गेल्या काही वर्षांपासून विविध जागतिक संघटना वा संस्थांमध्ये मूळ भारतीय वंशाच्या वा विदेशस्थ भारतीयांच्या नेमणुका मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. या मालिकेत आता ‘शाश्वत विकासविषयक जागतिक व्यापार परिषदे’च्या (वर्ल्ड बिझनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट- डब्ल्यूबीसीएसडी) अध्यक्षपदी सिंगापूर येथील उद्योगपती सन्नी व्हर्गिस यांची नियुक्ती झाली आहे. या परिषदेची स्थापना २५ वर्षांपूर्वी झाली असून त्याच्या अध्यक्षपदी प्रथमच एका आशियाई व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.

१९८७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि वैश्विक आयोगाने आपले समान भवितव्य या नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात शाश्वत विकास ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली होती. शाश्वत विकास या शब्दात नैसर्गिक आणि मानवनिर्मित संसाधनांचा जपून वापर करणे अपेक्षित आहे. सौर व पवनऊर्जा यांसारख्या स्रोतांचा जास्तीत जास्त वापर हा शाश्वत विकासाचा पाया आहे. आपल्या येणाऱ्या पिढय़ांचा विचार करून आपल्याकडे जी मर्यादित संसाधने आहेत त्यांचा नियंत्रित वापर हेही या संकल्पनेत अभिप्रेत आहे.

डब्ल्यूबीसीएसडीचे जगभरात २०० हून अधिक सदस्य असून शाश्वत विकासाच्या दृष्टीने परिषदेने लक्षणीय काम केले आहे. या परिषदेचे नेतृत्व करणारे सन्नी व्हर्गिस हे सिंगापूर येथील ओलम इंटरनॅशनल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १९७९ मध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालयातून बीएस्सी (कृषी) ही पदवी घेतल्यानंतर त्या काळी देशात अव्वल स्थानावर असलेल्या आयआयएम, अहमदाबाद या संस्थेतून त्यांनी व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी घेतली. काही वर्षे युनिलिव्हर या भारतीय कंपनीमध्ये काम केल्यानंतर १९८६ मध्ये ते नायजेरियात गेले. केवलराम चनराय समूहाच्या कापूस उत्पादन प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्या ठिकाणी शेतीत अनेक प्रयोग करून त्यांनी कापसाचे उत्पादन दर्जेदार बनवले. नंतर या समूहाचे ते महाव्यवस्थापक बनले. १९८९ मध्ये त्यांनी मोठी झेप घेतली. कंपनीची कृषी उत्पादने निर्यात करणाऱ्या विभागाचे ते प्रमुख बनले. दोन दशके केवलराम चनराय (केसी) समूहात ते होते. तेथून व्हर्गिस हे ओलम समूहात गेले. ओलम इंटरनॅशनलचे ते कार्यकारी संचालक बनले. कंपनीच्या विस्तार योजना आखून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात व्हर्गिस यांचे योगदान मोलाचे राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची वेगाने प्रगती होऊ लागल्याने ओलमच्या जगभरातील प्रकल्पांचे व्यवस्थापन आणि व्यवसाय वृद्धीच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. ते ओलम समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. समूहाच्या विविध प्रकल्पांमध्ये त्यांच्या आग्रहामुळे नवनवीन कृषी उत्पादने तयार होऊ लागली व जागतिक बाजारपेठेत त्यांना मागणीही वाढू लागली. उद्योगजगतातील असामान्य कामगिरीबद्दल त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तरुण उद्योजकांसाठी दिला जाणारा पुरस्कार २००८ मध्ये त्यांना मिळाला. सिंगापूरच्या कंपन्यांमधील सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून २०११ मध्ये व्हर्गिस यांची एकमताने निवड करण्यात आली. सिंगापूर सरकारतर्फे दिले जाणारे व तेथे अत्यंत मानाचे समजले जाणारे ‘पब्लिक सव्‍‌र्हिस मेडल’ त्यांना मिळाले आहे. अशा या अनुभवसंपन्न व यशस्वी कारकीर्द असलेल्या व्हर्गिस यांना आता एका जागतिक पातळीवरील व्यापार परिषदेचे नेतृत्व  करण्याची संधी मिळणार आहे. १ जानेवारी रोजी पॉल पोलमन यांच्याकडून ते नवीन पदाची सूत्रे घेतील तेव्हा ती त्यांच्या कारकीर्दीतील एका नव्या पर्वाची सुरुवात असेल..