सध्या अनेक क्षेत्रांतील दिग्गजांना गुरू म्हणण्याची प्रथा रूढ झाली आहे. योग गुरू, व्यवस्थापन गुरू, शैक्षणिक गुरू वगैरे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी ८० च्या दशकात येणारे युग हे कॉम्प्युटरचे म्हणजेच संगणकाचे असेल, असे सूतोवाच केल्यानंतर  भाजपसह  अनेक पक्षाच्या नेत्यांनी याला कडाडून विरोध केला होता. पण राजीव गांधी यांना ज्या मोजक्या मंडळींचा पाठिंबा मिळाला त्यातील एक होते विजय मुखी. माहिती-तंत्रज्ञान आणि सायबर क्षेत्रातील गुरू म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.

देशात नावाजलेल्या व्हीजेटीआयमधून मुखी यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली.  नंतर १९८९ मध्ये संगणक संस्था सुरू केली. एखाद्या व्यक्तीस संगणकाचे ज्ञान असो वा नसो, त्याच्यात संगणकाची गोडी निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. देशात इंटरनेटची ओळख होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. १९९५ साली इंटरनेटची फारशी माहिती लोकांना नव्हती. हे इंटरनेट प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्याचे मोठे काम त्यांनी केले. आज इंटरनेट असलेले मोबाइल ग्रामीण भागातही दिसतात. यास मुखी यांचे परिश्रम कारणीभूत आहेत हे मान्य करावे लागेल.  १९८६ मध्ये नॅसकॉमची स्थापना त्यांच्याच निवासस्थानी झाली. नवीन तंत्रज्ञानाच्या प्रेमात असलेली हरीश मेहता, देवांग मेहता अशी अनेक मंडळी त्यांच्या निकटच्या वर्तुळात आली. नेपियन सी रोडवरील त्यांचे आलिशान घर तंत्रप्रेमी मंडळींनी कायम भरलेले असे. कॉम्प्युटर, इंटरनेट हे तंत्रज्ञान नवीन असल्याने लोकांना याची माहिती व्हावी, याविषय़ी त्यांच्यात आवड निर्माण व्हावी यासाठी सोप्या भाषेत लिखाण करण्याचे अनेकांनी त्यांना सुचवले. मग ‘इंडियन एक्स्प्रेस’सह विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांतून स्तंभलेखन करण्यासाठी आधी त्यांनी रीतसर पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. अल्पावधीतच ते माध्यम जगतात लोकप्रिय बनले. माहिती आणि तंत्रज्ञानाविषयी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या ८० वर पोहोचली. मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाल्याने पोलीस दलातील सायबर सेल विभागात काही अडचण आली की त्यांनाच पाचारण केले जात असे. प्रसिद्ध सिनेकलावंत शम्मी कपूर हे अतिधूम्रपान करीत. ‘माझ्या हातातील सिगारेट जाऊन त्या हातात संगणकाचा माऊस देण्याचे काम मुखी यांनी केले व मला संगणकाचा मित्र बनवले’ हे शम्मी कपूर अभिमानाने सर्वाना सांगत. तंत्रज्ञ म्हणून ते मोठे होतेच, पण आयुष्य आनंदी कसे जगावे हे सर्वाना कृतीतून दाखवणारे जिंदादिल माणूसही होते. त्यांच्या निधनाने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे.