भारतीय नौदलाची ओळख तिला अगदी लहानपणापासून झाली होती. या सेवेतील साहस, शिस्त अन् प्रतिष्ठा दररोज अनुभविण्यास मिळत होती. या बाबी तिचे प्रेरणास्थान ठरल्या. बाळगलेले स्वप्न पूर्ण करताना तिने नौदलाच्या इतिहासात पहिली महिला वैमानिक होण्याचा बहुमान मिळाला. शुभांगी स्वरूप हे तिचे नाव. हवाई दलात महिनाभरापूर्वी तीन महिला वैमानिक म्हणून समाविष्ट झाल्या. नौदलात त्याची मुहूर्तमेढ शुभांगीच्या माध्यमातून रोवली जाणार आहे. कन्नुर येथील नौदल प्रबोधिनीतून उत्तीर्ण झालेली शुभांगी हिची वैमानिक पदासाठी निवड झाली. डुंडीगलच्या हवाई दल प्रबोधिनीत आता वर्षभराचे खडतर प्रशिक्षण तिला पूर्ण करावे लागणार आहे. आजवरची तिची धडपड पाहिल्यास हे प्रशिक्षणही ती सहजपणे पूर्ण करेल.

सैन्यदलातील सेवेचा वारसा लाभलेल्या कुटुंबातील मुलाने तो वारसा पुढे नेल्याची असंख्य उदाहरणे आहेत. शेकडो कुटुंबांतील सदस्य सैन्यदलात कार्यरत राहून देशाची सेवा करीत आहेत. तथापि, सैन्यदलाच्या सेवेचा वारसा मुलांप्रमाणे मुलीदेखील समर्थपणे पुढे नेऊ शकतात, हेच शुभांगी हिने सिद्ध केले आहे. तिचे वडील ज्ञान स्वरूप हे नौदलात अधिकारी. आई कल्पना या विशाखापट्टणमच्या नौदल विद्यालयात शिक्षिका. मूळच्या उत्तर प्रदेशमधील बरेलीच्या स्वरूप कुटुंबाची नौदलातील सेवेमुळे देशाच्या किनारपट्टी भागात आधिक्याने भ्रमंती झाली. शालेय जीवनात शुभांगी मैदानावर अधिक रमत असे. २००८ साली शिक्षण चालू असताना शुभांगी तायक्वांदोच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पॉण्डेचेरीला गेली होती. सततच्या लढतींमुळे तिच्या पायाला सूज आली. नंतर त्यातून रक्तही येऊ लागले. तरी हार न मानता तिने सुजलेल्या पायांनी लढत दिली. त्यात तिला रौप्यपदकही मिळाले होते. सैन्यदलाच्या धाडसी सेवेत दाखल होण्याचे स्वप्न बाळगून त्या दिशेने तिने तयारी सुरू केली. पुढे ‘व्हीआयटी’ महाविद्यालयातून जैवतंत्रज्ञान अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पूर्वतयारीमुळे सैन्यदलासाठी असलेली परीक्षा उत्तीर्ण होऊन ती भारतीय नौदलात दाखल झाली. इतकेच नव्हे, तर वैमानिक होण्याचे स्वप्नदेखील तिने पूर्ण केले.

नौदलात महिलांना वैमानिक म्हणून भरती होण्याची परवानगी दोन वर्षांपूर्वी देण्यात आली. देशाच्या इतिहासात प्रथमच महिला वैमानिक नौदलाच्या हेलिकॉप्टर, विमानाचे सारथ्य करणार आहे. देशातील युवतींनी नौदलात वैमानिक म्हणून दाखल व्हावे, अशी शुभांगीची इच्छा आहे. जिद्द, चिकाटीतून निश्चित केलेले लक्ष्य साध्य करता येते हे तिने दाखवून दिले आहे. धाडसाबरोबरच तिला समाजसेवेचीही आवड आहे. ‘एड फॉर ऑल’ या स्वयंसेवी संस्थेशी ती संलग्न आहेत. ही संस्था गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी झटते. त्यांचा खर्चही उचलते.  तिची आई ‘फेडरेशन ऑफ इण्डस्ट्रीज’ या संस्थेचे काम करते. नौदलातील काम आव्हानात्मक आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासात झाशीच्या राणीपासून चांदबिबी, अहिल्याबाई होळकर, रझिया सुलतान अशा अनेक रणरागिणींचे संदर्भ अभिमानाने दिले जातात. वर्तमानात प्रत्यक्ष त्या धर्तीवर काही निर्णय घ्यायचा म्हटला की, मात्र आजवर नाके मुरडली गेली होती. युद्धभूमीवर महिला अधिकाऱ्यांना जाऊ न देण्याचा मुद्दा याच प्रकारातील होता. प्रदीर्घ काळ विविध पातळ्यांवर चाललेल्या वैचारिक लढाईनंतर हवाई दलाने लढाऊ विमानांचे सारथ्य करण्याची संधी महिलांना दिली. त्यापाठोपाठ नौदलाने तसा निर्णय घेतला. यामुळे महिलांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. त्या दिशेने पहिले पाऊल शुभांगी हिने टाकले आहे.