कारगिल युद्धातील विजयाचे अनेकजण शिल्पकार ठरले. भारतीय भूमीत शिरलेल्या पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळण्यासाठी भारतीय लष्करातील अधिकारी-जवानांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. शत्रूने बळकावलेला प्रदेश ताब्यात घेण्यात महत्त्वाची कामगिरी निभावणारे हे वीर देशवासीयांना सदैव प्रेरणा देतात. टायगर हिलसह परिसरातील महत्त्वाची ठाणी ताब्यात घेणाऱ्या १३ व्या जम्मू-काश्मीर रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर योगेश कुमार जोशी हे त्यापैकीच एक. कारगिल युद्धात जो प्रदेश त्यांच्या व्यूहरचनेतून भारतीय लष्कराने परत मिळविला, त्याच क्षेत्राच्या सुरक्षेची भिस्त सांभाळणाऱ्या १४ कोअरचे प्रमुख म्हणून आता जोशी यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय लष्करातील या कोअरवर पूर्व-पश्चिमी लडाखच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. त्यात कारगिलचाही अंतर्भाव होतो. एकीकडे पाकिस्तानची नियंत्रण रेषा, तर दुसरीकडे चीनलगतची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा. दोन्ही आघाडय़ांवर कोअरला सजग राहावे लागते. जगातील सर्वात उंचावरील रणभूमी अर्थात सियाचीनदेखील या कोअरअंतर्गत समाविष्ट आहे. तिचे ‘जनरल ऑफिसर अन् कमांडिंग’ अर्थात प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल जोशी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांनी या क्षेत्रात पूर्वी ब्रिगेड आणि डिव्हिजनचे नेतृत्व केले आहे. या आधी ते महानिरीक्षक (पायदळ) या पदावर कार्यरत होते.

अतिउंच पर्वतरांगांनी वेढलेले हे दुर्गम क्षेत्र कित्येक महिने बर्फाच्छादित असते. कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांनी उंचावरील ठाणी बळकावल्याने भारतीय सैन्य दलाच्या हालचाली, पुरवठा व्यवस्था आदींबाबतची माहिती प्राप्त करणे पाकिस्तानला सुकर झाले. इतकेच नव्हे तर, या क्षेत्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या ५६ ब्रिगेडचे मुख्यालयही घुसखोरांच्या दृष्टिपथात होते. या स्थितीत भारतीय लष्कराने- जोशी यांच्या नेतृत्वाखालील १३ व्या जम्मू-काश्मीर रायफल्सच्या बटालियनने – चार यशस्वी हल्ले चढविले. त्यात  ‘पॉइंट ४८७५’चा समावेश आहे. जोशी यांच्या बटालियनने कारगिल युद्धात पराक्रमाची पराकाष्ठा करत उंचावरील भारतीय ठाण्यांवर वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. या बटालियनच्या कामगिरीचा ‘शुरांमधील शूर वीर’ म्हणून गौरव झाला. बटालियनला दोन परमवीरचक्र, आठ वीरचक्र, १४ सेना पदके प्राप्त झाली. कारगिल युद्धातील कामगिरीबद्दल जोशी यांना ‘वीरचक्र’ देण्यात आले. तत्पूर्वी त्यांचा सेना पदक, अतिविशिष्ट सेवा पदकाने गौरव झाला आहे.

Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Bharat Jodo Abhiyaan
भारत जोडो अभियानाची निवडणूकपूर्व राजकीय मशागत आघाडीच्या पथ्यावर!
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

सीमावाद सोडविण्यासाठी चीन-भारत यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत भारतीय शिष्टमंडळाकडून जोशी यांचा अनेकदा सहभाग राहिला. पूर्व लडाख येथील ब्रिगेड, डिव्हिजनचे नेतृत्व त्यांनी केले आहे. तसेच लष्करी मुख्यालयात लष्करी कार्यवाही विभागाची जबाबदारी त्यांनी काही काळ सांभाळली आहे. लष्करातील हा दांडगा अनुभव त्यांना नवीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यास बळ देईल.