आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाहून घेणारे मधुकर धस यांच्या निधनाने राज्याने एक सच्चा पाणीदार माणूस गमावला आहे. धस मूळचे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंबजवळ असलेल्या भोग गावचे. आईवडील शेतमजूर. त्यामुळे शेतकऱ्यांची दु:खे बघतच ते मोठे झाले. मराठीत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या ‘जाणीव’ या संस्थेत त्यांनी नोकरी पत्करली. वेतन केवळ दीड हजार रुपये. ही नोकरी करत असताना त्यांचा शेतकऱ्यांचे दु:ख, त्यांना भोगाव्या लागणाऱ्या वेदनांशी जवळून परिचय झाला. आता आयुष्यभर याच प्रश्नासाठी झटायचे असे ठरवून धस यांनी नोकरी सोडली व यवतमाळ जिल्ह्य़ातील घाटंजीजवळच्या चोरांबा गावात ‘दिलासा’ नावाची संस्था सुरू केली.

१२ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. बघता बघता ‘दिलासा’ संस्थेने व्यवस्थेमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आपलेसे करून घेतले. आत्महत्या झाली की धस सर्वात आधी त्या गावात जायचे. जीव दिलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत करायचे. ‘दिलासा’कडून मिळणारी आर्थिक मदत थोडी असायची; पण आधार मोठा असायचा. अशा कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे, शेतकरी विधवांना पायावर उभे राहता यावे यासाठी शिलाई मशीन देणे, त्यांना शिवणाचे काम मिळण्याची व्यवस्था करणे अशी अनेक कामे धस यांच्या पुढाकारातून यवतमाळ उस्मानाबाद जिल्ह्य़ांत झाली. कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून धस यांनी पाण्याचा डोह (साठवण-तलाव) शेतात तयार करून देण्याची योजना मोठय़ा प्रमाणावर अगदी यशस्वीपणे राबवली. दिलासाची मदत व लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या या डोहांमुळे हजारो शेतकऱ्यांचे जगणे सुकर झाले. शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची सोय करतानाच त्यांच्या राहण्याचा प्रश्न उभा ठाकला. तेव्हा धस यांनी पुसदला भव्य असे वसतिगृह उभारले व त्याला ‘हसरे घरकुल’ असे सार्थक नाव दिले. धस केवळ डोहनिर्मितीवरच थांबले नाही, तर अनेकांच्या शेतात त्यांनी जलसंवर्धनाची कामे केली. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना ‘पाणीदार माणूस’ म्हणून गौरवण्यात आले. एके काळी दीड हजाराची नोकरी करणाऱ्या धस यांच्या संस्थेत आज दीड हजार स्वयंसेवक वेतनावर काम करतात. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नावावर प्रसिद्धी मिळवून घेणारी कार्यकर्त्यांची एक फौजच आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ात तयार झाली, पण बातम्यांनी प्रश्न सुटत नाही, असे म्हणत धस प्रसिद्धीपासून कायम दूर राहिले.

अशा या उमद्या कार्यकर्त्यांला वयाच्या ४८व्या वर्षी हाडाच्या कर्करोगाने ग्रासले. मुंबईत उपचार घेत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे पार्थिव नेण्यासाठी सरकारचे विमान दिले. साधी राहणी, कामाप्रति निष्ठा व बळीराजाच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी अहोरात्र झटणारा एक सच्चा कार्यकर्ता धस यांच्या निधनाने राज्याने गमावला आहे.