कोल्हापूर जिल्ह्य़ातील कुरुंदवाडमध्ये जन्मलेल्या या मुलाने शेवटी अवकाशाला गवसणी घातली. आता खगोलभौतिकीत त्यांचे संशोधन मान्यताप्राप्त झाले आहे. ते कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) या संस्थेत खगोलशास्त्र व ग्रहविज्ञानाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या संशोधनाचा गौरव तेल अविव विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाऊंडेशनच्या पुरस्काराने (१ कोटी डॉलर व मानपत्र) करण्यात आला आहे. त्यांचे नाव डॉ. श्रीनिवास कुलकर्णी.

प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचे ते बंधू. त्यांचे आईवडील व्यवसायाने डॉक्टर असले तरी त्यांनी मात्र संशोधनाची वेगळी वाट पकडली व त्यात ते कमालीचे यशस्वी झाले. त्यांचे शिक्षण हुबळी येथे झाले. दिल्लीच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी १९७८ मध्ये भौतिकशास्त्रात एमएस पदवी घेतली. २५ वर्षांपूर्वी ते पीएच.डी. करण्यासाठी बर्कलेच्या कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत गेले. नंतर १९८३ मध्ये डॉक्टरेट झाल्यानंतर याच विद्यापीठात ते प्राध्यापक झाले. इंटरस्टेलर मेडियम पल्सार, ब्राऊन ड्वार्फ (बटू तारे), सॉफ्ट गॅमा रे रिपीटर्स, गॅमा किरणांचे स्फोट, ऑप्टिकल ट्रान्झियंट्स हे त्यांचे संशोधनाचे विषय.

Hanuman Temple Name in Pune Hanuman Jayanti 2024
‘जिलब्या मारुती, डुल्या मारुती…’ पुण्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरांना का पडली असतील अशी नावे? जाणून घ्या…
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Baba Ramdev and Acharya Balkrishna in Supreme Court Unreservedly and unconditionally apologized
रामदेव, बाळकृष्ण यांच्याकडून बिनशर्त माफी
Everything You Need To Know About Pune Famous Tourist place sarasbag history name and many more
पुण्यातील प्रसिद्ध ‘सारसबाग’ कोणी बांधली? पाहा काय आहे इतिहास…

विस्तृत तरंगलांबी निरीक्षणांच्या मदतीने त्यांनी आकाशगंगेचा अभ्यास केला.  डोनाल्ड बॅकर यांच्यासमवेत त्यांनी पहिला मिली सेकंड पल्सर (स्पंदक तारा) शोधला. त्यावेळी ते पदवीचे विद्यार्थी होते. कालटेकमध्ये मिलीकन फेलो असताना त्यांनी पहिल्या ग्लोब्युलर क्लस्टर पल्सारचा शोध लावला. डेल फ्रेल व तोशियो मुराकामी यांच्यासमवेत केलेल्या संशोधनात त्यांनी असे दाखवून दिले की, सौम्य गॅमा किरण ‘रिपीटर्स’ हे सुपरनोव्हाच्या अवशेषांशी निगडित न्यूट्रॉन तारे असतात. त्यांचे चुंबकीय क्षेत्र खूप उच्च असते. १९९४ मध्ये कालटेकच्या चमूने ब्राऊन ड्वार्फ (राखाडी बटूतारा) गिलीज २२९ ताऱ्याभोवती शोधला त्यात कुलकर्णी यांचा समावेश होता. पॅलोमार ट्रान्सिएंट फॅक्टरी म्हणजे रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करणाऱ्या यंत्रणेतून अतिप्रकाशमान नवतारा, कॅल्शियम संपृक्त नवतारा व प्रकाशमान लाल नवतारा यांचे संशोधन ते करीत असून त्यात त्यांनी ऑप्टिकल ट्रान्सिएंटचे नवे गट शोधले आहेत. कालटेकच्या स्पेस इंटरफेरोमेट्री मिशनचे ते सदस्य असून त्याचा उपयोग पृथ्वी निकटचे ग्रह व ताऱ्यांमधील अंतरे मोजण्यासाठी होतो. ‘फ्युचर’ प्रवर्गात त्यांची आश्वासक वैज्ञानिक म्हणून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

रॉयल सोसायटी ऑफ लंडन, युनायटेड स्टेट्स अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल नेदरलँडस अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅड सायन्सेस या चार नामांकित संस्थांचे ते सदस्य आहेत. त्यांना यापूर्वी अ‍ॅलन वॉटरमन पुरस्कार, हेलन वॉर्नर पुरस्कार व जॅन्सकी पुरस्कार मिळाले आहेत.

‘कुठल्याही खगोलशास्त्रीय शोधाची किंमत काही इन्फोसिसच्या शेअरसारखी मोजता येत नाही त्यामुळे भारताने खगोलशास्त्रात संशोधनासाठी निधी कमी पडू देऊ नये,’ अशी त्यांची अपेक्षा आहे.

त्यांचा भारतात परतण्याचा विचार नाही, पण या देशातील मुलांना विश्वाचे ज्ञान देण्यास ते उत्सुक आहेत. बर्कले येथील विद्यापीठात पीएच.डी.चे ६४ विद्यार्थी घडवण्याचे काम त्यांनी केले. तरुणपणी याच विद्यापीठात, काही आठवडय़ांत जपानी भाषा शिकून हिरोमी या जपानी तरुणीस आपलेसे केले..  सांस्कृतिक /सामाजिक भेदांचे अडथळे पार केले. आता कुलकर्णीच्या घरी  हिरोमी इंग्रजीत संभाषण करतात, तर मुली जपानी बोलतात. मुलींना भारतीय भाषा येत नाही, पण त्या दोघीही भरतनाटय़म् शिकत आहेत.