कशाळकर हे आडनाव भारतीय संगीताच्या क्षेत्रात जे महत्त्व राखून आहे, त्यामागे चार कशाळकरांची मेहनत आहे. ना. द. कशाळकर हे संगीताचे केवळ प्रेमी नव्हते, तर त्यांनी गुरूकडून ‘बाकायदा’ संगीतविद्या प्राप्त केली होती. त्यांच्या तीनही मुलांनी ही विद्या त्यांच्याकडून घेतली, पण त्यानंतर आपल्या पंखांमध्ये कलात्मकतेचे आणि सर्जनाचे असे काही वारे भरले, की त्यामुळे कलावंत म्हणून त्यांना स्वतंत्र स्थान निर्माण करता आले. पंडित उल्हास कशाळकर हे नादंचे चिरंजीव. भाऊ अरुण आणि विकास यांनीही आपापल्या परीने संगीताच्या क्षेत्रात विहार सुरूच ठेवला. पण उल्हासजींनी त्यामध्ये स्वकर्तृत्वाने जी ओळख निर्माण केली, त्यामुळे त्यांना संगीत नाटक पुरस्कार आणि पद्मश्रीपाठोपाठ यंदाचा तानसेन सन्मान मिळणे भागच पडले.

आजमितीस भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात उल्हास कशाळकर हे नाव सर्वश्रुत झाले आहे, याचे कारण त्यांची सातत्यपूर्ण कारकीर्द. संगीतातील आद्यपणाचा मान मिळालेल्या ग्वाल्हेर घराण्याबरोबरच जयपूर आणि आग्रा या तळपणाऱ्या घराण्यांचीही तालीम उल्हासजींना मिळाली. या तीनही घराण्यांच्या शैलींचा विचार केला, तर त्यात साम्य असे नाही. प्रत्येक शैली आपापल्या जागी अतिशय उंचीवर गेलेली आणि त्यातील घराणेशाहीचा हट्ट पाळणारी. पण उल्हासजींनी या तिन्ही घराण्यांचा कलात्मक संगम घडवून आणला आणि एका नव्या शैलीचाच प्रत्यय दिला. हे काम फार सोपे नाही; उलट प्रतिभेला आव्हानच देणारे. पांढरकवडा या विदर्भातील गावात बालपण गेलेल्या उल्हासजींना उच्च शिक्षणासाठी नागपूर विद्यापीठात जाता आले. पण सर्जनाचे देणे देण्यासाठी कलावंत होणे फारच आवश्यक होते, म्हणून थेट आकाशवाणीमध्ये जाऊन ते सामील झाले. तेथे संगीत असले तरीही त्याला सरकारी लोखंडी चौकट असतेच. उल्हासजींनी तरीही बराच काळ ती सरकारी नोकरी केली, पण कलावंत होण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. ती नोकरी सोडली आणि त्यांच्या पंखात अक्षरश: वारेच संचारले. गुरू पंडित राम मराठे आणि गजाननबुवा यांच्याकडून मिळालेली तालीम आणि त्यात स्वत: घातलेली भर, यामुळे त्यांचे गाणे चमकदारपणे पुढे येत राहिले. जो कलावंत आपल्या कलेमध्ये सतत प्रयोग करीत राहतो, त्याला अडथळ्यांची शर्यत सहज पार करता येते. कलेच्या जीवनात अशा अनेक अडथळ्यांना सतत सामोरे जावे लागते आणि त्याची सहजसोपी उत्तरेही नसतात. ती आपल्या बुद्धीने आणि सौंदर्यात्मक जाणिवेनेच शोधायची असतात. या प्रयत्नात बुजुर्गाची मदत होते हे खरे, पण वाट शोधायचे काम ज्याचे त्यालाच करावे लागते. संगीताच्या क्षेत्रात अजूनही गुरूचे जे स्थान आहे, त्याला पर्याय उभा राहू शकलेला नाही. त्यामुळे कलावंत होण्याच्या वाटेवर कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीत आचार्यपदावर काम करणे, ही उल्हासजींसाठी मोठीच संधी होती. कोलकाता हे कलांचे आगर. उल्हासजींसाठी तीही एक संधी होती. अध्यापनाचे काम करताना देशातील सगळेच बुजुर्ग कलावंत एकाच परिसरात राहत असल्याने संगीतचर्चा घडणे स्वाभाविक होते. कशाळकरांनी त्याचा उपयोग अतिशय नेटकेपणाने करून घेतला. कलावंत म्हणून उंच भरारी मारत असताना, आचार्यपद सांभाळणेही कठीण होऊ लागले म्हणून त्यांनी अकादमीतून निवृत्त व्हायचे ठरवले खरे, पण त्यांच्या शिष्यांनी त्यांना सोडले नाही. कशाळकरांनी पुण्यात वास्तव्य करण्याचे ठरवल्यावर हे सारे शिष्य थेट पुण्यात आले आणि तेथेही ही गुरुशिष्य परंपरा पुढे सुरूच राहिली आहे. तानसेन सन्मान मिळाल्याने कशाळकर यांच्याबरोबरच त्यांच्या सर्वदूर पसरलेल्या चाहत्यांना आनंद होणे म्हणूनच स्वाभाविक आहे.