रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्या नियुक्तीने या विद्यापीठाची सूत्रे प्रथमच संस्कृत पंडिताच्या हाती गेली आहेत. अवघे ४४ वर्षे वयाचे असलेले वरखेडी मूळचे कर्नाटकचे. सध्या ते बंगळूरुच्या संस्कृत विद्यापीठाचे हंगामी कुलगुरू म्हणून काम बघत होते. याच विद्यापीठात शास्त्र विभागाचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत असलेल्या वरखेडींचा जन्म बंगळूरुचा. वयाच्या १२ वर्षांपर्यंत ते उडपी मठाच्या गुरुकुलात शिकले. त्यांनी हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत संस्कृत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय संस्कृत संस्थेतून याच विषयात पीएच.डी. मिळवली.

१७ वर्षांपूर्वी तिरुपतीच्या पूर्णप्रज्ञा विद्यापीठातून अध्यापनकार्याला सुरुवात करणाऱ्या वरखेडींनी दक्षिणेतील अनेक संस्कृत संस्था तसेच विद्यापीठांमध्ये काम केले आहे. संस्कृत ही केवळ भाषा नसून ती संस्कृती व विज्ञानसुद्धा आहे. या भाषेला समाजात जे स्थान आहे ते इतर कुठल्याही भाषेला नाही. संस्कृतपुढील आव्हानांपेक्षा त्यात खूप संधी आहेत. संस्कृतमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असून त्याचा प्रसार करण्याची गरज आहे. काही काळापूर्वी संस्कृतची हेटाळणी केली जायची. आज मात्र चित्र बदलले आहे, असा विचार ते कायम मांडत असतात. कर्नाटकातील मेलकोटे संस्कृत अकादमीच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. संस्कृतसोबतच कन्नड, इंग्रजी, हिंदी, तेलुगु व तुलू या भाषेवर प्रभुत्व असलेल्या वरखेडींनी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या संस्कृत भाषा विकास समितीवर दीर्घकाळ काम केले आहे. शास्त्रातील संशोधन पद्धतीवर गाढा अभ्यास असणाऱ्या वरखेडींचे आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये ३० पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. केरळचे चिन्मय विश्व विद्यापीठ, पुण्यातील एमआयटीमधील वैदिकशास्त्र विभाग, बंगळूरुचे वेद गुरुकुल, बेल्लूरचे रामकृष्ण विवेकानंद विद्यापीठ, कोलकाताचे रवींद्र भारती तसेच जाधवपूर विद्यापीठात त्यांनी अध्यापनासाठी हजेरी लावली आहे. साहित्य अकादमीच्या विविध पुरस्कार निवड समितीवरसुद्धा त्यांनी काम केले आहे. संस्कृतसोबतच वेदांचा अभ्यास असणाऱ्या वरखेडींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००७ मध्ये त्यांना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते महर्षी बद्रायण व्यास पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय रामानुज ट्रस्टतर्फे दिली जाणारी पंडित ही उपाधी, केरळच्या चिन्मय फाऊंडेशनतर्फे चिन्मयानंद सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

१९९८ मध्ये सुरू झालेल्या रामटेकच्या संस्कृत विद्यापीठात सध्या एक हजार विद्यार्थी शिक्षण घेतात . प्रारंभीची १५ वर्षे डॉ. पंकज चांदे यांनी या विद्यापीठाचे कुलगुरुपद सांभाळले. त्यानंतर डॉ. उमा वैद्य कुलगुरू झाल्या. विद्यापीठ संस्कृत भाषेचे पण कुलगुरू मात्र मराठी बोलणारे अशीच या विद्यापीठाची आजवरची अवस्था राहिली. यावेळी प्रथमच संस्कृत भाषेतील पंडित असलेल्या वरखेडींची निवड केली आहे. या विद्यापीठाला शैक्षणिक वर्तुळात चांगला दर्जा प्राप्त करून देण्याचे मोठे आव्हान वरखेडींसमोर असणार आहे.  संस्कृतचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी अनेक देशात प्रवास केला  संस्कृत विषयाशी संबंधित अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्य म्हणूनही सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा या विद्यापीठाला मिळेल, अशी आशा या नियुक्तीने निर्माण झाली आहे.