मुळात पंडित म्हणून मान्यता मिळण्यातच आयुष्य खर्ची पडत असताना त्यामागे ‘प्रकांड’ हे विशेषणही मिरवता येण्यासाठी विद्वत्तेच्या प्रांतात डॉ. म.अ. मेहेंदळेच व्हावे लागते. वयाची शंभरी उलटलेल्या मेहेंदळे यांनी आपले सारे आयुष्य केवळ अभ्यासातच आणि अभ्यासासाठीच व्यतीत केले. त्यामुळे ते निवास करीत असलेल्या पुणे शहरात किं वा महाराष्ट्रात किं वा अगदी भारतातही त्यांची प्रगाढ विद्वत्ता माहीत नसणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. परंतु, जगातील विद्वानांच्या जगात मधुकर अनंत मेहेंदळे या नावाचा प्रचंड दबदबा राहिला.

संस्कृत, प्राकृत, निरुक्त, महाभारत तसेच ‘अवेस्ता’ या पारशी धर्मग्रंथाचे ते अभ्यासक होते. या क्षेत्रात त्यांचा शब्द शेवटचा मानला जात असे. त्यांच्या या अभ्यासकामांची व्याप्ती पाहून कु णाचीही छाती दडपून जाते. संस्कृत, इंग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषांत त्यांनी केलेले लेखन त्या विषयातील अभ्यासकांसाठीचे संदर्भ म्हणूनच मान्यताप्राप्त झाले. पुण्यातील डेक्कन कॉलेज या संस्थेत त्यांनी १९४३ मध्ये ‘हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ इन्स्क्रिप्शनल प्राकृत’ (प्राकृत शिलालेख) या विषयावर संशोधन करून त्यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केली. हा प्रबंध डेक्कन कॉलेजनेच प्रकाशितही केला. काही काळ महाविद्यालयीन अध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते प्रपाठक म्हणून डेक्कन कॉलेजमध्ये रुजू झाले. त्यानंतरच्या काळात ते जगभरातील संशोधकांसाठी प्रत्यक्ष व्याख्याने देत राहिले. विविध विषयांवर लेख लिहीत राहिले. संशोधनाअंती ग्रंथ लिहीत राहिले. त्यामुळेच त्यांना वयाच्या ३४व्या वर्षी (१९५२) जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाची अभ्यागत पाठय़वृत्ती (व्हिजिटिंग फेलोशिप), तर ३९व्या वर्षी अमेरिके तील रॉकफे लर फौंडेशनची प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती १९५७ मध्ये मिळाली.

सतत अभ्यासात गढून गेलेल्या मेहेंदळे यांना निवृत्तीनंतरही भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत येण्याचे निमंत्रण खुद्द रा. ना. दांडेकर यांनीच दिले. ‘एपिलॉग ऑफ द महाभारत’ या प्रकल्पाचे ते संपादक झाले आणि त्यांच्या अत्यंत आवडत्या महाभारत या विषयात त्यांनी स्वत:ला अक्षरश: झोकून दिले. त्यातूनच पुढे ‘कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही त्यांनी पूर्ण केला. नेमस्तपणे केलेले हे प्रचंड काम कोणताही मोबदला न घेता करणारे मेहेंदळे हे सर्वासाठी आदराचे बनले. ‘ऋग्वेद संहिताकार आणि फादर एस्टेलर’यासारख्या त्यांच्या पुस्तकांची, किंवा अन्य निबंधांच्या विषयांची नावे वाचून त्यावरील त्यांचे लेखन सामान्यांसाठी नाहीच, असा समज होऊ शकतो. पण अतिशय सुलभ, सुगम रीतीने लिहिलेले त्यांचे लेखन हा लेखकांसाठीचाही एक आदर्श ठरावा. एकाच आयुष्यात किती आणि केवढे प्रचंड काम करता येऊ शकते, याचा वस्तुपाठ मेहेंदळे यांच्या रूपाने जगासमोर राहिला आहे. अध्ययन आणि अध्यापन हेच जीवनध्येय मानून शांत चित्ताने, सतत ज्ञानाच्या वाटेवर चालत राहणारे, प्रसिद्धी, पुरस्कार, सत्कार याच्या पलीकडे जाऊन जीवनाला सामोरे जाणारे असे विद्वान अन्यांना नतमस्तक होण्यास भाग पाडतात.

त्यांच्या निधनाने (१९ ऑगस्ट) भारतातील विद्वानांच्या परंपरेतील एक अतिशय महत्त्वाचा दुवा निखळला आहे.