लहानपणापासूनच तिच्यातील कुतूहल जागे होते. आपल्या अवतीभोवतीच्या जगातील गोष्टी तशाच का घडतात, असे प्रश्न तिला पडत होते. तिची बहीणही त्याच मुशीतून वाढलेली. त्या दोघीही शाळेतून घरी आल्यानंतर छोटे प्रयोग करायच्या. त्यातले बहुतांश फसायचेच. एकदा वडिलांचे दाढीचे ब्लेड व स्वयंपाकघरातील सामान घेऊन जास्वंदाच्या फुलाचे व बेडकाचे केलेले विच्छेदनही तिला आठवते. हे बघून आईने मला सूक्ष्मदर्शक यंत्रच घेऊन दिले. मग बागेतील  वनस्पतींचे त्याखाली निरीक्षण करू लागले. त्यातूनच मला विज्ञानाची गोडी लागली. हा सगळा प्रसंग आहे  सध्या अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात असलेल्या महिला वैज्ञानिक यमुना कृष्णन यांच्या बालपणीचा. त्यांना नुकताच इन्फोसिसचा ६५ लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.

भारतीय शिक्षण पद्धती वाईट आहे, तिथे काही करायला वाव नाही असल्या तक्रारी त्यांनी केल्या नाहीत. लहान महाविद्यालयातून मिळालेले शिक्षण नंतर बंगळूरुच्या आयआयएससीमधले जरा उच्च पातळीवरील शिक्षण यात कुठेही काही कमी नव्हते, फक्त आणखी प्रगतीसाठी मी अमेरिकेत गेले असे त्यांचे म्हणणे आहे.  यमुना यांनी रसायनशास्त्रात एमएस केल्यानंतर बंगळूरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसमधून पीएच.डी. केली. २००२ ते २००४ या काळात त्यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले. रसायनशास्त्राच्या माध्यमातून त्या डीएनए संशोधनाकडे वळल्या. जनुकीय तंत्रज्ञान हा सध्या सर्वानाच आशेचा किरण वाटत आहे. कारण त्यातून अनेक रोग बरे करता येण्याची शक्यता आहे. कृष्णन यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत पेशीतील रसायनांच्या नेमक्या क्रिया कशा चालतात हे जाणून घेण्यासाठी नॅनोबोट्स तयार केले. ते डिझायनर डीएनएवर आधारित होते. एखादी निरोगी पेशी व बाधित पेशी यांच्यात नेमका काय फरक असतो हे त्यातून स्पष्ट झाले. प्रा. कृष्णन या शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराच्या मानकरी असून इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. डीएनएचा त्यांनी पेशीत डोकावण्याचे साधन म्हणून वापर करून घेतला हे त्यांचे वेगळेपण. बंगळूरुच्या एनसीबीएसमध्ये काम केल्यानंतर आठ वर्षांपूर्वी त्या अमेरिकेला गेल्या. त्यांच्या नॅनोबोट्सनी पेशींचे आचरण कसे चालते हे टिपले आहे. पेशींच्या इतर घटकांना धक्का न लावता हे नॅनोबोट्स काम करतात. कुठल्याही क्षेत्रात संघर्ष असतोच, तो नसता तर गंमत राहिली नसती, असे त्यांचे म्हणणे आहे.  पेशींच्या रासायनिक व्यवहारांचे नॅनोबोट्सच्या माध्यमातून चित्रण ही त्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत डीएनए संवेदक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. डीएनएच्या रचनेचा शोध वॉटसन व क्रीक यांनी लावला असला तरी त्याआधीच त्याची सगळी संकल्पना रोझलिन फ्रँकलिन या महिला वैज्ञानिकाने मांडली होती, पण तिला त्याचे श्रेय मिळाले नाही याची खंत कृष्णन यांना आहे. रोझलिन या त्यांच्या या क्षेत्रातील आदर्श आहेत. रोझलिन यांनी टोबॅको मोझॅक व्हायरसवर संशोधन केले व मरताना ते आरॉन क्लुग यांना दिले. नंतर क्लुग यांना नोबेल मिळाले. भारतात ओबेद सिद्दिकी व के. विजयराघवन यांनी विज्ञान संशोधनासाठी जे काम केले त्याचे त्या कौतुक करतात. वैज्ञानिक म्हणून इतरांपेक्षा कुणी वेगळी न समजणारी. चारचौघींसारखीच यमुना कृष्णन आज अमेरिकेत राहून संशोधन करते आहे. कर्करोगासह इतर असाध्य रोगांविरोधातील माणसांच्या लढाईतील एक नॅनोबोट म्हणून काम करते आहे. या पुरस्कारातून तिच्या या कार्याचा सार्थ गौरव झाला आहे यात शंका नाही.