपदही त्या सांभाळतात. समूहाची आरोग्य विमा क्षेत्रातील अपोलो म्युनिच हेल्थ इन्शुरन्सची त्यांनी सहा वर्षांपूर्वी स्थापना केली. ब्ल्यु स्टार, हीरो मोटोकॉर्पसारख्या कंपन्यांवर त्या स्वतंत्र संचालक आहेत. एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प.), सिस्कोसारख्या कंपन्यांवर त्या सल्लागार आहेत. आरोग्यनिगासारख्या क्षेत्रात येणाऱ्या संबंधांमुळे त्यांनी ‘बिलियन हार्ट्स बिटिंग’ ही सामाजिक संस्थाही स्थापन केली.

‘सीआयआय’च्या अध्यक्षपदी निवड होताच शोभना यांनी देशाच्या विकास दराबाबत भाष्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चालू वित्त वर्षांसाठी म्हणजे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन ७.५ ते ८ टक्के असेल, असा त्यांचा अंदाज आहे. त्याचबरोबर नव्या पदाचा कार्यभार स्वीकारताना त्यांनी देशांतर्गत गुंतवणूक वाढण्यावर भर देतानाच उद्योगांनी वस्तू व सेवा करप्रणालीसाठी सज्ज असावे, असे आवाहन केले आहे. उद्योग संघटनेचा या कररचनेला सुरुवातीपासून समर्थन राहिले आहे. संघटनेचे माजी अध्यक्ष अदि गोदरेज यांनी तर या कररचनेमुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात दोन टक्के भर पडेल, असे म्हटले होते. आता प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत असताना शोभना यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची, उद्योगाची पूरक पावले कशी पडतात, ते पाहावे लागेल. संथ अर्थव्यवस्थेला उद्योग क्षेत्रही तेवढेच कारणीभूत आहे. रोजगाराच्या माध्यमातून उद्योगाची वाढ अपेक्षित असते. शोभना या तर सहसा मंदीचा सामना न करावे लागणाऱ्या आरोग्यनिगा क्षेत्रातील. तेव्हा त्यांच्या क्षेत्रातील अनुभव समस्त उद्योग क्षेत्राला येऊ शकेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 3:24 am

Web Title: loksatta vyakti vedh shobana kamineni
Next Stories
1 डॉ. संजय प्रतिहार
2 ऊली स्टेक
3 अल्विन प्लाटिंगा
Just Now!
X