नाणी टाकून खेळण्याची मुभा १९८० च्या दशकात देणाऱ्या ‘व्हिडीओ गेम्स’ची लोकप्रियता व मागणी आज हातोहाती मोबाइल गेम आल्याने घटली, पण आज अनेक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ‘गेमिंग व्यवसाया’चा मोठा हातभार असल्याचे दिसून येते. या गेमिंगला दिशा देणारे मसावा नाकामुरा यांचे नुकतेच निधन झाले. ‘पॅक-मॅन’चे जनक म्हणून त्यांची ओळख होती. वयाच्या ९१व्या वर्षांपर्यंत ते गेमिंग उद्योगात रमलेले होते. दुसऱ्या महायुद्धातून पुन्हा उभे राहत असलेल्या काळात म्हणजे १९५५ मध्ये नाकामुरा यांनी ‘नाकामुरा अ‍ॅम्युजमेंट मशीन्स’ ही उत्पादन कंपनी सुरू केली. ही कंपनी मोठय़ा दुकानांत लहान मुलांसाठी लावण्यात येणाऱ्या विविध खेळांची निर्मिती करीत होती. आपल्या कंपनीची माहिती सामान्यांना मिळावी यासाठी त्यांनी दुकानांच्या वर दोन रोबो लावण्यास सुरुवात केली. यामुळे हे हिरो त्यांच्या ‘नॅम्को’ या कंपनीची विशेष ओळख बनले. खरे तर १९७० मध्येच या कंपनीने ‘पडद्यावरील आर्केड गेम्स’ची (नाणी टाका, गेम खेळा) संकल्पना जगासमोर आणली होती. ती संकल्पना विकसित करीत असतानाच त्यांनी भविष्यात ‘व्हिडीओ गेम्स’ची चलती असणार हे ताडले आणि त्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली. यानंतर १९७९ मध्ये कंपनीने गॅलेक्सियन या गेमचीही निर्मिती केली. पण एकंदर ही संकल्पनाच लोकांसाठी नवी असल्याने तो फारसा लोकांच्या पसंतीस उतरला नाही. पुढे नाकामुरा यांनी १९८० मध्ये पॅक-मॅनची निर्मिती केली. यामुळे त्यांची ओळख ‘पॅक-मॅन’चे जनक म्हणून बनली. त्यांनी विकसित केलेला हा पॅक-मॅन अगदी २०१६ मध्येही अमेरिकेत ‘आर्केड गेम्स’ मध्ये सर्वाधिक लोकप्रिय होता.

अखरेच्या क्षणापर्यंत ते बंदाई नॅम्को कंपनीचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. मध्यंतरी पॅक-मॅन लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला. जगभर लोकप्रिय झाला. याच दरम्यान १९८३ मध्ये नाकामुरा यांना त्यांच्या यशाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अगदी विनम्रतेने ‘मला नाही वाटत की हे इतके मोठे आहे’ असे उत्तर दिले. याहून मोठे यश मी मिळवीन, अशा आत्मविश्वासाचे हे उत्तर त्या काळात त्यांच्या पॅक-मॅन इतकेच लोकप्रिय झाले होते. नाकामुरा यांनी पडद्यावरल्या खेळाला खिळण्याच्या व्यसनाचे गमक ताडले होते. यामुळेच त्यांनी तयार केलेले ‘व्हिडीओ गेम्स’ हे यशाची सर्व शिखरे पार करीत होते. यानंतर काळानुरूप बदल करीत नॅम्कोने हातातील ‘व्हिडीओ गेम्स’ आणि हातातल्या कन्सोल गेम्सची निर्मितीही केली. त्यांच्या या व्यवसायामुळे जपानमधील ‘व्हिडीओ गेम्स’ उद्योगाला नवी दिशा मिळाली.

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
raghuram rajan
“भारतातील तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी”, RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन असं का म्हणाले?
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
chavadi maharashtra political crisis
चावडी : राणे आणि भुजबळांची वेगळी तऱ्हा

नाकामुरा यांचा जन्म २४ डिसेंबर १९२५ मधला. त्यांनी १९४८मध्ये ‘योकोहामा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून पदवी घेतली आणि १९५५ पर्यंतची वर्षे युद्धातून सावरण्यातच गेली. २००२ मध्ये नाकामुरा यांनी कंपनीच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे सोडली आणि कंपनीचे सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गेमिंगची निर्मिती करणाऱ्या या कंपनीने २००३ मध्ये कंपनीने चित्रपटनिर्मितीतही प्रवेश केला. बंदाई या कंपनीला २००५ मध्ये भांडवल विकल्याने ही कंपनी ‘बंदाई नॅम्को’ या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यांच्या कामाची दखल घेऊन २००७ मध्ये जपान सरकारने त्यांना ‘उगवता सूर्य’ हा सन्मान देऊन गौरविले.