एखाद्या रोगावर उपाय शोधण्यासाठी अनेक माणसांचे प्रयत्नही अपुरे पडतात, प्रदीर्घ कालावधी त्यासाठी लागत असतो. मेरी जीन क्रीक यांनी रॉकफेलर विद्यापीठात ५० वर्षे संशोधन करून व्यसनात्मक आजारावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. या डॉ. क्रीक यांचे अलीकडेच निधन झाले.

‘गर्द’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेरॉइनच्या नशेने आयुष्य बरबाद होते, पण अनेकांना व्यसनांचे दुष्परिणाम माहिती असतानाही ते व्यसनांपासून दूर राहू शकत नाहीत. त्यांच्यासाठी अमली पदार्थाची तलफ कमी करण्यासाठी उपाय शोधणे आवश्यक ठरते. हेरॉइनच्या व्यसनावर मेरी जीन क्रीक यांनी मेथॅडोनचा उपाय शोधला. व्यसनामागचे जीवशास्त्र त्यांनी उकलले. त्यामुळेच त्यांना व्यसनमुक्तीच्या जीवशास्त्रात मानाचे स्थान मिळाले. आदर्श वैज्ञानिकाचे सर्व गुण क्रीक यांच्या अंगी स्वाभाविकपणे होते. व्यसनाची सवय ही काही प्रमाणात जनुकीय पातळीवरून येत असते, असे त्यांचे मत होते. यातूनच त्यांच्या संशोधनाला दिशा मिळाली.

क्रीक यांचा जन्म वॉशिंग्टनमध्ये झाला. वेलस्ली महाविद्यालयातून पदवी व कोलंबिया विद्यापीठातून एमडी ही पदवी त्यांनी घेतली. मात्र वैद्यकीय व्यवसायापेक्षा त्यांना व्यसनाधीन लोकांचे हित महत्त्वाचे वाटले. मनोरोगतज्ज्ञ मेरी नॅसवँडर यांच्यासमवेत त्यांनी रॉकफेलर संस्थेत व्यसनाधीनतेवर १९६४ पासून संशोधन सुरू केले. १९६६च्या शोधनिबंधात त्यांनी मेथॅडोन हा व्यसनाधीनतेवरचा एक उपाय असल्याचे मत मांडले होते. मेथॅडोनचा वापर हेरॉइनची व्यसनाधीनता सोडवण्यासाठी आजही केला जातो. व्यसन हा मेंदूचा रोग मानता येईल, असे त्यांचे मत होते. काही लोकांमध्ये व्यसनाधीनता निर्माण करणारी जनुके शोधण्यात त्यांना यश आले. या जनुकांमुळे मेंदूतील रसायने बदलतात, त्यामुळे व्यसन जडते. व्यसनाधीनतेची समस्या सोडवण्यासाठी मेरी यांनी अनेक मार्गांनी प्रयत्न केले. या संशोधनामुळे अनेकांची आयुष्ये बदलली. त्यांच्या संशोधनामुळे अनेक गरिबांची उद्ध्वस्त झालेली घरे सावरली. क्रीक यांनी अनेक महिलांना विज्ञान व वैद्यक क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन दिले. अनेकींसाठी त्या प्रेरणेचा स्रोत ठरल्या. त्यांनी आई व आजी या दोन्ही भूमिका तेवढ्याच प्रेमळपणे पार पाडल्या. त्या त्यांची मुले लहान असताना प्रयोगशाळेत घेऊन येत असत. त्यामुळे कुटुंब व विज्ञान संशोधनातील कारकीर्द ही त्यांनी समर्थपणे पेलली. जो पेच आजही अनेक महिलांना भीती घालतो, ती भीती त्यांनी त्या काळातही बाळगली नाही. त्यांनी निवडलेली ही वाट वेगळी होती; पण त्यांनी विज्ञान संशोधनाचा मांडलेला डाव संसारासाठी अध्र्यावर सोडला नाही. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी संशोधनाचे काम अव्याहतपणे सुरूच ठेवले. त्या निवृत्त खरे तर झाल्याच नाहीत.