अगदी १९९०पर्यंतच्या काळात पातळ पट्टी आत गुंडाळलेल्या ‘ऑडिओ कॅसेट’ हे मनोरंजनाचे स्वस्त आणि मस्त साधन होते.  ही कॅसेट टेप हा प्रकार तयार केला तो लोव ऑटेन्स यांनी. त्यांचे नुकतेच (६ मार्च) निधन झाले. फिलिप्स या डच कंपनीत, बेल्जियममधील प्रकल्पात उत्पादन प्रमुख  काम करताना लो यांनी एके रात्री सुट्या टेपमधील ध्वनिमुद्रण ऐकण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी १९६३ मध्ये कॅसेट टेप तयार केली!  ध्वनिमुद्रणाची रिळे (स्पूल) एकामागून एक ऐकणे हे तोवर कटकटीचे होते त्यात सलगता नव्हती. त्यासाठी हे सगळे ध्वनिमुद्रण एका पट्टीवर आणणे गरजेचे होते. ऑटेन्स यांनी फिलिप्सच्या ध्वनिमुद्रण विभागातील अभियंत्यांना बोलावून त्यांच्या मनातील कल्पना सांगितली. जॅकेटच्या खिशात बसेल एवढी कॅसेट मला तयार करून हवीय, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली… कालांतराने ती पूर्ण झाली. एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येणाऱ्या या व्हिनाइल टेप्स होत्या. त्यांवर सोपेपणाने ध्वनिमुद्रण होई. या टेपमुळे मैफिलींचे ध्वनिमुद्रण सुलभ झाले, प्रेमसंदेशांची देवाणघेवाणही होऊ लागली. वाहनांमध्ये कॅसेट प्लेयर लावले जाऊ लागले. १९७० च्या दशकातील कॅसेटची ही सुविधा नंतर सीडीमध्ये रूपांतरित झाली.

लोव ऊर्फ लोडविक फ्रेडरिक ऑटेन्स यांचा जन्म नेदरलँडसमधील बेलिंगवोल्डचा. ते डेल्फ्ट विद्यापीठातून यंत्र-अभियांत्रिकी शिकले व १९५२ पासून फिलिप्समध्ये आले. पोर्टेबल यंत्रांवर त्यांचा भर होता. कॅसेट टेपची कल्पना सुचली, तेव्हा त्यांनी कोटाच्या खिशात एक लाकडी पेटी कॅसेट बसेल या आकाराची करून घेतली होती. फिलिप्सच्या संग्रहालयात तो पहिला कॅसेट रेकॉर्डर अजूनही आहे. १९६३ मध्ये बर्लिनच्या व्यापार- प्रदर्शनात ‘कॅसेट’ अवतरली! जपानी लोकांनी आमच्या कॅसेटची जास्त छायाचित्रे घेतली असे तेव्हा ऑटेन्स यांनी म्हटले होते. फिलिप्सने या कॅसेट संकल्पनेसाठी परवाना मुक्त ठेवल्यामुळे नंतर अनेकांनी नक्कल केली.  फि लिप्सने जगात १०० अब्ज कॅसेट विकल्या होत्या. ‘व्हीएचएस’ ही ध्वनिचित्रमुद्रणाची प्रणाली तयार करण्यात मात्र ऑटेन्स यांना अपयश आले. १९८६ मध्ये ते फिलिप्समधून निवृत्त झाले. कॅसेटच्या निर्मितीचे श्रेय घेण्यासाठी त्यांनी चढाओढ केली नाही. पुढे कॅसेट कालबाह््य झाल्या, तरी संगीताच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहणार आहे.  ‘कॅसेट- अ डॉक्युमेंटरी मिक्सटेप’ (२०१६) हा झॅक टेलर यांनी केलेला माहितीपट लोव ऑटेन्स यांच्या कार्याची उचित नोंद घेतो.