18 February 2019

News Flash

सुहासिनी कोरटकर

अभिजात हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेमध्ये प्रत्येक घराण्याचे स्वत:चे असे खास वैशिष्टय़ आहे.

अभिजात हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेमध्ये प्रत्येक घराण्याचे स्वत:चे असे खास वैशिष्टय़ आहे. त्यामुळे गायकीची शैली बदलली असली तरी घराण्याचे महत्त्व काही कमी झाले नाही. उस्ताद अमान अली खाँ आणि पं. त्र्यंबकराव जानोरीकर ही नावे घेतली की चटकन भेंडीबाजार घराणे डोळ्यासमोर येते. या घराण्याचे वैभव आपल्या गायकीतून समर्थपणे साकारणाऱ्या डॉ. सुहासिनी कोरटकर यांच्या गानसेवेमुळे भेंडीबाजार हे काहीसे दुर्लक्षित राहिलेले घराणे पुन्हा संगीताच्या मुख्य प्रवाहात आले. केवळ गायिका म्हणून स्वत:ची कारकीर्द घडविण्यापेक्षाही मुक्त हस्ते विद्यादान करून अनेक शिष्य घडविणाऱ्या गुरू आणि ‘निगुनी’ या टोपणनावाने अनेक उत्तमोत्तम बंदिशी बांधणाऱ्या वाग्येयकार म्हणून कोरटकर यांचे कार्य अलौकिक स्वरूपाचे आहे. गुरुप्रतीचा अपार श्रद्धाभाव हे वैशिष्टय़ असलेल्या सुहासिनीताई यांनी पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ युवा गायक कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केला होता. गानवर्धन या संगीत प्रचार आणि प्रसाराचे कार्य करणाऱ्या संस्थेकडे त्यासाठी त्यांनी देणगी दिली होती.

सुहासिनी कोरटकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४४ रोजीचा. भेंडीबाजार घराण्याचे ज्येष्ठ संगीतज्ञ-गुरू पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडून त्यांना अगदी लहानपणापासून शिस्तबद्ध तालीम मिळाली. गुरूंचे उत्तम मार्गदर्शन आणि स्वत:ची निरंतर साधना यांच्या आधारे या घराण्याची वैशिष्टय़पूर्ण गायकी ही त्यांनी यशस्वीपणे आत्मसात केली. आपल्या सुरेल गुंजन आणि मिंडयुक्त आलापींनी रागाचे यथार्थ, सुडौल आणि परिणामकारक रूप त्या रसिकांसमोर साकारत. बंदिशींचे आकर्षक प्रस्तुतीकरण, लयीत गुंफलेली सरगम आणि गमकयुक्त ताना ही त्यांच्या गायकीची वैशिष्टय़े. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा, नाटय़संगीत, अभंग या गानप्रकारामध्येही त्यांची गायकी खुलायची. दिल्लीच्या प्रसिद्ध ठुमरी गायिका नैनादेवी यांच्याकडून त्यांनी ठुमरीचे मार्गदर्शन घेतले. हिंदी व मराठीत अभंग, गीत, गजल यांना त्यांनी संगीतबद्ध केले. ‘संगीताचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर प्रबंध सादर करून पीएच.डी. संपादन केली.

भेंडीबाजार घराण्याची दुर्मीळ झालेली गायकी तीन तपांच्या निरंतर प्रयत्नांनी पुन्हा प्रस्थापित करून ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. समाजातील सर्व स्तरांमध्ये अभिजात संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली. रसाळ निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकासह साकल्याने मांडणी हे त्यांच्या कार्यक्रमांचे वैशिष्टय़ होते.  कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या हिंदूी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’, उपशास्त्रीय संगीताची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’, स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’, विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतांवर आधारित ‘ऋतुरंग’, शास्त्रीय संगीताचे सौंदर्य उलगडणारा ‘ख्याल गायनाचा रसास्वाद’ ही काही उदाहरणे. मराठी, हिंदूी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत. सुहासिनीतरईचा सहभाग आकाशवाणी व दूरदर्शनच्या  कार्यक्रमांत अनेकदा असे. सूरसिंगार संसद संस्थेचा सूरमणी, गानवर्धन संस्थेचा स्वर-लय भूषण, सम संस्थेचा संगीत शिरोमणी, पूर्णवाद प्रतिष्ठानचा संगीत मर्मज्ञ आणि स्वर-साधना समितीतर्फे स्वर-साधना रत्न असे मानाचे पुरस्कार त्यांना लाभले. गायिका, संगीतज्ञ, बंदिशकार, लेखिका आणि गुरू अशा विविध पैलूंनी भारलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने शास्त्रीय संगीताची हानी झाली आहे.

First Published on November 9, 2017 3:11 am

Web Title: loksatta vyakti vedh suhasini koratkar