12 December 2017

News Flash

नारायण संन्याल

संन्यालांचा जन्म आता बांगलादेशात असलेल्या बोग्रा जिल्ह्यातला.

लोकसत्ता टीम | Updated: April 19, 2017 3:16 AM

नारायण संन्याल

सशस्त्र क्रांतीचा नारा देत नक्षलवादी चळवळीच्या प्रसारासाठी सारे आयुष्य पणाला लावणारे नारायण संन्याल यांच्या निधनाने या चळवळीतील फूट आणि एकीकरण जवळून अनुभवणारा एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. संन्यालांवर पुढे गंभीर आरोप झाले. ते सिद्ध होऊन कैदेची शिक्षाही झाली. सोमवारी मृत्यूने त्यांना दुर्धर आजारातून सोडवले. त्यांच्या निधनाने, नक्षली चळवळीतील एके काळच्या आदर्शवादाचे प्रतीक लोपले.

संन्यालांचा जन्म आता बांगलादेशात असलेल्या बोग्रा जिल्ह्यातला. त्या स्वातंत्र्यपूर्व काळात घरातले वातावरण पूर्णपणे काँग्रेसमय. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या वडिलांनी स्वातंत्र्यलढय़ात सरोजिनी नायडूंसोबत काम केलेले. संन्याल मात्र राजकारणात कधी रमले नाहीत. उत्कृष्ट फुटबॉलपटू असलेल्या संन्यालांनी युनायटेड बँकेत नोकरी धरली. १९६०च्या दशकात चारू मुजुमदारांनी दिलेला सशस्त्र क्रांतीचा नारा त्यांना भावला. देशातील पीडित, गरीब व भूमिहीनांना न्याय मिळवून द्यायचा असेल आणि स्वतंत्र भारतातही उरलेली अर्धसामंती-अर्धवसाहती व्यवस्था बदलून नवी न्याय्य व्यवस्था आणायची असेल तर क्रांतीशिवाय दुसरा मार्ग नाही या विचाराने प्रेरित झालेल्या संन्यालांनी बँकेच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवले व नक्षलवादींच्या लढय़ात सामील झाले.

या चळवळीतील नेत्यांमध्ये मतभेद झाल्यावर नारायण संन्याल थेट बिहारमध्ये गेले. तेथे त्यांनी सत्यरंजन सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली जमीनदारांच्या विरोधात भूमिहीनांची सशस्त्र सेना उभारली. १९७०च्या दशकात या सेनेचा आताच्या झारखंडमध्ये प्रचंड दरारा होता. जेहानाबाद व पलामू क्षेत्रातील दुर्गम जंगलात राहून भूमिगत पद्धतीने काम करणाऱ्या संन्यालांना देशभरातील सर्व क्रांतिकारी गटांनी एकत्र यावे असे वाटत होते. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू होते. त्याला यश मिळाले २००४ मध्ये. पडद्याआड राहून या एकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संन्यालांना भाकप माओवादी या नव्याने स्थापन झालेल्या पक्षात पॉलिट ब्यूरोत स्थान देण्यात आले. त्यांच्यावर छत्तीसगडमधील बस्तरची जबाबदारी देण्यात आली. चळवळीच्या विस्तारासाठी कधी बस्तर तर कधी झारखंड असा प्रवास करणाऱ्या या जहाल डाव्या नेत्याला २००५ ला झारखंडमध्ये अटक करण्यात आली. या अटकेमुळे त्यांचा ठावठिकाणा त्यांच्या घरच्यांना कळला व त्यांची बहीण सुमारे ४० वर्षांनंतर त्यांना भेटू शकली. कारागृहात असताना संन्याल यांनी डॉ. विनायक सेन यांना अनेक पत्रे लिहिली होती. याचाच आधार घेत सेन यांनाही नंतर अटक झाली. २०१४ ला प्रकृतीच्या कारणावरून जामीन मिळाल्यानंतर संन्याल दक्षिण कोलकात्याला राहायला गेले. आता नक्षल चळवळीत दाखल होणारे तरुण ध्येयवादाने प्रेरित नाहीत. अतिआक्रमकता हाच त्यांचा विशेष गुण ठरला आहे. गरिबांना न्याय मिळवून देण्याकडे या पिढीचे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत त्यांनी चळवळप्रमुख गणपतीला लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केली होती. चळवळीच्या सध्याच्या स्वरूपाबद्दल निराशा प्रकट करणारे संन्याल शेवटपर्यंत चळवळीचा सच्चा कार्यकर्ता म्हणूनच वावरले. सोमवारी रात्री कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला. संन्याल यांच्या जाण्यामुळे आता चारू मुजुमदारांसोबत काम केलेले दोघेच चळवळीत उरले आहेत. त्यापैकी प्रशांता बोस सध्या छत्तीसगडच्या जंगलात भूमिगत आहेत, तर अमिताभ बागची २००९ ला अटक झाल्यापासून कोलकात्याच्या तुरुंगात आहेत.

First Published on April 19, 2017 3:16 am

Web Title: maoist ideologue narayan sanyal