25 February 2021

News Flash

मेजर जनरल (निवृत्त) बसंत कुमार महापात्र

शिक्षणानंतर महापात्र हे लष्कराच्या चिलखती (रणगाडा) दलात लढाऊ अधिकारी पदावर दाखल झाले.

मेजर जनरल (निवृत्त) बसंत कुमार महापात्र

लष्कराच्या प्रदीर्घ सेवेत चार युद्धांत सहभाग नोंदविणारे आणि निवृत्तीपश्चात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांतही आघाडीवर राहणारे मेजर जनरल बसंत कुमार महापात्र यांचे अलीकडेच निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. सैन्यदलाच्या कठोर शिस्तीत वावरणारी व्यक्ती सार्वजनिक जीवनात लवकर रुळत नसल्याचा एक समज आहे; परंतु ओडिशातील या योद्धय़ाने तो खोटा ठरविला. चार युद्धांचा अनुभव असणारे महापात्र तरुण पिढीचे मार्गदर्शक होते. अपंगांच्या कल्याणार्थ त्यांनी पुढाकार घेतला होता.

शिक्षणानंतर महापात्र हे लष्कराच्या चिलखती (रणगाडा) दलात लढाऊ अधिकारी पदावर दाखल झाले. ४० वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांची यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. १९६१ चा गोवामुक्ती संग्राम, १९६२ मध्ये भारत-चीन, १९६५ आणि १९७१ मधील भारत-पाकिस्तान या युद्धात त्यांनी शत्रूशी दोन हात केले. पाकिस्तानशी झालेल्या युद्धात चिलखती दलावर मोठी भिस्त होती. तेव्हा पाकिस्तानी लष्कराकडे अमेरिकन बनावटीचे पॅटन रणगाडे होते. त्यांच्यामार्फत भारतीय लष्कराच्या भात्यातील एएमएक्स आणि सेंच्युरिअन या जुनाट रणगाडय़ांवर सहज मात करता येईल, असा पाकिस्तानचा अंदाज होता. भारतीय लष्कराच्या चिलखती दलाने शत्रूचे मनसुबे धुळीस मिळवले. १९६५ मधील युद्धात भारताने पाकिस्तानच्या जवळपास ४७१ रणगाडय़ांचे नुकसान केले. पंजाबच्या खेमकरण भागात कडवा संघर्ष झाला. याच क्षेत्रात मेजर जनरल महापात्र कार्यरत होते. १९७१ च्या युद्धात महापात्र यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने मुमदोत बुल्गी आणि सेजरा येथील मोठय़ा क्षेत्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. या कामगिरीबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. निवृत्तीनंतर महापात्र यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत भरीव योगदान दिले. भारतीय विद्या भवनचे भुवनेश्वरस्थित संज्ञापन आणि व्यवस्थापन केंद्र तसेच कटक आणि तांगी येथील दयानंद अँग्लो वैदिक शाळांशी ते जोडलेले होते. अलाहाबाद विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळात राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून काम पाहिले. या विद्यापीठासह लखनऊ आणि बनारस हिंदू विद्यापीठांत त्यांनी ज्ञानदानाचे काम केले. ओडिशातील थिंक टँक फाऊंडेशनच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. अपंगांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या स्वाभिमान संस्थेत ते कार्यरत होते. मुख्य सल्लागार पदावर असताना महापात्र यांनी संस्थेच्या कामाला नवी दिशा दिली. नव्या पिढीला घडविण्यात मार्गदर्शकाची भूमिका महापात्र यांनी बजावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 12:01 am

Web Title: major general retd basant kumar mohapatra profile abn 97
Next Stories
1 लिन स्टॉलमास्टर
2 न्या. पी. बी. सावंत
3 उदयचंद्र बशिष्ठ
Just Now!
X