24 September 2020

News Flash

माधव कोंडविलकर

अस्पृश्य जातीत जन्मलेल्या, वाढलेल्याची गावगाडय़ात होणारी नाडवणूक कोंडविलकरांच्याही वाटय़ाला आली.

माधव कोंडविलकर

कोकणातील दलित- उपेक्षितांचे जिणे आपल्या कथा-कादंबऱ्यांतून टिपणाऱ्या माधव कोंडविलकर यांची निधनवार्ता गत शनिवारी आली आणि दलित साहित्यातील मागच्या पिढीचा अखेरचा दुवा निखळल्याची भावना व्यक्त झाली. परंतु ‘दलित साहित्य’ या संकल्पनेविषयी खुद्द कोंडविलकरांनी मतभेद नोंदवले होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचे, तर ते ‘पिचल्या, भरडल्या गेलेल्यांचे’ लेखक होते. १९४१ साली कोकणात, चर्मकार कुटुंबात जन्मलेल्या कोंडविलकरांनीही वैयक्तिक आयुष्यात तसे ‘पिचले-भरडलेपण’ अनुभवले. अस्पृश्य जातीत जन्मलेल्या, वाढलेल्याची गावगाडय़ात होणारी नाडवणूक कोंडविलकरांच्याही वाटय़ाला आली. राजापूरच्या सोगमवाडीत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर, मुंबईत माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कोकण विभागात प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतरही उपेक्षेचे, जातीयतेचे चटके त्यांना सोसावे लागले. अशा वेळी कुठल्याही संवेदनशील मनाला शब्दांचा आधार वाटतो, तसा तो कोंडविलकरांनाही वाटला. त्यांनी लिहिलेले अनुभव वर्तमानपत्रांतून, ‘अस्मितादर्श’मधून प्रसिद्ध होऊ लागले. मधु मंगेश कर्णिकांच्या प्रोत्साहनाने ‘तन्मय’ दिवाळी अंकात त्यांचे लेखन १९७७ साली प्रथम प्रकाशित झाले. डायरीतल्या नोंदींसारखे हे लेखन दोन वर्षांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या नावाने पुस्तकरूपात आले आणि एका दुर्लक्षित, उपेक्षित जीवनविश्वाचा परिचय मराठी वाचकांना झाला. पुढे हिंदी व फ्रेंच भाषेत अनुवाद झालेल्या या पुस्तकामुळे कोंडविलकर ‘मराठी लेखक’  झाले. पुढच्या दोन दशकांत शिक्षकी पेशामुळे राजापूर, दापोली, देवरुख पट्टय़ातील समाजजीवन त्यांनी जवळून पाहिले. दलित समाजातील सामाजिक-सांस्कृतिक अगतिकता त्यांनी अनुभवली, तशीच गावगाडय़ात रुतलेल्या आयुष्यातील कुतरओढही दुर्लक्षिली नाही. हे जगणे त्यांनी आधी कथांतून, मग ‘अजून उजाडायचं आहे’, ‘कळा त्या काळच्या’, ‘अनाथ’ अशा आत्मकथनात्मक आणि ‘छेद’, ‘आता उजाडेल’, ‘झपाटलेला’ अशा स्वतंत्र कादंबऱ्यांतूनही मांडले. राजापुरी बोलीचा वापर, कोकणातील ग्रामीण जीवनाचा पैस त्यांच्या लेखनात दिसतो. त्यामुळेच बाबुराव बागुलांनी त्यांना ‘कोकणातच अडकलेला भांबावलेला लेखक’ म्हटले असले तरी, मुंबईतील उपेक्षितांचे, गिरणी कामगारांचे जगणे टिपणारी ‘देशोधडी’ ही कादंबरी, शेतकरी आत्महत्येची ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झालेली बातमी वाचून लिहिलेली ‘डाळं’ किंवा ‘एक होती कातळवाडी’, ‘भूमिपुत्र’ या जागतिकीकरणाचे परिणाम मांडणाऱ्या कादंबऱ्या असोत; कोंडविलकरांनी प्रादेशिकतेची तसेच दलित साहित्याची चौकटही ओलांडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:01 am

Web Title: madhav kondwilkar profile abn 97
Next Stories
1 जाफर गुलाम मन्सूरी
2 यिरी मेंझेल
3 डॉ. रवींद्रनाथ टोणगांवकर
Just Now!
X