महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, आंध्र, तेलंगण आदी आजच्या राज्यांमधील घराघरांत ‘शेवयांचा पाट’ नावाची वस्तू अगदी १९५० च्या दशकापर्यंत असायची. हळूहळू हा पाट दिसेनासा झाला आणि १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात घरगुती पापड, कुरडया वा सांडगे करून देणाऱ्या काही महिला शेवयांचीही ‘ऑर्डर’ घेऊ लागल्या. वाण्याच्या दुकानांतही तयार शेवया दिसू लागल्या.. पण शेवयांचा ‘ब्रॅण्ड’ वगैरे तयार होईल असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. ते १९८२ सालापासून घडवून आणले, मयादम कृष्ण राव यांनी! ‘बॅम्बिनो’ ब्रॅण्डच्या शेवया देशभरच नव्हे तर परदेशातही पोहोचवणाऱ्या या राव यांचे निधन १२ जानेवारीस झाले.

त्यांचे घराणे तसे उद्योगी. विडीचा पिढीजात धंदा कृष्ण राव यांनी चिरुटांपर्यंत नेला. चिरूट निर्यात करता येतील का, याची चाचपणी केली. ‘अ‍ॅम्प्रो’ नावाने बिस्किटे काढली, तीही दक्षिण भारतात- विशेषत: आंध्रात- लोकप्रिय केली. बिस्किटांसाठी यंत्रसामग्री शोधण्यासाठी जर्मनीमध्ये एका व्यापारी प्रदर्शनास गेले असता, तेथील एक यंत्र पाहून त्यांना औद्योगिक स्तरावर शेवया बनविण्याची कल्पना सुचली. तिचा पाठपुरावा त्यांनी ‘लायसन्स राज’ ऐन भरात असतानाही केला आणि अखेर, स्पॅगेटी पास्ता बनविणाऱ्या त्या यंत्रात भारतीय शेवयांना साजेसे फेरफार करवून घेऊन, शेवया तयार करणे सुरू झाले. १९८२ सालीच नेसले या तगडय़ा बहुराष्ट्रीय कंपनीने ‘मॅगी नूडल्स’ भारतात आणल्या होत्या. ‘मॅगी’चा इतिहास १०० वर्षांचा, म्हणजे १८८२ पासूनचा, तर राव यांची ‘बॅम्बिनो’ नुकती कुठे स्थापन झालेली! पण या दोन कंपन्यांचे आवाहन निरनिराळय़ा चवींना असल्यामुळे स्पर्धा न करता दोन्ही कंपन्या वाढल्या. लघुउद्योगापेक्षा थोडय़ा मोठय़ा आकाराचा उद्योग म्हणून सुरू झालेल्या ‘बॅम्बिनो’ने मार्च २०२० मध्ये बाजार-भांडवल १६८.०३ कोटी रुपयांवर, तर गहू-आधारित उत्पादनांच्या विक्रीतून होणारी कमाई २४६.५५ कोटी रुपयांपर्यंत, इतकी प्रगती केली. ‘बॅम्बिनो अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या समभागाचे मूल्य वाढत जाऊन २००-२५० रुपयांच्या घरात गेले. ही सारी वाटचाल संस्थापक आणि ‘अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक’ एम. कृष्ण राव यांच्या मार्गदर्शनाखालीच झाली होती. मुले हाताशी आली, तीही कंपनी सांभाळू लागली पण कृष्ण राव हे अखेपर्यंत कार्यरत राहिले.

खाद्यप्रक्रिया उद्योगांत ७० वर्षांत काहीच झाले नाही, असा निराशावाद बाळगणाऱ्यांसाठी कृष्ण राव हे एक प्रेरणास्थानच ठरावे. सरकारकडून जंगी सवलती न घेता, शेतकऱ्यांनाही तक्रारीस जागा न ठेवता राव यांनी ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोपीय देशांपर्यंत भारतीय ‘शेवई’ पाठविली!