मातृभाषेची दुरवस्था स्वभाषकांच्या दुर्लक्षामुळे झालेली नसून बा शक्तीकडून  खरोखर गळचेपी होते आहे, याची जाणीव झाल्यावर माणसे हा दबाव झुगारण्यासाठी पेटून उठतात. ‘पूर्व पाकिस्तान’मध्ये ही जाणीव होण्यास वेळ लागला नाही, बांगला भाषेसाठी तेथे १९४८ पासूनच चळवळ सुरू झाली आणि अखेर १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली. भाषिक राष्ट्रवादाची ही चळवळ टिपेला पोहोचली असताना, १९७० मध्ये मुहम्मद जहांगीर यांनी ‘दैनिक बांगला’ या वृत्तपत्रापासून पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. गेल्या सुमारे अर्धशतकभरात केवळ पत्रकार न राहता, सांस्कृतिक क्षेत्रात संस्था-उभारणी करणाऱ्या जहांगीर यांचे १० जुलैच्या सकाळी कर्करोगाने निधन झाले.

‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन’चे कार्यकारी संचालक आणि टागोर-नझरूल यांची, तसेच कथ्थक नृत्याची परंपरा जिवंत ठेवणाऱ्या ‘नृत्यांचल’ या संस्थेचे संस्थापक, अशी जहांगीर यांची ओळख आहे. त्यांनी लिहिलेल्या वा संपादित केलेल्या पुस्तकांची संख्या आहे २५ आणि ती सारी बांगला भाषेतच आहेत. ‘अभिमत’ हा बांगलादेशी चित्रवाणीवरील पहिला राजकीय चर्चात्मक कार्यक्रम १९९८ साली त्यांनी सुरू केला. या कार्यक्रमाचे संकल्पक आणि सादरकर्तेही तेच होते. नंतरही सुमारे आठ निरनिराळ्या सामाजिक-राजकीय कार्यक्रम-माला त्यांनी चित्रवाणीवर केल्या. परंतु त्याआधीची अनेक वर्षे, छापील वृत्तपत्रांतही त्यांनी उत्तम काम केले. बांगला मुक्ती चळवळीत विद्यापीठांतील असंतोषाची बातमीदारी त्यांनी केली होती. या चळवळीपायी अर्धवट राहिलेले उच्चशिक्षण त्यांनी १९७४ मध्ये, बांगला साहित्यात पदव्युत्तर पदवी घेऊन पूर्ण केले. मात्र याही काळात ‘दैनिक बांगला’चे प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत होते. तेथून १९८० मध्ये ते ‘प्रेस इन्स्टिटय़ूट ऑफ बांगलादेश’मध्ये, पत्रकारांचे प्रशिक्षक म्हणून काम करू लागले. कोलकात्याच्या ‘आजकाल’ या दैनिकाचे ढाका वार्ताहर म्हणून ते कार्यरत राहिले. पुढे मात्र, आपल्या बातमीदारीपेक्षा प्रशिक्षित पत्रकार घडवण्याचे आपले काम अधिक आवश्यक आहे, त्यातही ‘विकास-पत्रकारिते’चे क्षेत्र का महत्त्वाचे हे तरुण पिढीला पटवून देणे गरजेचे आहे, हे ओळखून त्यांनी माध्यम-अध्यापन क्षेत्रात पाय रोवले. अन्य क्षेत्रांशी तरुणपणापासूनच जहांगीर यांनी संबंध कायम ठेवला. नाटय़ क्षेत्राशी ते संबंधित होते. ‘इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूट’च्या कार्यकारिणीवरही त्यांची निवड झाली होती आणि नृत्यांचलची स्थापनाच त्यांनी केली होती. जहांगीर यांना पुरस्कार वगैरे फारसे मिळाले नाहीत.. पण ‘नोबेल पारितोषिका’चे मानकरी मोहम्मद युनूस हे त्यांचे सख्खे बंधू होते!