अनेक कलांवर, साहित्यावर मनापासून प्रेम करणारी माणसे जगण्याचा आनंद घेत असतात, विठोबा पांचाळ तर या कलांचे आकलन आणि अभ्यास असलेले, त्यापैकी शिल्पकला आणि छायाचित्रणकलांमध्ये गती असलेले असे होते. कोकणी कष्टाळूपणाने ते आपली जिज्ञासा पूर्ण करत, काटकपणाने कोणत्याही- अगदी कितीही अबोल- कलावंत/साहित्यिकाशी संवाद साधत, हे सारे कुठल्याही अभिनिवेशाविना किंवा ‘पोज’विना करणाऱ्या पांचाळ यांची निर्लेप आत्मीयता प्रत्येकाला जाणवून जाई. कलात्मकतेच्या गाभ्याशी जाण्याची वाट पुस्तकीपणाने किंवा केवळ एकाच क्षेत्राच्या चष्म्यातून न शोधता सगळा टापू माहीत करून घेण्याचा पांचाळ यांचा जीवनक्रम होता, त्याला १३ सप्टेंबरच्या पहाटे दीड वाजता विराम मिळाला.

ते मूळचे लांजाचे. कारागिरीला प्रतिष्ठा आणि कलेचे प्रेम असलेल्या घरातले. चित्रकला आणि मूर्तिकला यांचे शिक्षण घरातच मिळाले. प्रथम लांजात आणि पुढे (१९७३) मुंबईत येऊन त्यांनी गणपतीची चित्रशाळा (कारखाना) काढली. मात्र त्या वेळी (१९७६) अंधेरीत राहताना जवळच्याच खासगी कंपनीत नोकरी मिळाल्याने ते तिथे रुजू झाले. संध्याकाळचा वेळ छंदांसाठी देऊ लागले. माणसांच्या छायाचित्रांवरून मोठी चित्रे करणे हा एक छंद. स्वत:च फोटोग्राफी करणे हा दुसरा. नोकरीत स्थिरावल्यावर, स्वत:चा कॅमेराच नव्हे तर घरच्याघरी फोटो ‘धुण्याची’ (डार्करूम) व्यवस्था सर्व रसायनांनिशी करून ते छायाचित्रणाची कामेही घेऊ लागले. नाटक, साहित्य यांची आवड होती ती आता कवितांमधून वहीत उमटू लागली. विजय तेंडुलकरांशी छायाचित्रणामुळे ओळख झाली आणि विठोबा पांचाळ या माणसातले ‘कुतूहल’ तेंडुलकरांनी नेमके हेरले.

शिल्पकला शिकण्यासाठी वाघ, तालीम, यावलकर या मुंबईत दोन-तीन पिढय़ांपासून शिल्पशाळा (फाऊंड्री) चालविणाऱ्या शिल्पकारांकडे ते जाऊन बसत. एकलव्यवृत्तीने आणि या शिल्पकारांना प्रत्यक्ष मदत करून शिकत. या अनौपचारिक शिल्प-शिक्षणाची ‘परीक्षा’ त्यांनी स्वत:च्या आध्यात्मिक गुरूंकडे – विष्णुमहाराज पारनेरकर यांच्याकडे- दिली. ‘मला कमाई नको, पण हे काम मला द्या’ अशा विनंतीनिशी पारनेरकर यांच्या गुरूंचे ब्राँझ शिल्प पांचाळ यांनी घडविले. सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाचीही तयारी प्लास्टपर्यंत पूर्ण झाली होती. पण कॉ. श्री. अ. डांगे यांचा संसदेच्या आवारातील पूर्णाकृती (नऊ फूट) ब्राँझ पुतळा, हे त्यांचे सर्वात मोठे काम.  मालगुंडच्या केशवसुत स्मारकात ‘तुतारी’ हे शिल्प करण्याची संधी मिळाली, तिचे सोने त्यांनी केले आणि विठोबा पांचाळ हा कलावंत झळाळला!

युरोपातील ‘रोमँटिसिझम’ या साहित्यिक विचारशैलीचा शिक्का केशवसुतांवर मारला जातो, पण हे अद्भुतवादी- रोमँटिसिस्ट केशवसुत युरोपीय फ्यूचरिस्टांइतके मराठीतील क्रांतदर्शी ठरतात, याची जाणीव जगाला देणारे हे शिल्प आहे. सरकारी आणि बिगरसरकारी करंटेपणाचा बराच त्रास या ‘तुतारी’ला भोगावा लागला.  ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’च्या स्मरणिका देखण्या होण्यात पांचाळ यांनी टिपलेल्या या व्यक्तित्वदर्शी कृष्णधवल छायाचित्रांचा वाटा होता. ‘विठोबा पांचाळ यांनीच काढलेले छायाचित्र माझ्या निधनानंतर वापरावे’ अशी तेंडुलकरांची इच्छा असल्याचे सर्वज्ञात आहे. त्यांनी छायाचित्रण वर्गही काढले, त्यास प्रतिसाद मिळाला पण आर्थिक नुकसान सोसावे लागले. मात्र, ‘छायाचित्रण : यंत्र आणि तंत्र’ या पुस्तकाच्या (लोकवाङ्मय गृह) बऱ्याच आवृत्त्या निघाल्या.