03 June 2020

News Flash

मधुकर जोशी

 गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ जोशी यांच्या गाण्यांचे गारूड रसिकांच्या मनावर होते आणि यापुढेही राहील

मधुकर जोशी

‘झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात.. प्रियाविण उदास वाटे रात’, ‘आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे’, ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे’, ‘माती सांगे कुंभाराला’, ‘हले हा नंदाघरी पाळणा’, ‘अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती’, ‘या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार’.. अशी एकाहून एक अवीट गोडीची गाणी लिहिणारे कवी-गीतकार मधुकर जोशी वयाच्या नव्वदाव्या वर्षी मंगळवारी निवर्तले.

गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ जोशी यांच्या गाण्यांचे गारूड रसिकांच्या मनावर होते आणि यापुढेही राहील. ‘मालवल्या नवमंदिरातल्या तारांच्या दीपिका’ हे त्यांचे पहिले गीत आकाशवाणीवर ध्वनिमुद्रित होऊन सादर झाले आणि त्यानंतर जोशी यांचा काव्य/गीत लेखनप्रवास अव्याहत सुरूच राहिला. कविवर्य कुसुमाग्रज, गीतकार ग. दि. माडगूळकर यांना जोशी यांनी गुरूस्थानी मानले होते. साहजिकच त्यांची छाप जोशी यांच्या काव्यावर उमटली.

साधी-सोपी, पण अर्थपूर्ण व आशयगर्भ शब्दरचना ही जोशी यांच्या काव्यलेखनाची वैशिष्टय़े. त्यांनी आजवर सुमारे चार हजार कविता, गाणी लिहिली. वसंत प्रभू, विठ्ठल शिंदे, गोविंद पोवळे, राम कदम, अनिल मोहिले, श्रीनिवास खळे, वसंत आजगावकर आणि दशरथ पुजारी या संगीतकारांनी जोशी यांच्या गाण्यांना स्वरबद्ध केले. या साऱ्यांत दशरथ पुजारी यांच्याबरोबर त्यांचा विशेष स्नेह होता. जोशी यांनी गाणे रचायचे आणि पुजारी यांनी ते संगीतबद्ध करायचे, असा अलिखित संकेतच होता! सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा, कृष्णा कल्ले, आशा भोसले यांनी आपल्या स्वरातून जोशी यांचे शब्द अधिक प्रभावीपणे रसिकांपुढे सादर केले. ‘एक धागा सुखाचा’, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘सप्तपदी’ आदी मराठी चित्रपटांसाठीही जोशी यांनी गीतलेखन केले होते.

जोशी हे मूळचे नाशिकचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नोकरीनिमित्त नाशिकहून कल्याणला आले आणि नंतर ते डोंबिवलीत स्थायिक झाले. केंद्र सरकारच्या अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळात त्यांनी निरीक्षक म्हणून नोकरी केली. १९८८ मध्ये ते वरिष्ठ मुख्य अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. असे म्हटले जाते की, जोशी यांनी त्यांची अनेक गाणी मुंबईतील त्यांच्या कार्यालयात जाता-येता केलेल्या नित्याच्या, उपनगरीय रेल्वेच्या प्रवासात लिहिली!

जोशी यांनी आकाशवाणीसाठी लिहिलेल्या २० संगीतिका ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा, मालती पांडे यांनी गायल्या. ‘गुरुगीत संग्रह’, ‘गुरुगौरव गाथा’, ‘माधवराव पेशव्यांचा काव्यसंग्रह’, ‘मधुशाला’ ही त्यांची काव्यविषयक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. राज्य नाटय़ पुरस्कार, स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती गौरव, चतुरंग प्रतिष्ठान आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2020 12:00 am

Web Title: madhukar joshi profile abn 97
Next Stories
1 फिलिप अँडरसन
2 सी. बी. नाईक
3 वसंत गोरे
Just Now!
X