16 December 2019

News Flash

रॉबर्ट मुगाबे

हरारेजवळच्या कुटामा मिशन येथे १९२४ साली कॅथलिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

झिम्बाब्वे स्वतंत्र झाल्यानंतर त्या देशाचे पहिले पंतप्रधान आणि नंतर अध्यक्ष अशी रॉबर्ट मुगाबे यांची ओळख. त्यांनी लोकशाही व समेटाचे आश्वासन देऊन सत्ता हस्तगत केली; पण नंतर ते देशाच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण करू शकले नव्हते. त्यांच्या निधनाने झिम्बाब्वेतील ३७ वर्षांच्या दडपशाहीचा कालखंड पडद्याआड गेला आहे.

हरारेजवळच्या कुटामा मिशन येथे १९२४ साली कॅथलिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या १७ व्या वर्षी ते शिक्षक झाले. नंतर मार्क्‍सवादाकडे झुकलेल्या मुगाबेंनी द. आफ्रिकेतील फोर्ट हारे विद्यापीठातून शिक्षण घेतले. तिथे द. आफ्रिकेतील राष्ट्रवादी नेत्यांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. घाना येथे अध्यापन करीत असताना मुगाबेंवर तिथले क्रांतिकारी नेते क्वामे एन्क्रुमाह यांचा प्रभाव पडला. नंतर ते ऱ्होडेशियात परतले आणि स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाले. दहा वर्षे तुरुंगवासात राहिले. ब्रिटिशांची वसाहत असलेल्या ऱ्होडेशियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मुगाबेंचा वाटा असला, तरी नंतर त्यांनी आपल्या राजकीय टीकाकारांना चिरडून टाकले. शिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेचे मातेरे केले. वांशिक समेटाच्या त्यांच्या धोरणाचे सुरुवातीला कौतुक झाले. त्यात त्यांनी कृष्णवर्णीय बहुसंख्याकांना आरोग्य व शिक्षण सुविधा मिळवून दिल्या. मुगाबेंनी स्वातंत्र्यासाठी गनिमी काव्याने लढा देताना ‘झिम्बाब्वे आफ्रिकन नॅशनल युनियन’चा ताबा घेतला होता.

सत्तेवर आल्यानंतर त्यांनी वसाहतवादी लढय़ातले आधीचे नेते आणि मुगाबेंचे सहकारी जोशुआ एन्कोमो यांना शस्त्रसाठा प्रकरणात गुंतवून मंत्रिपदावरून दूर केले होते. हे इथवरच थांबले नाही, तर मुगाबेंनी त्यांच्या राजवटीत किमान वीस हजार संशयित बंडखोरांना ठार केले. पण तरीही ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा नेता’ अशीच त्यांची प्रतिमा जगासमोर राहिली. पाश्चिमात्य देशांचा विरोधक म्हणून त्यांनी नेहमीच त्यांचा दरारा कायम ठेवला. मुगाबे  यांनी राजकीय विरोधकांना  चिरडून टाकले; देशाची अर्थव्यवस्थाही त्यांच्या काळात लयाला गेली. एके काळी स्वयंपूर्ण असलेल्या या देशाला मदतीसाठी याचना करण्याची वेळ आली.  मुगाबेंचा एकाधिकारशाहीचा कारभार हेच त्याचे कारण होते.

परंतु तरीही आफ्रिकी नेत्यांसाठी ते वसाहतवादीविरोधी लढय़ाचे प्रतीक होते.मुगाबेंनी वांशिकतामुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी काही पावले उचलली खरी; पण १९९२ मध्ये लागू केलेल्या जमीन अधिग्रहण कायद्याने त्यावर पाणी फिरवले. अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी २००२ मध्ये ग्रामीण मतदारांना मतदानापासून रोखले होते. त्या निवडणुकीतील हिंसाचार व इतर बाबींमुळे अमेरिका, ब्रिटन व युरोपीय समुदायाने त्यांना मान्यता नाकारली होती. त्यानंतर राष्ट्रकुलात झिम्बाब्वे वेगळा पडत गेला. त्याचा फार मोठा परिणाम त्या देशावर झाला. जे लष्करशहा त्यांच्याशी एकनिष्ठ होते, त्यांनीच मुगाबेंविरोधात बंड केले. त्यामुळे २०१७ च्या नोव्हेंबरमध्ये मुगाबेंना पायउतार व्हावे लागले होते. सत्ता गेल्यानंतर त्यांची प्रकृतीही ढासळत गेली.

एकाधिकारशाही राबवणाऱ्या सत्ताधीशात आतून जो भयगंड असतो, तो मुगाबेंच्यात होता हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरून दिसते. तरी काहीशा विक्षिप्त, चमत्कारिक विधानांमुळे आणि बारीकशी मिशी व जाड चष्माधारी छबीमुळे मुगाबे अनेकांना कायम लक्षात राहतील!

First Published on September 7, 2019 4:37 am

Web Title: longtime leader of zimbabwe robert mugabe profile zws 70
Just Now!
X