काही दिवसांपूर्वीच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) दहावी व बारावीच्या दोन प्रश्नपत्रिका फुटल्या. हे प्रकरण मंडळ तसेच मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बालिशपणे हाताळल्याने पंतप्रधान मोदीही कमालीचे अस्वस्थ झाले होते. देशभरात या पेपरफुटीवरून विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असतानाच  केंद्र सरकारने राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचे – नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) –  प्रमुख म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी विनीत जोशी यांची नियुक्ती केली. या विनीत जोशी यांची ओळख ‘सीबीएसईचे माजी (२०१०-१४) प्रमुख’ अशीच आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गतवर्षी अर्थसंकल्प सादर करताना उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकच यंत्रणा स्थापन करण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत सीबीएसई, एआयसीटीईसारख्या विविध संस्थांमार्फत प्रवेश परीक्षा घेतली जात असे. हे काम एकाच संस्थेमार्फत व्हावे यासाठी आता एनटीएची स्थापना झाली असून पुढील वर्षी प्रथमच जेईईची प्रवेश परीक्षा एनटीएमार्फत घेतली जाणार आहे.

१९९२ च्या तुकडीतील मणिपूर केडरचे आयएएस अधिकारी असलेले विनीत जोशी हे मूळचे अलाहाबादचे. त्यांचे शालेय शिक्षण स्थानिक अ‍ॅनी बेझंट शाळेत झाले. आयआयटी कानपूर येथून पदवी घेतल्यानंतर त्यांनी लखनऊ आयआयएममधून एमबीए केले. प्रशासकीय सेवेत आल्यानंतर युवक कल्याण व क्रीडा, खाद्यान्न प्रक्रिया मंत्रालय अशा अनेक विभागांत त्यांनी जबाबदारीची पदे भूषवली. २०१० मध्ये सीबीएससीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. येथील कारकीर्दीत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबवल्याने त्यांच्या कामाचे कौतुक झाले. मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधील ग्रेडिंगच्या पद्धतीत सुधारणा त्यांच्या काळात झाल्या. विविध भागांत जाऊन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधण्याचा उपक्रमही त्यांनी सुरू केला होता. तेथील कार्यकाळ संपल्यानंतर मणिपूरचे दिल्लीतील निवासी आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेथून एनटीएचे महासंचालक या नव्यानेच निर्माण झालेल्या महत्त्वाच्या पदावर त्यांना आणण्यात आले आहे. या नव्या यंत्रणेत शिक्षणाच्या विविध ज्ञानशाखांतील तज्ज्ञांची नेमणूक केली जाणार आहे. देशभरातील सुमारे ४० लाख विद्यार्थी उच्च शिक्षणासाठीच्या विविध स्पर्धा परीक्षा देत असतात. त्यामुळे या परीक्षांचा दर्जा कायम राखणे, सर्व परीक्षा वेळेत घेणे, त्यांचे निकाल योग्य कालावधीत लागणे, नंतरची प्रवेश प्रक्रिया पारदर्शक ठेवणे अशी अनेक आव्हाने जोशी यांच्यासमोर आता असतील.