15 December 2017

News Flash

ताहेर पूनावाला

माणसाच्या जगण्यात विवेकवादाला स्थापित करणे, हे त्यांचे आयुष्यभराचे स्वप्न होते.

लोकसत्ता टीम | Updated: August 5, 2017 2:19 AM

ताहेर  पूनावाला हे एक अजब रसायन होते. राज कपूर यांच्या ‘बॉबी’ चित्रपटात एका ग्रंथालयात अतिशय धीरगंभीरपणे बसलेले ताहेरभाई, त्या काळी चर्चेचा विषय झाले होते. ते चित्रपटात दिसले ते केवळ राज कपूर यांच्या प्रेमाखातर. पण प्रत्यक्ष जगण्यात कोणतीच रुपेरी झालर नसलेले ताहेरभाई हे आयुष्यभर सामाजिक बदलांसाठी विधायकपणे झटले.

माणसाच्या जगण्यात विवेकवादाला स्थापित करणे, हे त्यांचे आयुष्यभराचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी समविचारी लोकांना एकत्र करून अनेकविध उपक्रम राबवले. सामाजिक कृतज्ञता निधी हा त्यापैकी एक. अतिशय महत्त्वाचा. सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाच्या प्रति समाजाची कृतज्ञता म्हणून नियमित स्वरूपात निधी देणे हे उद्दिष्ट ठेवून हा निधी स्थापन करण्यात आला. विश्वस्त मंडळात डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, डॉ. बाबा आढाव, विजय तेंडुलकर, ना. धों. महानोर यांचा समावेश होता. त्याबरोबरच अनिल अवचट, गजानन खातू, रुपा कुलकर्णी, डॉ. नरेंद्र दाभोलकर अशा त्या वेळी तरुणांच्या फळीत असलेल्यांचाही सहभाग होता. १९८७ साली न्यासाचे काम चालू झाले. तेव्हा निधी उभारणीसाठी डॉ. लागू यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रभर ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे प्रयोग झाले. या सगळ्या घडामोडींमध्ये ताहेर पूनावाला शांतपणे पडद्यामागून आपले काम शांतचित्ताने करीत होते. समाजातील अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या ताहेरभाईंना पहिलाच फटका आप्तांकडून बसणे स्वाभाविक होते. बोहरा समाजातील सुधारणांसाठी समाजाचे धार्मिक नेते सैयदना यांचे वर्चस्व झुगारून देताना, भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याची पूर्ण जाणीव पूनावाला यांना होती. त्यांच्यावर समाजाने बहिष्कार घातला. त्यांच्या दुकानातील नोकरही काम सोडून गेले. व्यापाऱ्यांनी असहकार सुरू केला. पण ताहेरभाई डगमगले नाहीत. त्यांनी या सगळ्याचा अतिशय धीराने सामना केला. समाजाच्या चालीरीतीप्रमाणे एकूण उत्पन्नाच्या दोनतृतीयांश हिस्सा समाजाला परत देण्यास विरोध करताना, ताहेरभाईंनी आपल्या पत्नीशी पुन्हा कायदेशीर विवाह केला. समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन जागृत करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले.  अतिशय शांत, संयमी आणि मितभाषी असलेले ताहेरभाई समाजाच्या सर्वच स्तरांत सहज मिसळून जात, याचे कारण त्यांची विवेकवादावर आणि विज्ञानवादावर कमालीची निष्ठा होती. ज्या काळात समाजात काही शहाण्यासुरत्यांचे लोक एकत्र असत, त्या काळात ताहेरभाईंनी आपले काम सुरू केले. असंख्य अडीअडचणीतून जात असतानाही चेहऱ्यावर कधीही क्लेशभाव येऊ  न देता, ते काम करत राहिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामात त्यांनी स्वत:ला अक्षरश: झोकून दिले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबरोबर या कामात त्यांना अतिशय रस वाटत असे. पण म्हणून कोणत्याही किंवा प्रत्येक सभेत भाषणासाठी पुढे येण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. भूमिका स्पष्ट असल्याने, त्यासाठी पडद्यामागे राहून काम करणे आणि काम पुढे जाण्यासाठी सतत प्रोत्साहन देणे, हेच त्यांना महत्त्वाचे वाटत असे. जाहीर सभासमारंभात ते केवळ दिसत असत. तरीही त्यांच्या भोवतीचे समविचारी लोकांचे कोंडाळे त्यांना बोलते करीत असे. महात्मा फुले समता प्रतिष्ठान, राष्ट्रीय एकात्मता समिती, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज यांसारख्या संस्थांमध्ये काम करताना, ताहेर पूनावाला रमत असत. तोच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा पिंड होता. त्यांच्या निधनाने एक सच्चा विवेकवादी कार्यकर्ता हरपला आहे.

 

First Published on August 5, 2017 2:19 am

Web Title: loksatta vyakti vedh taher poonawala