News Flash

चेम्मनम चाको

केरळ विद्यापीठाचा शब्दकोश विभाग व प्रकाशन विभागात त्यांनी नोकरी केली. १९८६ मध्ये ते निवृत्त झाले.

चेम्मनम चाको

समाजाकडे तटस्थ दृष्टिकोनातून बघून आरसा दाखवण्याचे काम कलाकार, साहित्यिक नेहमीच करीत असतात, पण ते समजून घेण्याची सहनशक्ती समाजाकडे असणेही आवश्यक असते, जी अलीकडच्या काळात कमी होत चालली आहे. केरळमधील कवी चेम्मनम चाको यांनी त्यांच्या कवितांतून अशाच पद्धतीने तेथील समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांवर टीका केली होती. त्यांच्या निधनाने एक सर्जनशील मार्गदर्शक गमावला आहे.

७ मार्च १९२६ रोजी कोट्टायम जिल्ह्य़ात मुलाकुलम या वैकोमजवळच्या गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पमबाकुडा सरकारी शाळा, पिरावोम माध्यमिक शाळा, अलुवा यू. सी. स्कूल, तिरुअनंतपूरम युनिव्हर्सिटी कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या घरात कुणीच लेखनाकडे वळलेले नव्हते, अशा परिस्थितीत ते लेखणी हाती घेऊन सरस्वतीचे उपासक बनले. सात भावंडांपैकी ते सहावे. घरातल्या लोकांना तर त्यांनी शेतात काम करावे असे वाटत होते, पण त्यांनी पुस्तकांची वाट धरली. शेतातले काम टाळण्यासाठी ते पुस्तके वाचण्याचा बहाणा करीत असत. लहानपणापासून त्यांचे प्रचंड वाचन होते. पिरावोम येथील शाळेत जाताना त्यांना भाताच्या शेतातून वाट काढत जावे लागे. त्या वेळी स्वातंत्र्यलढा सुरू होताच त्यात त्यांनी उडी घेतली नसती तरच नवल!

स्वातंत्र्याच्या प्रेरणेतूनच त्यांनी ‘प्रवचनम’ ही पहिली कविता लिहिली. त्यानंतर त्यांचा ‘विलाम्बरम’ हा काव्यसंग्रह १९४७ मध्ये प्रसिद्ध झाला. शाळा व कॉलेजात त्यांनी मल्याळम भाषा शिकवण्याचे काम केले. केरळ विद्यापीठाचा शब्दकोश विभाग व प्रकाशन विभागात त्यांनी नोकरी केली. १९८६ मध्ये ते निवृत्त झाले. केरळ साहित्यात कवितेतून विनोद व टीकात्मकता या दोन्ही गोष्टी साध्य करणाऱ्या कुंजन नंबियार यांच्याही ते एक पाऊल पुढे होते. विशेष म्हणजे त्यांनी मुलांसाठीही कथा-कविता लिहिल्या होत्या. ‘नेल्लू’ या काव्याने त्यांचे नाव झाले. तो काळ होता १९६७ मधला. त्या वेळी राज्यात दुष्काळ पडलेला असताना लोक रबरासारखी नगदी पिके घेत होते. त्यामुळे लोकांना पुढे गहू व इतर धान्यांसाठी रेशन दुकानांवर अवलंबून राहण्याची वेळ आली, तो या कवितेचा विषय बनला. त्यांच्या त्या काव्याला अशी सामाजिक पाश्र्वभूमी होती. त्यांच्या कवितांची भाषांतरे इंग्रजीत करण्यात आली. ती भारतीय कवितांच्या ऑक्सफर्ड संग्रहात समाविष्ट आहेत. केरळ साहित्य अकादमी व केरळ चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे ते सदस्य होते. १९७७ मध्ये त्यांच्या राजपथ काव्यसंग्रहास केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, तर २००६ मध्ये त्यांना केरळ साहित्य परिषदेने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. कुंजन नंबियार पुरस्कार, महाकवी उल्लूर पुरस्कार, कुरुप्पन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. लेखनातून केरळच्या समाजजीवनावर परखड भाष्य त्यांनी केले, जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रास स्पर्श करणारे असेच त्यांचे लेखन होते. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील कवी व सामाजिक घडामोडींचा सर्जनशील भाष्यकार आपण गमावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 4:14 am

Web Title: malayalam satirical poet chemmanam chacko
Next Stories
1 थॉमस अब्राहम
2 सीमा नंदा
3 प्रा. डॉ. बी. शेषाद्री
Just Now!
X