एड्स या एचआयव्ही विषाणूमुळे होणाऱ्या रोगाने आरोग्यजगतापुढे मोठे आव्हान उभे केले असताना ज्या वैज्ञानिकांनी एड्सवर औषध शोधून काढण्यात समर्पितपणे काम करून अनेकांचे प्राण वाचवले अशांपैकीच एक म्हणजे डॉ. मार्क वेनबर्ग. अस्थम्याचा त्रास असूनही पोहायला गेलेले डॉ. वेनबर्ग यांचा पोहत असताना अचानक वेगाने आलेल्या जलप्रवाहात अडकून मृत्यू आला. एड्स रुग्णांचे एक आशास्थान मावळले.

ह्य़ूमन इम्युनोडीफिशियन्सी व्हायरस म्हणजे एचआयव्ही विषाणूमुळे होणाऱ्या रोगावर त्यांनी पहिले औषध शोधून रुग्णांना नवी आशा दाखवली. कॅनडात त्यांनी १९८० च्या सुमारास पहिली एड्स प्रयोगशाळा सुरू केली. त्या संस्थेचा आता वटवृक्ष बनला आहे. त्या वेळी एड्सचे प्रमाण आफ्रिकेत जास्त होते. अशा वेळी त्यांनी मॅकग्रॉहिल विद्यापीठात एचआयव्हीवर संशोधन केले. एचआयव्ही विषाणूचा शोध लावणारे डॉ. रॉबर्ट गॅलो यांनी त्यांना ‘ते’ विषाणू संशोधनासाठी दिले होते. त्यातून त्यांनी १९८९ मध्ये ‘३ टीसी’ हे औषध तयार केले, ते एड्सवर गुणकारी ठरले. एड्सवर एकच औषध चालत नाही, त्यावर औषधांचा वापर करावा लागतो; त्यात या औषधाचा समावेश झाला. एड्सचे प्रमाण शून्यावर आले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती.

त्यांचा जन्म माँट्रियलमध्ये १९४५ मध्ये झाला, त्यांचे वडील काच कंपनीत काम करीत. मॅकगिलमधून त्यांनी पदवी घेतली व नंतर कोलंबिया विद्यापीठातून रेणवीय जीवशास्त्रात पीएच.डी. केली. मॅकगिल येथे त्यांनी संशोधक म्हणून १९७४ मध्ये काम सुरू केले. नंतर ते मॅकगिलच्या एड्स केंद्राचे संचालक होते. लेडी डेव्हिस इन्स्टिटय़ूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेत ते एड्स संशोधनाचे काम करीत होते. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष थाबो एम्बेकी यांनी एड्स हा गरिबी व प्रतिकारशक्ती कमी असल्याने होतो असे वक्तव्य केले होते, त्याचा वेनबर्ग यांनी खरपूस समाचार घेताना असे लोकच एचआयव्हीच्या प्रसारात भर घालत आहेत अशी टीका केली होती. एड्स संशोधन परिषदेसाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील दरबानची निवड करून तेथील लोकांना एड्सविरोधी औषधे उपलब्ध करून देण्यातील त्यांची कामगिरी अधोरेखित केली होती. संशोधन करीत असताना त्यांना वैज्ञानिक म्हणून जी विश्वासार्हता मिळाली, ती त्यांनी एड्सबाबत धोरणे बदलण्यासाठी पणाला लावली. त्या अर्थाने एड्सविरोधी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही ते नावारूपास आले.

समलिंगी लोकांना मानवी समाजात मिळणारी वाईट वागणूक त्यांना अमान्य होती. त्यामुळे एलजीबीटी समुदायालाही त्यांनी पाठबळ दिले. व्यक्तिगत जीवनात त्यांचे कुटुंबावर निरातिशय प्रेम होते. त्यांना पोहण्याची खूप आवड होती. अनेक विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान ही त्यांची ओळख होती. एचआयव्ही रुग्णांवर सामाजिक पातळीवर काय समस्या ओढवतात हे त्यांना माहिती होते. त्यामुळे या रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना त्यांनी प्रसंगी फटकळपणाही करण्यास मागेपुढे पाहिले नाही. एचआयव्ही रुग्णांना समानाधिकार व या रोगाविरोधातील औषधोपचार या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी धैर्याने व मेहनतीने काम केले. ज्यू विनोद व फ्रेंच भाषेचा प्रयोग करण्याची आवड त्यांना होती. वेनबर्ग यांना २००१ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. २०१५ मध्ये कॅनेडियन मेडिकल हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश झाला. फ्रान्सचा ‘शवालिए द लिजन’ पुरस्कारही त्यांना मिळाला होता.