राधिका मोहन भगवती हे आसाममधील नावाजलेले पत्रकार व लेखक. त्यांच्या निधनाने तेथील पत्रकारितेतील नव्या व जुन्या पिढीला जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला आहे.

भगवती यांचा जन्म सोनितपूर जिल्ह्य़ात जामगुरीहाट येथे १९ जानेवारी १९३३ रोजी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण जामुगुरी हायस्कूल येथून झाले, तर बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली होती. त्यांनी १९५८ मध्ये ‘नातून आसामिया’ या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून कारकीर्द सुरू केली. हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर त्यांनी ‘तिंदिनिया बाटोरी’, ‘अजिर आसाम’ व ‘सेंटीनेल’ (हिंदी) या वृत्तपत्रांत काम केले व नंतर ते ‘दैनिक आसाम’मध्ये रुजू झाले. आसामातले हे सर्वात जुने वृत्तपत्र मानले जाते. १९८७ ते २००४ या काळात त्यांनी ‘दी सेंटीनेल’ ग्रुपमध्ये काम केले. २०१० मध्ये ते ‘दैनिक आसाम’चे संपादक झाले. विशेष म्हणजे १९६०च्या दशकात ते ‘रामधेनू’ या आसाममधील साहित्य नियतकालिकाचे संपादक होते, त्यातून त्यांनी आसामी लेखकांची एक नवी पिढी घडवली. ‘रक्तजबा’, ‘एजन राजा असिल’, ‘बनारिया फूल’ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. आसाममधील पत्रकारिता समृद्ध करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ‘द स्टोरी ऑफ अवर न्यूजपेपर्स’ या चंचल सरकार यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या भाषांतरासाठी त्यांना १९९१ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. शिवप्रसाद बारुआ नॅशनल मीडिया अ‍ॅवॉर्ड, बिरेंद्र कुमार भट्टाचार्य अ‍ॅवॉर्ड, सादिन पत्रकारिता पुरस्कार, आर. एन. बारुआ व प्रतिभा बारुआ जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.  आसाम सरकारने यंदाच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार केला होता. गेली पन्नास वर्षे त्यांनी त्यांच्या लेखणीतून आसाममधील लोकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न करतानाच त्यांच्या जाणिवा जागत्या ठेवल्या. आसामच्या पत्रकारितेला दीडशे वर्षे पूर्ण होत असताना नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. आधुनिक आसामी साहित्याचे शिल्पकार म्हणून त्यांची गणना केली जाते. त्यांच्या साहित्यात नवीन सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब उमटत होते, त्याचबरोबर त्यांचे लेखन वाचून एक पिढी त्यातून समृद्ध झाली. आसामी लेखक डॉ. बनीकांता काकाटी, बिरिंची बारुआ व महेश्वर नियोग यांनी आसामी लेखनशैलीची जी धाटणी ठेवली तीच भगवती यांनी पुढे नेली. या शैलीत एक सखोल दृष्टी व समाजाशी नाळ जोडणारी भाषा यांचा समावेश होता. भाषेच्या बाबतीत त्यांनी कधी तडजोड केली नाही. जिथे संबंधित शब्दाला आसामी प्रतिशब्द असेल तेथे तो वापरला गेलाच पाहिजे, कारण आसामी भाषेत अनेक सौंदर्यशील शब्द असून त्यांचा वापर केला नाही तर भाषा पुढे जाणार नाही, त्यामुळे त्यांचा वापर महत्त्वाचा आहे, असा त्यांचा आग्रह होता. पत्रकारितेत त्यांनी केदारनाथ गोस्वामी, हरेंद्रनाथ बारुआ, लक्ष्मीनाथ फुकन, सतीशचंद्र काकाटी यांची मूल्ये पुढे नेताना पत्रकारितेच्या नीतितत्त्वांशी कधी प्रतारणा केली नाही. पत्रकार म्हणून त्यांनी आसामच्या समाजजीवनाशी निगडित अनेक प्रश्नांना वाचा फोडली व सामान्य लोकांना या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.  कुठल्याही घटनांमागचे सत्य उलगडण्यासाठी त्यांनी सतत सहकाऱ्यांना प्रवृत्त केले. पत्रकारितेच्या प्रवासामुळे त्यांचे साहित्यिक लेखनही अधिक अनुभवसंपन्न बनले. अखेपर्यंत ते ‘दैनिक आसाम’चे संपादक होते. भगवती यांचे लेखन हे आसामचा वाङ्मयीन वारसा अधिक समृद्ध करणारे आहे. त्यांचे लेखन आजही काळाच्या कसोटीवर टिकून आहे.