२०१४ मधील गोष्ट आहे ही. नरेंद्र मोदी नुकतेच पंतप्रधान झाले होते. त्यानंतर लगेच जुलै महिन्यात ब्रिक्सची शिखर परिषद होणार होती, त्यासाठी ते जर्मनीमार्गे ब्राझीलला जाणार होते. तिथे जगातील नेते जे बोलणार ते मोदी यांना समजणे शक्य नव्हते, कारण ते त्यांच्या भाषेत बोलणार होते. त्यामुळे आता तेथे जे बोलले जाईल ते आपल्याला हिंदूीत कोण सांगणार, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्या वेळी एक सचिव पातळीवरील अनुभवी अधिकाऱ्याने त्यांची ही समस्या ओळखून दोनच दिवसांत हिंदी दुभाषक असलेल्या अधिकाऱ्यांची फळीच उभी करून दिली. शिवाय ब्रिक्स परिषदेसाठी स्वत: हा अधिकारी त्यांच्याबरोबर गेला, कारण त्यांना फ्रेंच व रशियन अशा अनेक भाषा व हिंदीही चांगली येत होती. या अधिकाऱ्याला लगेच पीएमओ म्हणजे पंतप्रधान कार्यालयात सहसचिवाचे पद देण्यात आले, वेतनही दीड लाखांपेक्षा जास्त. थोडक्यात पंतप्रधान मोदी यांनी चांगल्या आयएएस, आयएफएस अधिकाऱ्यांची निवड पंतप्रधान कार्यालयात केली होती, त्यात समावेश असलेला हा अधिकारी म्हणजे विनय मोहन क्वात्रा. आता त्यांची नेमणूक भारताचे फ्रान्समधील राजदूत म्हणून झाली आहे.

क्वात्रा यांच्या नेमणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे फ्रान्समध्ये सत्ताबदल होऊन इमॅन्युअल मॅक्रॉन अध्यक्ष झाले असताना ते सूत्रे हाती घेणार आहेत. क्वात्रा हे १९८८च्या तुकडीचे आयएफएस म्हणजे परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. २०१५ मध्ये ते पंतप्रधान कार्यालयात विशेष कामकाज अधिकारी होते. त्यांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासात सहसचिव म्हणून काम केले आहे. क्वात्रा हे विज्ञान पदवीधर असून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधात पदविका पूर्ण केली आहे. राजनैतिक अधिकारी म्हणून क्वात्रा यांनी जिनिव्हात पहिल्यांदा काम केले, नंतर संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटना व जागतिक आरोग्य संघटनेत त्यांनी काम केले. दक्षिण आफ्रिकेत दरबान येथे त्यांनी वाणिज्य दूतावासात व्यापार व आर्थिक कामकाज बघितले. चीनमधील भारतीय दूतावासात ते काही काळ व्यापार उपप्रमुख होते. रशियात ताश्कंद येथे त्यांनी भारताची आर्थिक व राजनैतिक आघाडी सांभाळली. परराष्ट्र विभागात त्यांनी संचालक म्हणून काम केले त्या वेळी त्यांनी इराण व अफगाणिस्तानविषयक बाबीत लक्ष घातले.

अफगाणिस्तानात भारताने केलेल्या विकासकामांवर त्यांची देखरेख होती. नंतर त्यांनी सार्कमध्ये व्यापार व अर्थ कामकाज प्रमुख म्हणून संचालकपदावर काम केले. मे २०१० मध्ये वॉशिंग्टनला गेले. तेथे त्यांनी भारतीय दूतावासात व्यापार विभागाची धुरा सांभाळली. अलीकडे ते पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांचे काम विशेष अधिकारी म्हणून पाहात होते.

फ्रान्सशी भारताचे अनेक ऊर्जा करार झाले आहेत त्यात अरिव्हा कंपनीशी जैतापूर अणुभट्टय़ांच्या उभारणीबाबत झालेला करार महत्त्वाचा आहे. एकूण सहा अणुभट्टय़ांचे समझोता करार २०१६ मध्ये झाले असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले नाहीत तर खर्च वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यांना चालना देण्याचे काम क्वात्रा यांना प्रामुख्याने करावे लागणार आहे. संरक्षणक्षेत्रात भारताने ३६ रफाल विमानांच्या खरेदीचा करार फ्रान्सशी केला आहे. त्याची अंमलबजावणी करताना क्वात्रा यांचे काम महत्त्वाचे ठरणार आहे. दोन्ही देशांतील संबंध चांगले असले तरी मॅक्रॉन सत्तेवर आल्यानंतर भारताची प्रतिमा तेथील नवीन सरकारपुढे चांगली जाईल याची जबाबदारी क्वात्रा यांना पार पाडावी लागणार आहे.